सोलापूर : जिल्हा काँग्रेसमधील नव्या नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवरच आता उघडपणे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जिल्हाध्यक्ष नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे, या नियुक्त्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
सोलापूर जिल्हा काँग्रेसमधील नव्या संघटनात्मक नियुक्त्यांनंतर पक्षात दोन गट स्पष्टपणे पडल्याचे चित्र आहे. अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली असून, नियुक्त्या करताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा विश्वास घेतला गेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पूर्व विभागासाठी सातलिंग षटगार तर पश्चिम विभागाचे अध्यक्ष म्हणून संदीप साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शहराध्यक्षपदी चेतन नरोटे यांना संधी देण्यात आली आहे.त्यावरून काँग्रेसचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, माढा करमाळा मतदारसंघाचे अशोक घोरपडे, सांगोल्याचे राजकुमार पवार, पंढरपूरची राहुल पाटील, मोहोळचे सुरेश हावळे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
सामूहिक राजीनामांच्या इशारा..
विजयकुमार हत्तुरे म्हणाले की, आम्ही पदाचा सामूहिक राजीनामा देणारा असून पक्षात सामान्य कार्यकर्ते, राहुल गांधी यांना यांचे सैनिक म्हणून काम करणार आहोत. पक्षातील लोक सर्वसामान्यांना झुरळ समजतात. आता काँग्रेस पक्षातील कॉकरोच आम्ही काय आहोत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या मुख्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.तसेच, हर्षवर्धन सपकाळ हटाव मोहीम आम्ही सोलापुरातून सुरू केली आहे. अध्यक्षांनी आमची निवड का झाली नाही, हे लवकर सांगितलं पाहिजे, असा प्रश्न देखील विजयकुमार हत्तुरे यांनी उपस्थित केला.
जिल्हाध्यक्ष संदीप साठे पवारांच्या जवळचे..
राजकुमार पवार म्हणाले की, संदीप साठे हे बारामती मध्ये राहतात.भिगवण येथे हर्षवर्धन पाटलांच्या संस्थेवर ते काम करतात, तर माढ्यात त्याचे अजित पवार आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी सोबत चांगले संबंध आहेत,मग ते काँग्रेसला न्याय कसा देणार. त्यामुळे संदीप साठे यांनी राजकारण सोडून एक तर नोकरी करावी किंवा नोकरी सोडून फक्त राजकारण करावे.काँग्रेस पक्षात तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आला असाल तर माढा लोकसभा मतदारसंघातील कोणतेही निष्ठावंत कार्यकर्ते शांत बसणार नाहीत,असा इशारा राजकुमार पवार यांनी दिला.
विशेष प्रतिनिधी
