मुंबई : Marathi Mandatory राज्यात १ मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा जाणणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
या निर्णयानुसार चालकांना मराठी भाषा वाचता आणि लिहिता येते का, याची तपासणी करण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.Marathi Mandatory
मोटार परिवहन विभागाच्या राज्यातील ५९ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे चालकांच्या परवान्यांची पडताळणी केली जाईल आणि त्यांना मराठीत संवाद साधता येतो का, याची चाचणी घेतली जाईल. ज्यांना मराठी भाषा येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.Marathi Mandatory
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधत नाहीत किंवा मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. यामुळे हा निर्णय कठोरपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, "ज्या प्रदेशात आपण व्यवसाय करतो त्या प्रदेशाच्या भाषेचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच इतर राज्यांच्या भाषेचा सन्मान राखणेही गरजेचे आहे." त्यामुळे सर्व चालकांनी मराठी भाषा शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यासोबतच, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

