पुणे: पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह लगतच्या परिसरातील सीएनजी वाहनचालकांना आता इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २.५० रुपयांची (करांसह) वाढ केली आहे.
या दरवाढीमुळे पुणे परिसरात सीएनजीचा दर आता ९४.७५ रुपये प्रति किलो झाला आहे.
हे नवीन गुरुवार, २८ मे मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती 'एमएनजीएल' प्रशासनाने अधिकृत पत्रकाद्वारे दिली आहे.
एमएनजीएलने स्पष्ट केले आहे की, ही दरवाढ पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडीमधील सर्व क्षेत्रांतील सीएनजी पंपांवर लागू होणार आहे. सीएनजी उत्पादनासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या मूळ खरेदी खर्चामध्ये वाढ झाली आहे. हा वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी सीएनजीच्या दरात वाढ करणे आवश्यक बनले होते, असे 'एमएनजीएल' कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सीएनजीच्या दरात वाढ झाली असली, तरी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी अजूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत करून देतो, असा दावा कंपनीने केला आहे. पुण्यातील सध्याच्या इंधन दरांचा विचार करता पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे अजूनही सुमारे ४८ टक्के पैशांची बचत होते. तसेच, डिझेल कारच्या तुलनेत सीएनजीमुळे जवळपास २६ टक्के बचत होते. ऑटो रिक्षा सेगमेंटमध्येही डिझेल/पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी २६ टक्के फायदेशीर ठरत आहे.
एकीकडे सीएनजी महागला असला, तरी घरगुती स्वयंपाकासाठी पाईपलाईनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती पीएनजीचे दर 'जैसे थे' ठेवण्यात आल्याने हजारो गृहिणींना आणि कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमएनजीएलने ग्राहकांना या सीएनजी दरवाढीची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
विशेष प्रतिनिधी
