पुणे : शिवसेना ठाकरे गटाला पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर पक्षात मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर प्रमुखपदी वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Vasant More
पक्ष आता तळागाळातील संघटन, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि स्थानिक पातळीवर प्रभाव वाढवणे यावर लक्ष केंद्रीत करीत आहे. शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या जबाबदाऱ्यांचे खांदेपालट करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरप्रमुख म्हणून चेतन पवार, शहर समन्वयक नितीन गव्हाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, पुणे सहसंपर्क प्रमुखपदी संजय मोरे, गजानन थरकुडे, पिंपरी चिंचवड सहसंपर्क प्रमुखपदी गौतम चाबुकस्वार यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत युती करूनही पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला तुलनेने अधिक लाभ झाल्याचे चित्र दिसून आले.
पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी हालचाली वेगात सुरू असून, संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला.
"पुढील अडीच ते तीन वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्याने हा काळ संघटन मजबूत करण्यासाठी वापरा. तळागाळात काम केल्यास पुण्यात शिवसेना 'एक्स्प्रेस वे'सारखी धावेल," असे त्यांनी सांगितले.

