Saturday, 25 Sep, 11.07 am BBC News मराठी

होम
आहार: रंगीबेरंगी जेवण खरंच फायदेशीर आहे का? तुमच्या ताटात किती रंगांचे पदार्थ असतात?

आपल्यापैकी बहुतांश लोकांना दिवसातून अनेकदा एकच प्रश्न पडत असतो की, काय खावं? याबाबत निर्णय घेताना किंमत, उपलब्धता आणि प्राधान्याबरोबरच ते किती आरोग्यदायी आहे, याचीही निर्णय घेण्यात मोठी मदत होत असते.

पण आपण घेत असलेल्या एकूण आहाराचा विचार करता, आपल्याला आवश्यक असलेली पोषणतत्वे आपण आहारातून घेत आहोत का? हे आपल्याला कसे कळते.

आपण वैविध्यपूर्ण आहार घ्यायला हवा, असं बहुतांश अभ्यासकांचं मत आहे. पण त्यासाठी उत्तम पद्धत म्हणजे इंद्रधनुष्यातील सर्व रंगांचे पदार्थ खाणे म्हणजे सप्तरंगी आहार. पण योग्य पोषणतत्वे मिळवण्यासाठी रंग हे खरंच उत्तम मार्गदर्शक आहेत का?

याचा पुरावा भूमध्य आहारात असू शकतो. त्यात मोठ्या प्रमाणावर फळं, भाजीपाला आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल अशा आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असतो. या आहाराला अनेकदा तज्ज्ञांनी आरोग्यदायी आहार अशी मान्यता दिली आहे.

विशेष म्हणजे हा आहार विविध रंगांनी युक्त असतो, हा काही केवळ योगायोग नाही असं फ्लोनेन्स युनिव्हर्सिटीतील क्लिनिकल न्युट्रिशन विषयाचे सहयोगी प्राध्यापक फ्रान्सेस्को सोफी म्हणाले.

भूमध्य आहार सर्वांत पोषक?

"पारंपरिक भूमध्य आहाराचं सेवन करणं म्हणजेच तुम्ही विविध प्रकारची पोषकतत्वे (न्यूट्रिएंट्स) आणि फायटोन्यूट्रिएंट्स यांचं सेवन करणं," असं ते म्हणाले. फायटोन्यूट्रिएंट्स हे वनस्पतींनी तयार केलेले सूक्ष्म रासायनिक संयुगं (chemical compounds) असतात. ती मोठ्या पोषक तत्वांच्या पचनासाठी मदत करतात, तसंच शरिरातून विषारी तत्वं बाहेर काढण्यासाठीही फायदेशीर असतात.

"मात्र आहारामध्ये प्रत्येकवेळी आवश्यक त्या रंगाच्या पदार्थाचा समावेश असू शकत नाही. कारण ते ऋतू, हंगामावर अवलंबून असतं. कारण आहार सेवन करताना आपण हंगामानुसार, स्थानिक आणि स्वतः पिकवलेली फळं आणि भाज्या यांचं सेवन करतो.

भाजीपाल्याचा समावेश असलेल्या शाकाहारी आहारासारख्या इतर आहारांमध्ये रंगांचा फारसा फरक नसतो. तसंच भूमध्य आहार सर्वात आरोग्यदायी असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे या भागातील लोक भाज्या तळण्याऐवजी उकडून खातात. त्यामुळं त्यातली पोषकतत्वं कायम राहतात, असं सोफी म्हणाले.

मात्र, आहारामध्ये फळं आणि भाज्या यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्याकडं दुर्लक्ष करता कामा नये. पोषण शास्त्रात वारंवार समोर येणाऱ्या तथ्यांचा विचार करता फळं आणि भाज्या यांचा विपुल प्रमाणात समावेश असलेला आहार आपल्या मेंदू आणि हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतो, असं ओरेगॉन येथील वेस्ट स्टेट्स युनिव्हर्सिटीतील आहार तज्ज्ञ डेन्ना मिनिच या म्हणाल्या.

रंगीबेरंगी आहाराचे फायदे काय?

अनेक रंगांच्या आहाराचं सेवन केल्यानं, तुमचा प्रमुख पोषणतत्वं न मिळण्याचा धोका कमी होतो.

"आपण इंद्रधनुष्यातील एखादा रंग आहारात सेवन न करणं म्हणजे त्या अन्नापासून होणाऱ्या फायद्यापासून वंचित राहणं," असं मिनिच म्हणाल्या.

त्याचं कारण म्हणजे रोपांपासून मिळणाऱ्या आहारांमध्ये फायटोन्युट्रिएंट्स नावाची हजारो नैसर्गिक संयुगं असतात. त्यात दाहकता किंवा उष्णता कमी करणारी कॅरोटेनॉईड्स आणि फ्लेव्होनॉईड्स अशा तत्वांचा समावेश असतो. शिवाय विविध रंगांच्या रोपांमध्ये विविध प्रकारचे फायदे असतात.

ब्लूबेरीजसह निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये उच्च प्रमाणात अँथोसायनिन (anthocyanin)हे रंगद्रव्य असतं. त्यामुळं हृदयरोग आणि दोन प्रकारच्या मधुमेहाचा धोका कमी होतो. अन्नाला पिवळा रंग प्रदान करणाऱ्या फ्लॅव्होन्समुळंदेखील हृदयरोगाचा धोका कमी होतो.

"काही रोपांमधली रंगद्रव्यं ही शरिरात विविध भागांपर्यंत जातात आणि त्याठिकाणीच राहून त्यांचं कार्य करतात," असं मिनिच म्हणाल्या. "उदाहरण द्यायचं झाल्यास, पिवळ्या आणि हिरव्या अन्नामध्ये ल्युटेन आढळते आणि ते डोळ्याचा मागचा भाग (macula)पर्यंत जाते. त्याठिकाणी ते macular degeneration चा धोका कमी करण्यास मदत करते.

अल्झायमर या आजाराशी संबंधित असलेल्या न्यूरोटॉक्सिसिटीला मेंदूमध्ये रोखून फ्लॅव्होनॉईस्स हे मेंदूला अधिक निरोगी बनवू शकतात, असं काही संशोधनावरून समोर आलं आहे.

हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील साथरोग विभागातील संशोधक तियान-सिन येह यांनी 50 हजार लोकांच्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळ घेतलेल्या आहाराबाबतचा अभ्यास केला. त्यानुसार संत्री, मिरची, सेलेरी (ओव्याचं रोप) आणि द्राक्षासारख्या अधिकाधिक फ्लॅव्होनाईड्स युक्त पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये cognitive impairment (विसरभोळेपणा किंवा एखादी गोष्ट उशिरा समजणे) आणि dementia (स्मृतीभ्रंश) याचं प्रमाण कमी होतं, असं त्यांना आढळून आलं.

Dementia आणि cognitive impairment यावर सध्या तरी योग्य असे उपचार नसल्याने, फ्लॅव्होनाईड्स असलेले अन्न अधिकाधिक सेवन केल्यास याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. ज्या लोकांनी सातत्यानं अशाप्रकारेच अन्न सेवन केलं, त्यांना याबाबत फायदा दिसून आला.

अशा प्रकारच्या अन्नाचा आपल्या आहारात समावेश करण्यासाठी किंवा फ्लॅव्होनाईड्सचा फायदा मिळवण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो, असं येह म्हणतात.

विविध रंगांचा समावेश असलेल्या आहाराचं सेवन केल्यामुळं, सतत एकच पदार्थ खाल्ल्यामुळं होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही रक्षण होतं, असं येह म्हणतात.

अशा आहार सेवनाचे तोटेही?

"अन्न हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास संशोधनात हे समोर आलं आहे की, संत्र्याचा ज्यूस प्यायल्यानं cognitive decline चा धोका कमी होतो, पण त्याचं सेवन अधिक प्रमाणात केल्यास टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो," असं त्या म्हणाल्या. मात्र त्याचं कारण यामध्ये असलेलं साखरेचं प्रमाण आहे, फ्लॅव्होनॉईड्स नव्हे.

तसंच, सर्व रंगांचा समावेश असलेल्या आहाराचं सेवन करणं हेदेखिल गुंतागुंतीचं ठरू शकतं, असं ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनमधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ व्हिक्टोरिया टेलर म्हणाल्या.

"दररोज प्रत्येक रंगाचं अन्न मिळवणं अत्यंत कठीण ठरू शकतं, त्यामुळं तुमचा संभ्रम प्रचंड वाढू शकतो," असंही त्या म्हणाल्या.

प्रथिनांसारखी (protein) सर्व सूक्ष्म पोषणतत्वे मिळवण्यासाठी आपल्याला इतर गटांमधील अन्नाचं सेवन करणंही गरजेचं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

मात्र रेनबो डाएट किंवा सर्व रंगांच्या अन्नाचा समावेश असलेला आहार हा केवळ फळं आणि भाज्या यांपुरताच मर्यादीत नाही. तर त्यात औषधी वनस्पती, मसाले, शेंगा, नट्स, बिया, धान्य आणि चहा याचाही समावेश होतो, असं मिनिच म्हणाल्या.

पांढऱ्या रंगाचे पदार्थही याचाच एक भाग असल्याचंही त्या सांगतात. त्यात टोफूचाही समावेश होतो. त्यामध्ये अनेक प्रकारचे आइसोफ्लेव्होन्स असतात. त्यामुळं हृदयरोग, काही प्रकारचे कर्करोग आणि cognitive decline याचा धोका कमी होतो.

विविध रंगांचं आहारात सेवन करणं याचा अर्थ जास्तीत जास्त फळं आणि भाज्या खाणं असा होऊ शकतो. एका अभ्यासानुसार लोकांना विविध रंगांचं अन्न सेवन करण्यास सांगणं यामुळं त्यांचं अधिक आरोग्यदायी पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण वाढतं.

"जर तुम्ही एकाच प्रकारचं फळ सेवन केलं तर तुम्ही समाधानी होता. पण विविध रंगांच्या विविध फळांचटी प्लेट समोर आली तर तुम्ही अधिक काळ ते खाऊ शकता," असं स्वान्सिया विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थिनी रोशेल एम्ब्लिंग म्हणाल्या. संशोधकात त्यांचा सहभाग नव्हता.

"हा परिणाम खात असलेल्या अन्नाशी संबंधित असतो, त्यामुळं जेवणानंतरही गोड पदार्थ हा खावासा वाटत असतो. कारण त्याची काही वेगळी वैशिष्ट्ये असतात, असं एम्ब्लिंग म्हणाल्या.

पण अधिक रंगाचा समावेश असलेल्या अन्नाचा आहार घेण्यानं आरोग्यास अपायकारक पदार्थ अधिक खाण्याचा धोकाही असतो. पिझ्झावर विविध रंगांच्या टॉपिंग्जचा समावेश असल्यासं त्यासाठी जास्त पिझ्झा खाण्याची शक्यता असते, असं एम्बलिंग म्हणाल्या. फळं आणि भाज्या खाताना विविध रंगांच्या पदार्थांचं सेवन करावं मात्र इतर वेळी किंवा दुसऱ्या पदार्थांसाठी तसं करण्याची गरज नाही, असा सल्ला त्या देतात. त्याचबरोबर केक आणि गोड पदार्थांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केलेला असतो, त्याचा समावेश आरोग्यदायी पदार्थांमध्ये होत नाही, हेही लक्षात घेणं म्हत्त्वाचं आहे.

काही संशोधकांनी पदार्थाच्या चवीकडं लक्ष वेधलं. पोषकतत्वे आणि फायटोन्युट्रिएंट्स मिळवण्यासाठी रंगाशिवाय इतरही मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलं.

कडू किंवा अत्यंत तीव्र चव असलेल्या भाज्या 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ सेवन केल्यानं रक्तदाब कमी होतो आणि रक्तातील साखरेचं प्रमाणही कमी होतं, हे एका अभ्यासावरून स्पष्ट झालं आहे. त्यात असलेल्या फायबर आणि फायटोन्युट्रिएंट्समुळं हा फायदा होतो.

"मूळयुक्त भाज्या आणि कोबी यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स, फ्लॅव्होनाईड्स, कॅरोटेनॉईड्स आणि इतर फायटोन्युट्रिएंट्स असतात. संपूर्ण आहारात याचा समावेश असल्यास त्याचे आरोग्यावर, चांगले परिणाम पाहायला मिळतात, असंही संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

"अन्नाचे रंग हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणं चवही म्हत्त्वाची आहे. विशेषतः रॉकेट, केल, सेरियाक आणि ग्रीन टी अशा तीव्र किंवा कडसर चव असलेल्या भाज्यांचा त्यात समावेश होतो," असं मिनिच म्हणाल्या. त्यांचा संशोधनात समावेश नव्हता मात्र या संयुगांचा एकमेकांवर होणारा परिणाम आणि त्याचे फायदे याबाबत त्या सहमत आहेत.

दुसरा एक पर्याय म्हणजे आपण वनस्पती किंवा रोपाचा कोणता भाग खात आहोत, हा असल्याचं येह म्हणाल्या.

"टर्निप्स आणि स्वीड्स यांच्यात सारखीच पोषक तत्वे असतात. कारण ती दोन्ही मूळं आहेत. पण कोबी आणि स्वीड्स यांच्यात पोषकतत्वे सारखी असू शकत नाहीत. कारण एक रोपाचं पान आहे तर एक मूळ."

"मात्र, रंगांचा विचार करता ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते अधिक सोपं आहे," असं येह म्हणाल्या.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top