पुणे : शहर पोलीस दलात प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विविध पोलीस उप आयुक्तांच्या बदली व नव्या नियुक्त्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदलांमुळे शहरातील वाहतूक, विशेष शाखा आणि विविध परिमंडळांच्या कामकाजात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
नवीन आदेशानुसार, डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे यांची विशेष शाखेच्या पोलीस उप आयुक्त पदावरून बदली करून त्यांची वाहतूक शाखेच्या पोलीस उप आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
तसेच, डॉ. सागर कवडे यांची मुख्यालयातील पोलीस उप आयुक्त पदावरून परिमंडळ-३ च्या पोलीस उप आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परिमंडळ-३ मध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे भाग येत असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जीवन देवाशिष बेनिवाल यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-६ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १६, कोल्हापूर येथे समादेशक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पुणे शहर विशेष शाखेच्या पोलीस उप आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे शहर पोलीस दलातील आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांची केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या गृह विभागाच्या आदेशानुसार त्यांची "इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर" या केंद्रीय संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून १८ मे २०२६ पासून त्यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
सायबर गुन्हे प्रतिबंध आणि तपास क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे पंकज देशमुख यांची निवड झाल्याचे मानले जात आहे.
विशेष प्रतिनिधी
