Dailyhunt
पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही; गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही; गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

बखर Live 2 weeks ago

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, महाविकास आघाडी ही प्रामुख्याने संविधान वाचवण्यासाठी एकत्र आली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी आघाडीची एकजूट अधोरेखित केली. तसेच, बारामतीमध्ये गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांची पवार आडनाव असलेली जी नातवंडे आहेत, त्यांच्या विरोधात आपण कधीही निवडणूक लढवणार नाही, या आपल्या विधानाचा त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे पुनरुच्चार केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले होते. उद्धव ठाकरे यांचा काल शरद पवार यांना फोन आला होता. जयंत पाटील यांच्याशी देखील बोलणे झाले होते आणि कालच आम्हाला हे कळले. मी सुद्धा काल कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते. आता एका मताने महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे विधानपरिषदेवर जात आहेत.

भाजपने बिनविरोध का दिला?

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, खरेतर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची चर्चा चालली होती. हर्षवर्धन सपकाळ मघाशीच सविस्तर बोलले आहेत. आता वेगळे काय बोलायची गरज वाटत नाही. मी असे काही बघत नाही, पवार साहेबांची देखील बिनविरोध निवडणूक झाली. भाजपने बिनविरोध का दिला? शिंदेंच्या शिवसेनेने बिनविरोध का दिला? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी विधान केले की सुप्रिया सुळे ही गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड आहेत पवार आडनावाची आहेत त्यांच्या विरोधात कधीही इलेक्शन लढणार नाही. हेही इलेक्शन मी लढले नव्हते, याही इलेक्शनचा खूपसा इतिहास आहे. जो आज सांगणे गरजेचे वाटत नाही. मागच्या वेळेस देखील तयारी आणि इच्छा बिलकुल नव्हती, इथून पुढेही नसणार, असे सुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पवारांच्या कुटुंबातल्या बाई बाबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. दुसरा मतदार संघ बघेन, मला देशाची सेवा करायची आहे, जर दुसऱ्या कोणाची इच्छा असेल तर मी दुसऱ्या मतदारसंघात काम करेन अडचण काय, असेही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जी लढाई टीव्ही वरती चालते ते कुठल्याही सुसंस्कृत घरात होऊ नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. फार कष्टाने पवार कुटुंबावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांनी जो विश्वास दाखवला आहे. संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते असतात जे आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून काम करत असतात. त्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये यासाठी मी हे पाऊल टाकलेले आहे.

बच्चू कडूंच्या राजकीय भूमिकेवर काय म्हणाल्या सुळे?

बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेविषयी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, हीह लोकशाही आहे. प्रत्येकाच्या पक्षांमध्ये त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणाला तिकीट द्यायचा हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी जास्त विचार करत नाही. मी आजचा दिवस जगत आहे, उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live