बारामती : मोटार अपघातातील नुकसानभरपाईची रक्कम मिळवून देण्याच्या प्रक्रियेत पक्षकाराचा विश्वास संपादन करून त्याच्या खात्यातून स्वतःच्या खात्यावर १० लाख रुपये वळविल्याप्रकरणी बारामती न्यायालयाने एका वकिलाला दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Baramati
बारामती शहर पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, वरील गुन्ह्याप्रकरणी अॅड. बापू बाबुराव दिवेकर यांना न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. ५, बारामती येथील न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये दोषी ठरविले आहे. प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांच्या पत्नीचा २०१५ मध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यासाठी त्यांनी आरोपी वकिलाची नियुक्ती केली होती.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळालेल्या भरपाईपैकी व्यावसायिक फी म्हणून केवळ एक लाख रुपये काढले जातील, असे सांगून आरोपीने फिर्यादीच्या संयुक्त बँक खात्यातून स्वतःच्या खात्यावर १० लाख रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप होता. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले बँकेचे प्रमाणित अभिलेख, फिर्यादीची साक्ष आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीच्या खात्यावर १० लाख रुपये वर्ग झाल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले.
या व्यवहारातून फसवणूक निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. तपासादरम्यान मूळ धनादेश जप्त न करणे, हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल उपलब्ध नसणे आदी त्रुटींमुळे बनावट कागदपत्रांशी संबंधित आरोप सिद्ध झाले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. मात्र, उपलब्ध बँक व्यवहारांच्या पुराव्यावरून फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंडापैकी २० हजार रुपये फिर्यादीच्या कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात बारामती शहर पोलीस ठाण्याने तपास केला होता.
विशेष प्रतिनिधी

