पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून अन्नात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तुकाराम मुंढे यांचा सोशल मीडियावरही प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि एंगेजमेंट रेटमध्ये तुकामार मुंढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा पुढे आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या तुलनेतही त्यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेची आकडेवारी आघाडीवर आहे. ( Tukaram Mundhe )
इन्स्टाग्रामवरील आकडेवारीनुसार तुकाराम मुंढे यांचे ३४ लाख १५ हजार फॉलोअर्स आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २९ लाख २ हजार, तर एकनाथ शिंदे यांचे १३ लाख १ हजार फॉलोअर्स आहेत. गेल्या ६० दिवसांतील पोस्टचा विचार केला तर मुंढे यांनी १३ पोस्ट केल्या आहेत. तर फडणवीस यांनी ९७, तर शिंदे यांनी २५ पोस्ट केल्या. एंगेजमेंट रेटमध्येही मुंढे मोठ्या फरकाने पुढे आहेत. तुकाराम मुंढे यांचा एंगेजमेंट रेट २०.३५ टक्के आहे. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचा ०.५० टक्के आणि एकनाथ शिंदे यांचा ०.२४ टक्के आहे.
'एक्स'वर फॉलोअर्सच्या बाबतीत राजकीय नेते पुढे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ५.०२ लाख, एकनाथ शिंदे यांचे ३.८७ लाख, तर तुकाराम मुंढे यांचे २.६५ लाख फॉलोअर्स आहेत. मात्र एंगेजमेंट रेटमध्ये मुंढे यांची आघाडी कायम आहे. त्यांचा एंगेजमेंट रेट ४.६२ टक्के असून फडणवीस यांचा ०.०७ टक्के आणि शिंदे यांचा ०.०४ टक्के आहे. इतर लोकप्रिय सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तुलनेतही तुकाराम मुंढे पुढे आहेत. इन्स्टाग्रामवर मुंढे यांचे ३४.१५ लाख फॉलोअर्स आहेत. समीर वानखेडे यांचे ८.४७ लाख, तर विश्वास नांगरे पाटील यांचे ६.१२ लाख फॉलोअर्स आहेत. तुकाराम मुंढे यांचे अधिकृत व्हेरिफाइड फेसबुक पेज उपलब्ध नसल्याने या तुलनेत फेसबुकचा समावेश करण्यात आलेला नाही.
पण उपलब्ध आकडेवारीनुसार, तुकाराम मुंढे यांच्या सोशल मीडिया खात्यांवर पोस्टची संख्या तुलनेने कमी असली तरी त्यांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यामुळे फॉलोअर्सच्या संख्येबरोबरच त्या फॉलोअर्सचा प्रत्यक्ष सहभागही सोशल मीडिया प्रभाव मोजताना महत्त्वाचा ठरत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे. कमी पोस्ट्स आणि प्रचंड प्रतिसाद यामुळे तुकाराम मुंढे हे केवळ एक अधिकारी न राहता सोशल मीडियावरील एक मोठा 'डिजिटल ब्रँड' बनले आहेत.

