नवी दिल्ली : petrol and diesel देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली असून, गेल्या 9 दिवसांतील ही तिसरी दरवाढ ठरली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 87 पैशांची वाढ होऊन ते ₹99.51 प्रति लिटरवर पोहोचले आहे.
तर डिझेल 91 पैशांनी महागले असून त्याचा दर ₹92.49 प्रति लिटर झाला आहे. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि वाहतूक व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.petrol and diesel
यापूर्वी याच आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. त्याआधी काही दिवसांपूर्वीच इंधनाच्या दरात तब्बल ₹3 प्रति लिटर वाढ झाली होती. सलग होत असलेल्या या वाढींमुळे महागाईचा आणखी भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.petrol and diesel
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे देशांतर्गत इंधन दर वाढले असल्याचे तेल कंपन्यांकडून सांगितले जात आहे. इराण आणि अमेरिकेमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक तेल बाजार अस्थिर झाला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर सुमारे 70 डॉलर प्रति बॅरल होते. मात्र आता हे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत.
यामुळे भारतातील तेल विपणन कंपन्यांवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला आहे. आयात खर्च वाढल्याने कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असून, त्याची भरपाई करण्यासाठी इंधन दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ उच्च पातळीवर राहिल्या, तर येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. विशेषतः डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू राहिल्यास आयात खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे.
भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील बदलांचा थेट परिणाम देशातील इंधन दरांवर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती यावर आधारित देशात पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जातात.
दररोज सकाळी 6 वाजता नवे दर
सरकारी तेल कंपन्या 'डेली प्राईस रिव्हिजन' अर्थात डायनॅमिक प्राईसिंग सिस्टीम अंतर्गत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतात. त्यामुळे जागतिक बाजारातील चढ-उतारांचा परिणाम थेट ग्राहकांवर होत आहे.
दरम्यान, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
विशेष प्रतिनिधी

