Dailyhunt
आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट, 'समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश'

आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट, 'समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश'

कार्डिलिया क्रुजवर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्लिनचिट दिली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने कोर्टात 6000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं.

आर्यन विरोधात कोणताही पुरावा नसल्याचं त्यांनी मांडलं आहे.

"आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नसताना त्याला 26 दिवस तुरुंगात ठेवणं हे अन्यायकारक आहे. ड्रग्ज सापडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. NDPS कायद्याचा भंग झाला आहे हे सिद्ध करणारी एकही वस्तू सापडली नाही. संजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालील SIT ने या प्रकरणाची अत्यंत पारदर्शीपणे या प्रकरणाची चौकशी केली आणि पुरेसे पुरावे नसताना त्याच्याविषयी केस दाखल न करण्याचा निर्णय घेतला याचा आम्हाला आनंद आहे," असं आर्यन खानचे वकील सतिश माने-शिंदे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे.

वानखेडेंवर कारवाईचे आदेश

या प्रकरणी तत्कालिन NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर संशयास्पद तपासाबद्दल सक्षम यंत्रणांना कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. सूत्रांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली आहे.

यापूर्वी काय घडलं?

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनाही कोर्टाने जामीन 28 ऑक्टोबर 2021 रोजी मंजूर केला होता. कोर्टाने दोन ते तीन दिवस या प्रकरणाची सुनावणी घेतली.

या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी आर्यन, अरबाज आणि मुनमुन या तिघांनी कोर्टासमोर जामीन अर्ज दाखल केला होता.

सध्यातरी या तिघांना जामीन मिळाला असून बाकीच्या आरोपींनी अर्ज केल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

27 ऑक्टोबरला न्यायालयात काय झालं?

आरोपी 1,2,1 यांचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. पुढील युक्तिवाद उद्या दुपारी 3 वाजता होईल असं मुनमुन धमेचाचे वकील काशिफ खान देशमुख यांनी सांगितलं.

आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ यांच्या जामीन अर्जावर झालेल्या युक्तिवादानंतर उद्या एनसीबीतर्फे अनिल सिंग युक्तीवाद करतील.

"मी फॅशन मॉडेल आहे, मी स्टेज शो करते, रॅम्प वॉक करते, माझ्या व्यावसायिक कारणानिमित्त मला क्रुझवर बोलवण्यात आलं होतं", असं मुनमुन धमेचातर्फे बाजू मांडण्यात आली.

काल आर्यन खानचे प्रतिनिधित्व प्रसिद्ध विधिज्ञ आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केले. या युक्तिवादादरम्यान ते म्हणाले, आर्यन खान निर्दोष आहे.

रोहतगी म्हणाले, "आर्यन कॅलिफोर्नियतात शिकत होता 2020 ला भारतात आला. त्याला पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. अरबाजलाही बोलावण्यात आलं होतं. दोघही एकत्र पोहोचले."

"बहुदा NCB ला क्रूजवर लोक ड्रग्ज घेणार असल्याची माहिती होती. त्यामुळे ते मोठ्या संख्येने उपस्थित होते," असं रोहतगी म्हणाले.

'अरबाज मर्चंटच्या बुटात ड्रग्ज सापडले तर या प्रकरणात आर्यन कसा दोषी ठरेल?' असा प्रश्न रोहतगी यांनी विचारला.

याआधी, मुंबईच्या एका विशेष एनसीबी कोर्टानं आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

वृत्तसंस्था ANI नुसार, आर्यन खान याच्यासहित अरबाज मर्चंट आणि इतर 8 आरोपींचीही कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

याचा अर्थ उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास या सगळ्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.

याआधी ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी शाहरूख खानने भेट घेतली तर त्याच वेळी एनसीबीचे पथक शाहरूखचे निवासस्थान 'मन्नत' या ठिकाणी चौकशीसाठी दाखल झालं.

आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरुखने मुलाची भेट घेतली. त्याच दिवशी एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून शाहरुख खानच्या घरी तपास करण्यात आला.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, "आर्यन खान प्रकरणाच्यासंबंधी तपास करण्यासाठी एनसीबी अधिकारी शाहरुख खानच्या घरी गेले होते. हा कुठल्याही प्रकारचा छापा नव्हता." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जेलमध्ये कोरोनासंसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कुटुंबीयांना कैद्यांची भेट/मुलाखत बंद केली होती.

कोरोनासंसर्ग नियंत्रणात असल्याने 21 ऑक्टोबरपासून जेल प्रशासनाने कोरोना नियम पाळत कैद्यांना भेटण्यासाठी परवानगी पुन्हा सुरू केलीये.

मुलाला भेटण्यासाठी शाहरूख पोहोचला जेलमध्ये

गुरूवारी सकाळी 9 वाजता अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये पोहोचला.

ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय.

पोलिसांच्या बंदोबस्तातात शाहरुख मुलाला भेटण्यासाठी जेलमध्ये दाखल झाला.

शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आज कसा पोहोचला?

कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका पाहाता आर्थर रोड जेल प्रशासनाने वकील आणि कैद्यांच्या कुटुंबीयांना कैद्यांना जेलमध्ये भेटण्यावर बंदी घातली होती.

त्यामुळे आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांची भेट शक्य नव्हती.

महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे आर्थर रोड जेल प्रशासनाने वकील आणि नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी दिलीये.

आर्थर रोड जेल प्रशासनाने याबाबतची नोटीसही जेलबाहेर लावली आहे.

या नोटीसमध्ये असं लिहिण्यात आलंय, "बंदी नातेवाईक आणि वकील प्रत्यक्ष भेट/मुलाखत कोरोनाबाबात सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून 21 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहेत."

"एकावेळी कैद्याच्या जास्तीत जास्त दोन नातेवाईकांनाच भेट घेता येईल."

शाहरुख-आर्यन समोर आल्यावर काय घडलं?

मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात शाहरूख खान आणि आर्यनची 15-20 मिनिटं भेट झाली.

सुरुवातीला टोकन देऊन शाहरुख खानला तुरुंगात प्रवेश देण्यात आला.

दोघांच्या भेटीदरम्यान 4 सुरक्षा रक्षक त्याठिकाणी उपस्थित होते.

शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्यात ग्लास पार्टिशन लावण्यात आलेलं होतं.

तुरुंग प्रशासनाकडून मिळालेला भेटीचा वेळ संपल्यानंतर शाहरुख खान स्वतःहून निघून गेला, अशी माहिती मिळाली आहे.

आर्यनच्या अटकेवेळी शाहरूख परदेशी होता

2 ऑक्टोबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान त्यावेळी दुबईत होता.

त्यामुळे त्याला आर्यन खानची भेट घेता आली नव्हती.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi