Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात एफडीएची धडक  कारवाई; 70 हॉटेल्सची तपासणी, 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 230 किलो संशयित दुग्धजन्य पदार्थ जप्त

पुण्यात एफडीएची धडक कारवाई; 70 हॉटेल्सची तपासणी, 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 230 किलो संशयित दुग्धजन्य पदार्थ जप्त

बखर Live 1 week ago

पुणे: राज्य सरकारच्या 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे शहर आणि परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांवर मोठी धडक कारवाई केली आहे.

FDA

विशेष तपासणी मोहिमेदरम्यान 70 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची पाहणी करण्यात आली, तर अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, मुदतबाह्य अन्नसाठा आणि निकृष्ट स्वच्छता आढळून आल्याने सात आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर (सिंहगड रस्ता), क्राऊन बेकर्स (सिंहगड रस्ता), अॅग्रोटीस केटरिंग प्रा. लि. (ता. आंबेगाव), बरकत बिर्याणी हाऊस (वाघोली), रॉयल बिर्याणी हाऊस (वाघोली), नॅशनल 360 (बावधन) यांचा समावेश असून, याशिवाय देवांश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स (भालेकर नगर, पिंपळे गुरव) या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक संस्थेचाही अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

230 किलो संशयित दुग्धजन्य पदार्थ जप्त

FDAच्या पुणे विभागाने देवांश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे केलेल्या तपासणीत योग्य लेबलिंग नसलेला आणि भेसळीचा संशय असलेला सुमारे 230 किलो दूधजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. अंदाजे ₹90,500 किमतीचा हा साठा जप्त करण्यात आला असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

तपासणीत उघड झाले गंभीर प्रकार

अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी स्वयंपाकघरात अस्वच्छता, अन्न साठवणुकीसाठी आवश्यक तापमानाचे पालन न करणे, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, कीटक नियंत्रणातील त्रुटी, कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनांविरोधात तातडीने कारवाई करण्यात आली.

तुकाराम मुंढे यांचे कठोर निर्देश

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

हॉटेल चालकांना सूचना

FDAने सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायिकांना परिसरात स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नियमित करणे, वैध परवाने व नोंदी अद्ययावत ठेवणे आणि ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी तक्रार कशी करावी?

अन्नाच्या गुणवत्तेबाबत, भेसळ, अस्वच्छता किंवा अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी FDAच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित विभागाकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live