नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मंगळवारी प्रति लिटर 90 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारीच दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. Petrol and diesel
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही इंधनाच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे.
मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी महाग होऊन 107.59 रुपये प्रति लिटरवर आले आहे. यासोबतच डिझेलचे दर 94 पैशांनी वाढून 94.08 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
दिल्लीत पेट्रोलची किंमत 87 पैशांनी वाढून प्रति लिटर 98.64 रुपयांवर पोहोचली आहे, जी यापूर्वी 97.77 रुपये प्रति लिटर होती. तर, डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ झाली आहे, त्यामुळे आता ते 90.67 रुपयांऐवजी 91.58 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर होते, जे आता वाढून 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे तेल कंपन्या दबावाखाली होत्या. त्यामुळे कंपन्यांनी तोट्याची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये दीर्घकाळ वाढ कायम राहिली, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढवल्या जाऊ शकतात.
सरकारच्या मते, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या सरकारी कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे तोट्यात चालल्या होत्या.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांच्या मते, कंपन्यांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या विक्रीवर दरमहा सुमारे ₹30,000 कोटींचे नुकसान होत आहे.

