Sunday, 24 Jan, 10.53 am BBC मराठी

होम
आंघोळीनंतर त्वचेला सुरकुत्या का पडतात?

पाण्यात जास्त वेळ राहिल्यानंतर आपल्या बोटांना सुरकुत्या पडतात, पण शरीराच्या इतर भागांवर तसा परिणाम दिसत नाही, असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पकड घेणाऱ्या हातांच्या उत्क्रांतीमध्ये लपलेलं आहे.

मानवी त्वचेवरील काही भाग, केशहीन त्वचा म्हणून ओळखले जाणारे भाग पाण्याला विलक्षण प्रतिसाद देतात. आपली हाता-पायाची बोटं आणि तळवे बऱ्यापैकी ओले झाल्यानंतर तिथे सुरकुत्या पडतात. असं शरीराच्या बाकी जागी होत नाही. हात किंवा पाय सर्वसाधारणतः पाचेक मिनिटं पाण्यात राहिले की हा परिणाम दिसतो.

पण त्वचेचे हे भाग का सुरकुतात? ही जैवरासायनिक प्रतिक्रिया असते, असं काही जण मानतात- या परासरणी प्रक्रियेमध्ये पाण्यामुळे आपल्या त्वचेतील काही संयुगं काढून घेतली जातात, त्यामुळे त्वचा सुकून जाते, रखरखीत होते.

पण सुमारे शतकभरापूर्वीच वैज्ञानिकांना माहीत होतं की ही विस्मयकारक प्रतिक्रिया केवळ साधी प्रतिक्षिप्तक्रिया किंवा परासरणी क्रिया नाही.

बोटांमधील काही नसा कापल्या गेल्या, तर सुरकुत्या येणंही बंद होतं, असं काही शल्यविशारदांना दिसून आलं. त्यामुळे सुरकुत्या येणारी बोटं सुरक्षित चेतासंस्थेची खूण मानली जाऊ लागली. इतर वेळी प्रतिक्रियाशून्य असलेल्या रुग्णांच्याबाबतीत अनुकंपी चेतासंस्था कार्यरत आहे का, हे तपासण्यासाठी सुरकुत्यांची प्रक्रिया वापरली जाते.

या सगळ्या गोष्टींबाबत वैज्ञानिक समुदायामध्ये एकमत आहे. पण ओलेपणाने बोटं सुरकुतण्याची प्रतिसाद-प्रक्रिया उत्क्रांतीतून निपजली असेल का व असल्यास कशी निपजली, आणि मुळात त्यात परिस्थितीशी अनुकूल होण्याचा संदर्भ येतो का, याबद्दल मात्र वाद सुरू राहिले आहेत.

'2एआय लॅब्स'चे चेताजीवशास्त्रज्ञ मार्क चंगिझी यांच्या मते, परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेतूनच हे घडतं. उदाहरण म्हणून टायरवरच्या खाचांचा विचार करा. कोरडी हवा असते तेव्हा गुळगुळीत टायर डांबरावर चांगली पकड राखून धावू शकतो. त्यामुळे शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कारचे टायर खास गुळगुळीत आणि इतर काही वैशिष्ट्यं नसलेले असतात. पण पावसात गाडी चालवत असताना खाचा असलेले टायर खूप जास्त सुरक्षित ठरतात.

तर, सुरकुतलेली बोटं ओल्या व कोरड्या परिस्थितीतही पकड ठेवण्याच्या दृष्टीने सुसंगत ठरतात. एखादं जैविक वैशिष्ट्य परिस्थितीशी अनुकूल होण्यासाठी विकसित झालेलं आहे, असं सिद्ध करणं अत्यंत अवघड असतं. मग ते तसं विकसित का झालं असेल, हे शोधणं तर महाकठीण होऊन जातं. पण संशोधक काही संकेतांचा शोध घेतात आणि त्यातून विशिष्ट वैशिष्ट्य अनुकूलनप्रक्रियेतून निपजलं आहे अथवा नाही याचा अंदाज बांधता येतो.

पावसामध्ये सुरुकुतलेली बोटं खाचांसारखी वापरली जातात आणि हाता-पायाच्या बोटांवरचं पाणी वाहून जातं, त्यामुळे नरवानर गणामधील प्राण्यांना- विशेषतः मानवाला व मॅकाक्वींना- पकड घट्ट ठेवता येते, असा पुरावा 2011 साली चंगिझी व त्यांच्या सहकाऱ्यांना सापडला.

निराळ्या शब्दांत सांगायचं तर, पाण्यात जास्त वेळ राहिल्यावर तयार होणाऱ्या सुरकुत्या म्हणजे नदीच्या पाणलोट क्षेत्रासारखा प्रकार असतो, त्यात विविध झरे एकत्र येऊन अधिक मोठा प्रवाह असलेले ओढे निर्माण होतात, ते शेवटी नदीला मिळतात. असंच झाडांच्या छोट्या डहाळ्या फांद्यांना लागून असतात आणि फांद्या झाडाच्या खोडाला जोडलेल्या असतात. तर, झरे आणि ओझे यांच्यातील जमिनीचे तुकडे एकमेकांपासून तुटलेले असतात.

प्रायमेटच्या सुरकुतलेल्या बोटांची वैशिष्ट्यं नदीपात्रांशी जुळणारी आहेत का, हे बघण्यासाठी चंगिझी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवी बोटांच्या 28 छायाचित्रांचं विश्लेषण केलं. तेव्हा त्यांना बोटांवरच्या सुरकुत्यांची रचना नदीखोऱ्याच्या संपूर्ण उलट असल्याचं दिसून आलं, त्यात उंचसखल त्वचेच्या परस्परांशी जोडलेल्या रेषांचं 'झाड' दिसून आलं, त्यात अधेमधे, परस्परांहून वेगवेगळ्या सुरकुत्या होत्या.

या खाचा आकस्मिकरित्या आल्यासारख्या नव्हत्या, त्यामुळेच त्याचा उलटा आकृतिबंध अर्थपूर्ण ठरत होता. नद्यांमध्ये पाणी एकत्र येत असतं, तर सुरकुतलेल्या बोटांवरच्या खाचा पाणी बाहेर काढत असतात.

"ओल्या पृष्ठभूमीवर बोटांची टोकं दाबल्यावर त्यावरच्या खाचांमधून पाणी बाहेर जातं आणि एकदा दाबलं गेल्यावर मग संपूर्ण बोटाची त्वचा पृष्ठभूमीला लागते," असं संशोधक सांगतात.

शिवाय, पाच मिनिटं सतत पाण्याशी संपर्क आला तरच सुरकुत्या येतात, म्हणजे थोडक्यात आलेला संपर्क सुरकुत्या येण्यासाठी पुरेसा नसतो. प्रतिसादाची ही पद्धत पावसाळ्यात किंवा धुक्याच्या वातावरणात उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे समुद्रातील पाण्यापेक्षा गोड्या पाण्यामध्ये हा प्रतिसाद जास्त चटकन दिला जातो. त्यामुळे नरवानर गणामध्ये कोणत्या परिस्थितीत हे वैशिष्ट्य विकसित झालं असेल याचा अंदाज यातून येतो.

ओलेत्या हातांना सुरकुत्या पाडतात, हे वैशिष्ट्य उघडपणे पकड घट्ट राहण्यासाठी विकसित झालेलं नसेल, तरी ते अशा कामासाठी उपयुक्त ठरतंच. ब्रिटिश चेतावैज्ञानिकांनी 2013 साली केलेल्या एका अभ्यासानुसार लोकांना ओल्या वस्तू हाताळण्यासाठी सुरकुतलेली बोटं उपयोगी पडतात असं दिसून आलं.

या प्रयोगामध्ये 20 लोकांना वेगवेगळ्या आकाराच्या 45 वस्तू एका भांड्यातून उचलून दुसऱ्या भांड्यात टाकायच्या होत्या. या सर्व वस्तू म्हणजे गोट्या व फिशिंग वेट होत्या. काही वस्तू कोरड्या होत्या, तर सहभागी व्यक्तींची बोटं गुळगुळीत किंवा सुरकुतलेली होती. काही वस्तू पाण्यात बुडालेल्या होत्या. या प्रयोगातून संशोधकांना असं लक्षात आलं की, सुरकुतलेली बोटं असलेल्या सहभागी व्यक्तींना पाण्यात बुडालेल्या वस्तूंचं हस्तांतरण अधिक वेगाने करणं शक्य झालं, पण सुक्या वस्तूंच्या बाबतीत याचा काही विशेष वेगळा परिणाम दिसला नाही.

परंतु, 2014 साली जर्मन संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये याच्या उलटे निष्कर्ष निघाले. या अभ्यासामध्ये संशोधकांनी 40 लोकांना वेगवेगळ्या आकाराच्या व वजनाच्या 52 गोट्या व फासे एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकायचे होते. परंतु, वस्तू हाताळण्याच्या सहभागी व्यक्तींच्या क्षमतेमध्ये संशोधकांना काही मोठा फरक दिसून आला नाही. बोटं गुळगुळीत असोत वा सुरकुतलेली आणि वस्तू सुक्या असोत वा पाण्यात बुडालेल्या, सर्व परिणाम कमी-अधिक सारखेच आले.

त्याचप्रमाणे काही तैवानी संशोधकांनी एका 24 वर्षीय पुरुष स्वयंसेवकाच्या मदतीने अनेक प्रयोग केले. स्वयंसेवकाच्या गुळगुळीत किंवा सुरकुतलेल्या बोटाच्या टोकांनी एका गुळगुळीत पृष्ठभूमीवर घर्षण करून, त्याचं मोजमाप संशोधकांनी केलं. उदाहरणार्थ, बारवरून हात फिरवताना त्याच्या हातातून किती बळ लावलं जात होतं, हे तपासलं. स्प्रिंगची दोन्ही टोकं दाबताना तो किती ताकद लावतो, याचंही मोजमाप संशोधकांनी केलं. यात त्यांना असं आढळलं की, दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमध्ये सुरकुतलेल्या बोटांनी संथ कामगिरी केली.

समजा ओलेपणामुळे तयार होणाऱ्या सुरकुत्या अनुकूलनाच्या प्रक्रियेतून निर्माण झाल्या असतील, तरी उपरोक्त प्रयोग जिथे घडले त्या प्रयोगशाळांमधील नियोजित परिस्थितीसारख्या वातावरणाला दिलेला तो प्रतिसाद निश्चितपणे नव्हता.

ओलेपणामुळे बोटांना पडणाऱ्या सुरकुत्या छोट्या वस्तू हाताळण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या शरीराचं वजन सांभाळण्यासाठी उपयोगी असतात, असं चंगिझींना वाटतं.

"खरोखरच अर्थपूर्ण मानता येईल अशी वर्तनविषयक चाचणी करून बघायची असेल, तर छोट्यामोठ्या गोट्या पकडून ते करता येणार नाही, त्यासाठी झाडं किंवा अवजड वस्तूंवर पकड कशी बसते, हे पाहावं लागेल," असं ते म्हणतात. गोट्या या बादलीतून त्या बादलीत टाकायच्या असतील, तेव्हा त्यात काही 'पाण्यामुळे टायरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटतो तितकी मोठी धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसते.'

सुरकुतलेल्या त्वचेचा हस्तकौशल्यापेक्षा चलनशक्तीवर कोणता परिणाम होतो, याचं मोजमाप करणं महत्त्वाचं ठरेल.

यासाठी त्यांना कोणता प्रयोग आदर्श वाटतो? पार्कर (Parkour: अडथळे पार करण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने उड्या मारत पुढे जाण्याची एक प्रशिक्षणपद्धत) पद्धतीमधील तज्ज्ञांनी त्यांची कौशल्यं सुरकुतलेल्या हाता-पायांनी आणि न सुरकुतलेल्या हातापायांनी, ओलसर वा कोरड्या परिस्थितीत करून दाखवायची, हा एक प्रयोग असू शकतो. "पण हे अर्थातच सुरक्षित रितीने करावं लागेल," असंही ते नमूद करतात.

वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top