बीड : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार सध्या बीड जिल्ह्याच्या 2 दिवस दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कामाचा आढावा घेत विविध सुचना जारी केल्या.
गुरुवारी ( दि. 30 जुलै) रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्यानंतर शुक्रवारी (दि. 31 जुलै) सकाळी 7 वाजता, त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यामुळे दोन दिवसीय दौऱ्यावेळी सुनेत्रा पवारांनी केलेल्या कार्यपद्धतीची विशेष करून चर्चा चांगलीच रंगली. (Sunetra Pawar)
CM Fadnavis : राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना अधिक वेग द्यावा; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
गुरुवारी रात्री 11 पर्यंत त्यांनी महत्त्वपूर्ण बैठका घेत प्रशासनाच्या विकासकामांचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी 7 वाजताच त्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, उपचार सुविधा आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सुनेत्रा पवार यांची ही कार्यपद्धत पाहून अनेकाकंडून अजितदादा यांच्या शिस्तप्रिय कार्यशैलीची आठवण काढली जात आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत आल्यानंतर बीडचे पालकमंत्रापद स्वीकारले होते. त्यांनी पदभार स्वीकरल्यानंतर विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या पुढील वाटचालीबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
मात्र, सुनेत्रा पवार यांनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत बैठका घेत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला, नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या. तर दुसऱ्या दिवशी सात वाजता रुग्णालयांची पाहणी करुन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावरुन प्रशासन आणि नागरिकांमध्ये जिल्ह्यातील विकासाचा धागा तुटूणार नाही, अशी भावना स्पष्ट झाली.
सुनेत्रा पवार यांनीही पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर कामकाजाला प्राधान्य देत कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. तर अजितदादांच्या पावलावर पाऊल टाकत कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने कामे सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवारही दादांप्रमाणे विकासाच्या वाटेवर त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल अशी आशा प्रशासन आणि नागरिकांमध्ये दृढ होताना दिसत आहे.

