बारामती : इंदापूर तालुक्यातील उद्धट येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या एक ते दोन दिवसांच्या नवजात पुरुष अर्भकाला रात्रीच्या अंधारात ओढ्यामध्ये निर्वस्त्र अवस्थेत टाकून देण्यात आले होते.
मात्र, अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकून एका जागरूक नागरिकाने प्रसंगावधान राखत अर्भक ओढ्यातून बाहेर काढले. वेळेत मदत मिळाल्याने या चिमुकल्याचे प्राण वाचले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अर्भकाला बेवारस सोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध वालचंदनगर पोलिसांकडून सुरू आहे.
वलचंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) रात्री साडेआठच्या सुमारास उद्धट गावातील विशाल गायकवाड यांच्या प्लॉटिंगसमोरील ओढ्यात हा प्रकार घडला. गावातील रहिवासी सुभाष इंगोले (वय ४२) हे त्या परिसरातून जात असताना त्यांना ओढ्याच्या दिशेने लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी मोबाईलच्या टॉर्चने पाहणी केली असता ओढ्यात एक नवजात पुरुष अर्भक निर्वस्त्र अवस्थेत पडल्याचे दिसले. क्षणाचाही विलंब न करता इंगोले यांनी ओढ्यात उतरून अर्भकाला बाहेर काढले.
स्वतःच्या कपड्यांमध्ये त्याला गुंडाळून तातडीने बारामती येथे नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. इंगोले यांच्या या सतर्कतेमुळे अर्भकाला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने अर्भकाला बारामती येथील शासकीय महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नवजात अर्भकाच्या संगोपनाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने त्याला ओढ्यात बेवारस अवस्थेत सोडल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकारामुळे अर्भकाच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार माने करीत आहेत.
अर्भकाला सोडणाऱ्याचाशोध घेण्यासाठी दोन पथके…
या घटनेचा छडा लावण्यासाठी दोन तपास पथके तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून बारामती, इंदापूर आणि नातेपुते परिसरातील रुग्णालये व प्रसूतिगृहांकडूनही माहिती घेतली जात आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे अर्भकाला येथे सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वलचंदनगर पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
विशेष प्रतिनिधी
