पुणे: पिंपरी- चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील 37 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. जानेवारीत एक, जुलैमध्ये पाच आणि ऑगस्ट महिन्यात अचानकपणे 31 रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. ( Pimpri- Chinchwad )
पिंपरी- चिंचवड शहरात सध्या स्वाईन फ्लूने डोकं वर काढल्याचे समोर आले आहे. शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, खोकताना-शिंकताना नाक-तोंड झाकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे, अशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, स्वाइन फ्लू हा श्वसनमार्गाशी संबंधित संसर्गजन्य आजार असून, 'H1N1' विषाणूमुळे त्याची लागण होते. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी आणि अतिशय थकवा ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये न्यूमोनियासारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

