Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजप पक्षप्रवेश; मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेतला, प्राजक्त तनपुरेंचे स्पष्टीकरण

बखर Live 2 weeks ago

हिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला धक्का देत सत्ताधारी गटात प्रवेश केल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या भावना, मतदारसंघाचा विकास आणि प्रलंबित कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तनपुरे म्हणाले की, आपण वेळोवेळी माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करण्याची भूमिका मांडली होती. राजकीय भवितव्य आणि मतदारसंघाच्या हिताचा विचार करून सर्वांच्या भावनांचा सन्मान राखत पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. राहुरी पोटनिवडणुकीच्या काळात विकासकामांचा मुद्दा महत्त्वाचा होता. धरणांमधील गाळ काढण्याच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून इतर अनेक विकासकामेही प्रगतीपथावर आहेत. आता सत्तेत असल्यामुळे या कामांना अधिक बळकटी देण्यासाठी पाठपुरावा करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षात असताना आपण आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली, मात्र त्याची मोठी किंमत मतदारसंघाला मोजावी लागली, असेही त्यांनी नमूद केले. सत्ता गेल्यानंतर अनेक विकासकामांना ब्रेक लागल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. मतदारसंघात निधीची कमतरता भासू नये आणि विकासकामे रखडू नयेत, हे या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्यावर कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय दबाव नव्हता. कोणतीही चौकशी किंवा इतर कारणे या निर्णयामागे नाहीत. केवळ कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतदारसंघाच्या विकासाचा विचार करून हे पाऊल उचलले असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. काही वेळा राजकारणात सामंजस्याचे निर्णय घ्यावे लागतात. निवडणुकीच्या वेळी वेगळी भूमिका असू शकते, परंतु परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी म्हटले.

जयंत पाटील यांच्या संदर्भातही भूमिका स्पष्ट

आपल्या पक्षप्रवेशाचा आणि ज्येष्ठ नेते जयंत यांच्या राजकीय भूमिकेचा कोणताही संबंध नसल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले. "आम्ही नातेवाईक आहोत, ते माझे मामा आहेत आणि मी त्यांचा भाचा आहे. मात्र आमच्या दोघांच्या मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे. माझ्या पक्षप्रवेशाचा त्यांच्या राजकारणाशी कोणताही संबंध जोडू नये," असे त्यांनी सांगितले.

विलीनीकरणासंदर्भातील चर्चांसाठी झालेल्या एका बैठकीला आपण उपस्थित होतो. त्या बैठकीत दादाही उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या असून त्यांच्या सदिच्छा कायम सोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

याशिवाय, आपण लवकरच शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्याशी एक-दोन वेळा दूरध्वनीवर चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे, याबाबत आपण भाष्य करणार नसल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live