युती की स्वतंत्र लढत, २२ सप्टेंबरच्या बैठकीत होणार निर्णय
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता शेतकरी कृती समितीनेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट मिळाला आहे.
कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी २२ सप्टेंबर रोजी निंबुत येथे कार्यकर्ते व सभासदांचा मेळावा आयोजित केला असून, या बैठकीत स्वतंत्र पॅनेल उभे करायचे की अन्य गटासोबत युती करायची, यावर चर्चा होणार आहे. Someshwar election
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी यापूर्वीच विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप आणि शिवसेनेकडूनही निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेलची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीतील स्पर्धा आणखी स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काकडे यांनी कृती समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कोणताही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे म्हटले आहे.
TMC Symbol Row : ममता बॅनर्जींना मोठा धक्का ; तृणमूल काँग्रेसचे नाव अन् चिन्ह गोठवले
दिवंगत अजित पवार यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन टाळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष यांच्याकडून झालेल्या शक्तिप्रदर्शनामुळे सभासदांच्या भावना दुखावल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, २२ सप्टेंबरच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत युती करायची का, याबाबतही विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कृती समिती स्वतंत्रपणे पॅनेल उभे करणार की सुनेत्रा पवार यांच्या गटाशी काही राजकीय जुळवाजुळव होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
कृती समितीच्या मागण्यांचा विचार न झाल्यास समविचारी व्यक्ती आणि अपक्षांना एकत्र करून पक्षविरहित पॅनेल उभे करण्याबाबत निर्णय घेण्याचे संकेतही काकडे यांनी दिले आहेत. त्यामुळे ही भूमिका केवळ निवडणुकीतील स्वतंत्र अस्तित्वाची चाचपणी आहे की विद्यमान राजकीय गटांवर दबाव निर्माण करण्याची रणनीती, याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात सुरू झाली आहे.
दरम्यान, विद्यमान कारखाना व्यवस्थापनाच्या कारभारावरही काकडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. चेअरमन कारखाना स्वतःच्या मालकीचा असल्याप्रमाणे वागत आहेत, सभासदांना प्रश्न मांडण्यापासून रोखले जात असल्याचा, माईक बंद केला जात असल्याचा तसेच सभेचे इतिवृत्त योग्य पद्धतीने नोंदविले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या भूमिकेच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृती समिती सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
विशेष प्रतिनिधी