नवी दिल्ली: जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अश्लील शब्दांत घोषणाबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलीला मोदींनी माफ केल्यानंतर तिच्या आईने हात जोडून पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
मोदींच्या निर्णयामुळे आपल्या मुलीला नवे जीवन मिळाल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. (PM Modi)
"सूड घेण्याऐवजी मुलीला माफ केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे हात जोडून आभार मानते. हा माझ्या मुलीचा दुसरा जन्म आहे. इतके घाणेरडे शब्द वापरल्यानंतरही तिला माफ करून मोदींनी आपले मोठेपण दाखवले. आज तिचा वाढदिवस असून पंतप्रधानांनी तिला जीवनदानाची सर्वांत मोठी भेट दिली आहे," असे मुलीच्या आईने व्हिडिओ संदेशात म्हटल्याचे वृत्त आहे. त्यांनी पंतप्रधानांनी आपल्या मुलीला दत्तक घ्यावे, अशी भावनिक विनंतीही केली.
मला आणि माझ्या आईला शिवीगाळ करणाऱ्या मुलांना माफ करतो, जंतर-मंतरवरील घटनेवर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान संबंधित मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ प्रसिद्ध करून समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले. आपल्याला शिवीगाळ करणारी मुले भरकटलेली असून त्यांच्याविरोधात राग किंवा सूड हे उत्तर नसल्याचे मोदी म्हणाले. अशा मुलांना शिक्षा करण्याऐवजी योग्य मार्ग दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोदींच्या संदेशानंतर काही तासांतच संबंधित मुलीचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला. तिने आपले वय १५ वर्षे असल्याचे सांगत केलेल्या वक्तव्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. "मी जे बोलले ते क्षमा करण्यासारखे नव्हते. मी खूप वाईट गोष्टी बोलले. पंतप्रधानांनी मला माफ करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे," असे तिने म्हटल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोदींच्या माफीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत जंतर-मंतरवरील पोलिस कारवाईबद्दल प्रथम विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कथित बळाचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसनेही पंतप्रधानांच्या व्हिडिओवर टीका करत पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली.

