मुंबई : TET Paper Leak Case महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळाली असून, भिवंडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. घोडके यांच्या न्यायालयाने 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व 15 आरोपींची एकत्रित चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.TET Paper Leak Case
यापूर्वी 12 आरोपी न्यायालयीन कोठडीत, तर दोन आरोपी पोलीस कोठडीत होते. न्यायालयाच्या ताज्या आदेशानंतर सर्व आरोपी आता तपास पथकाच्या ताब्यात असून, त्यांची समोरासमोर चौकशी करून संपूर्ण कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.TET Paper Leak Case
तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल फोन, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल उपकरणे, बँक व्यवहार आणि इतर आर्थिक पुरावे यांची सांगड घालून पेपरफुटी रॅकेटची कार्यपद्धती उघड करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, पेपर कसा लीक झाला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाला नवे वळण 25 जुलै रोजी मिळाले, जेव्हा या रॅकेटचा कथित सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजीत सिंह उर्फ पिकू यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 28 जुलै रोजी फरार आरोपी सोनू कुमार दिवाकर याने भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 15 वर पोहोचली.
सहाय्यक पोलीस आयुक्त विजय मराठे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सर्व आरोपींची एकत्र चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आरोपींच्या जबाबांमधील विसंगती, परस्पर संबंध, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे यांचा परस्पर ताळमेळ लावण्यासाठी संयुक्त चौकशी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता या कालावधीत पेपरफुटी रॅकेटमागील संपूर्ण साखळी, आर्थिक व्यवहार आणि इतर संशयितांचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

