Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत मिळून ७८.४९ टक्के पाणीसाठा

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत मिळून ७८.४९ टक्के पाणीसाठा

बखर Live 1 day ago

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात १.९७ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

धरण भरल्यामुळे सांडव्यावरून आतापर्यंत १.८२ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २२.८८ टीएमसी Khadakwasla Damम्हणजेच ७८.४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये २३.६० टीएमसी म्हणजेच ८०.९८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत किंचित कमी असला, तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

मागील १२ तासांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. खडकवासला परिसरात २९ मिलीमीटर, पानशेत येथे १०८ मिलीमीटर, वरसगाव येथे १०३ मिलीमीटर तर टेमघर परिसरात सर्वाधिक १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे चारही धरणांमध्ये एकूण २,३१६ एमसीएफटी पाण्याची आवक झाली आहे.

धरणनिहाय आकडेवारीनुसार, पानशेत धरणात ८.७६ टीएमसी म्हणजेच ८२.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. वरसगाव धरणात ९.८६ टीएमसी म्हणजेच ७६.८८ टक्के, तर टेमघर धरणात २.२९ टीएमसी म्हणजेच ६१.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

खडकवासला धरण पूर्ण भरल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांमधील साठाही वेगाने वाढत असल्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live