पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य, सांस्कृतिक राष्ट्रवाद, पत्रकारिता आणि शिक्षणाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आणि लेखणी आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
Ajit Doval
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अमित शाह बोलत होते. शाह यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचाही गौरव केला.
अमित शाह म्हणाले, "आज महान देशभक्त लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे आपण स्मरण करतो. आज अण्णा भाऊ साठे यांचीही जयंती आहे. केवळ दीड दिवस शाळेत गेलेले अण्णा भाऊ साठे पुढे लोकशाहीर झाले, त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे."
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच," या घोषणेद्वारे लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांनी जनतेला एकत्र आणले आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना रुजवली. टिळक हे निर्भीड पत्रकार होते. त्यांच्या लेखांमधून पत्रकार किती धाडसी आणि स्पष्टवक्ता असू शकतो, याची प्रचिती येते. इंग्रज सरकारला सर्वाधिक भीती वाटणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये 'केसरी' आणि 'मराठा' यांचा समावेश होता, असेही शाह म्हणाले.
टिळकांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात कसे जगता येते, हे दाखवून दिले. त्यांनी पुण्यात शैक्षणिक व्यवस्था उभी केली आणि बुद्धीला ज्ञान देणे हे शिक्षणाचे प्रमुख कार्य असल्याचा विचार मांडला. आत्मनिर्भरता हेदेखील स्वराज्याचाच भाग असल्याचे त्यांनी देशाला पटवून दिले, असे शाह म्हणाले.
अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल अमित शाह यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, देशासाठी आयुष्य समर्पित केलेल्या व्यक्तीचा सन्मान करणे ही भाग्याची गोष्ट आहे. मी गुजरातचा गृहमंत्री असल्यापासून अजित डोवाल यांना ओळखतो. गुजरातमधील स्फोटांच्या तपासासाठी त्यांची मदत घेण्याचा सल्ला नरेंद्र मोदी यांनी मला दिला होता. देशातील विविध स्फोटांचा तपास गुजरात पोलिसांनी केला आणि त्यात डोवाल यांच्या अनुभवाचा मोठा फायदा झाला."
देशाच्या सुरक्षेचा विषय आला की अजित डोवाल यांचे नाव घेतल्याशिवाय चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. सिक्कीम, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि पाकिस्तानमध्ये काम करताना त्यांनी देशासाठी उल्लेखनीय योगदान दिले.
अजित डोवाल यांनी 2005 मध्ये सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतरही राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम सुरू ठेवले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी विविध राष्ट्रीय विषयांवर संशोधन केले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल झाले, असे सांगून शाह म्हणाले, लष्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये अजित डोवाल यांच्या अनुभवाचा उपयोग झाला. ते देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

