Wednesday, 20 Jan, 1.18 pm BBC मराठी

होम
अजिंक्य रहाणेला विराट कोहलीऐवजी कॅप्टन करा, सोशल मीडियावर वाढता सूर

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नव्या खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकून दिल्याने अजिंक्य रहाणेलाच टेस्ट टीमचा कर्णधार करावं असा सूर सोशल मीडियात उमटू लागला आहे.

विराट कोहली कर्णधार आणि अजिंक्य रहाणे उपकर्णधार अशी संरचना गेली अनेक वर्ष आहे. कर्णधार दुखापत किंवा अन्य कारणांमुळे खेळू शकला नाही तर उपकर्णधाराकडे नेतृत्व सोपवण्यात येतं. कोहली आणि रहाणेच्या स्वभावात प्रचंड फरक आहे. विराट आक्रमक स्वरुपाचा आहे तर अजिंक्य शांत आहे. मात्र दोघंही आपापलं काम जाणतात.

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवावं आणि कोहलीने बॅटिंगवर लक्ष केंद्रित करावं अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली यांनीही अजिंक्य रहाणेकडे टेस्ट संघाचं नेतृत्व द्यावं आणि कोहलीने वनडे तसंच ट्वेन्टी-२०मध्ये संघाची कमान सांभाळावी असं म्हटलं आहे.

हर्ष गोएंका यांनीही रहाणेला टेस्ट कॅप्टन करावं असं म्हटलं आहे.

स्पिल्ट कॅप्टन्सीची वेळ झाली आहे. रहाणेकडे टेस्ट आणि वनडे कोहली

रहाणेला टेस्ट कॅप्टन करणं हा चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण असेल असं अनेकांनी म्हटलंय

रहाणेलाच कर्णधारपदी कायम ठेवता येईल का? असं नेटिझन्सनी म्हटलं आहे

कोहली खेळाडू म्हणून भारी आहे पण कर्णधारपद रहाणेकडेच द्यायला हवं असं अनेकजण म्हणत आहेत.

"एवढं सगळं असूनसुद्धा रहाणे ला कायम चे कप्तान पद मिळणार नाही. कोहोली बद्दल राग किंवा असूया नाही परंतु त्याचे ते शिव्या देणं फुकटचा माज दाखवत फिरणं. कामगिरी चांगली आहेच त्याची पण वर्तन ही तसे हवे. धोणी, रहाणे, रोहित. यांच्या वर्तनात शिस्त आणि नम्रपणा दिसून येतो", असं नेटिझन अमोल गोखले यांनी म्हटलं आहे.

रहाणेलाच कर्णधारपदी कायम ठेवा असं असंख्य क्रिकेटचाहते म्हणू लागले आहेत.

रहाणेचं नेतृत्व

2017 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर असताना धरमशाला टेस्टमध्ये विराट कोहली दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकला नाही. साहजिकच उपकर्णधार असलेल्या रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. रहाणेने पाच बॉलर्ससह खेळण्याचा निर्णय घेतला.

आधीच्या रांची इथे झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडिया चार बॉलर्सच्या आक्रमणासह खेळली होती. फास्ट बॉलर इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला. कोहलीच्या ऐवजी बॅट्समन खेळवण्याऐवजी रहाणेने चायनामन बॉलर कुलदीप यादवला संघात समाविष्ट केलं.

रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव असे तीन स्पिनर आणि भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव असे फास्ट बॉलर असं पाच बॉलरचं आक्रमण होतं. टीम इंडियाने दमदार बॉलिंगच्या बळावर धरमशाला टेस्ट जिंकली. टेस्ट मॅचेसमध्ये नेतृत्व करण्याची ती रहाणेची पहिलीच वेळ होती. मात्र रहाणेच्या नेतृत्वामध्ये नवखेपणाची झलक जराही पाहायला मिळाली नाही.

2018 मध्ये अफगाणिस्तानने आपल्याविरुद्ध पहिली टेस्ट खेळली. एकमेव अशा त्या टेस्टसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. अफगाणिस्तान वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मात्र टेस्ट किंवा चारदिवसीय क्रिकेट खेळण्याचा त्यांचा अनुभव मर्यादित आहे. टीम इंडियाने याचा पुरेपूर फायदा उठवत अफगाणिस्तानवर डावाने विजय मिळवला.

आधुनिक कालखंडातील कर्णधार फॉलोऑन देताना विचार करतात. कारण प्रतिस्पर्धी संघाने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली तर चौथ्या डावात खेळावं लागतं. रहाणेने फॉलोऑन दिला आणि टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.

मॅच संपल्यानंतर टीम इंडियाला ट्रॉफीसह फोटोसेशन असतं. रहाणेने त्यावेळी वेगळेपण सिद्ध केलं. त्याने अफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाला फोटोसाठी बोलावलं. अतिशय संघर्षमय परिस्थितीत क्रिकेट शिकून वाटचाल करणाऱ्या अफगाणिस्तानचा रहाणेने अशाप्रकारे सन्मान केला.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी

पॅटर्निटी लिव्हवर जात असल्याने बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अॅडलेड टेस्टनंतर विराट कोहली मायदेशी परतला. अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय संघ दुसऱ्या डावात 36 वर ऑलआऊट झाला होता. यामुळे भारतीय संघावर जोरदार टीका होत होती. भारतीय संघ मालिकेत 4-0 हरेल असं भाकीत असंख्य क्रिकेट समीक्षक, माजी खेळाडूंनी वर्तवलं होतं.

कोहलीची उणीव कप्तान म्हणून आणि मुख्य बॅट्समन म्हणून जाणवणार होती. त्याचवेळी दुखापतींचं ग्रहण भारतीय संघाला लागलं होतं. मोहम्मद शमीसारखा गुणी फास्ट बॉलर मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. अॅडलेड टेस्ट खेळणाऱ्या पृथ्वी शॉ आणि वृद्धिमान साहा यांना वगळण्याचा निर्णय रहाणे आणि संघव्यवस्थापनाने घेतला. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना संघात समाविष्ट करण्यात आलं. या दोघांनी उर्वरित तीन सामन्यांमध्ये सातत्याने रन्स केल्या.

रहाणेने संघासमोर आदर्श ठेवताना मेलबर्न टेस्टमध्ये शतकी खेळी साकारली. संघाच्या विजयाचा पाया रचणाऱ्या या खेळीसाठी अजिंक्यला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. मेलबर्ननंतर उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला. सिडनी टेस्टमध्येही पाच बॉलर्सच्या आक्रमणासह खेळण्यावर रहाणे ठाम राहिला.

सिडनी टेस्टमध्ये रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि हनुमा विहारी हेही दुखापतग्रस्त झाले. ब्रिस्बेन टेस्टसाठी फिट 11 खेळाडू उभे राहतील का अशी परिस्थिती होती.

ब्रिस्बेन टेस्टसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन यांना पदार्पणाची संधी देण्यात आली. त्या दोघांची पहिली टेस्ट होती. शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनीची दुसरी टेस्ट होती तर मोहम्मद सिराजची तिसरी टेस्ट होती. भारताच्या बॉलर्सचा एकूण अनुभव होता 7 टेस्टचा. इतक्या अनुनभवी आक्रमणाला हाताशी घेत रहाणेने किल्ला लढवला. रहाणे भक्कमपणे युवा खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला. जेव्हा जेव्हा बॅट्समन आक्रमण करू लागले तेव्हा रहाणेने त्यांचा हुरुप वाढवला.

रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने 5 टेस्ट खेळल्या आहेत. त्यापैकी 4 जिंकल्या आहेत तर एक अर्निणित राहिली आहे. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलेलं नाही.

कोहलीचं नेतृत्व

महेंद्रसिंग धोनीने 2014-15 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. विराटने स्वत:च्या दमदार प्रदर्शनातून संघासमोर आदर्श ठेवला आहे. आक्रमक पवित्रा हे कोहलीचं गुणवैशिष्ट्य आहे. कोहलीच्याच नेतृत्वात टीम इंडियाने दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला होता.

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका, वेस्ट इंडिज, श्रीलंका इथे टेस्ट सीरिज जिंकली आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया पराभूत झाल्याने कोहलीच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली होती. कोहली कर्णधार असताना टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत प्रदीर्घ काळ अव्वल स्थान कायम राखलं आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅचेसमध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी पहिल्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत 56 टेस्ट खेळल्या असून, यापैकी 33 मध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे तर 13मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 10 टेस्ट अर्निणित राहिल्या आहेत.

कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जवळपास 60 टक्के मॅच जिंकल्या आहेत. भारताच्या सर्व टेस्ट कर्णधारांमध्ये जिंकण्याची टक्केवारी कोहलीची सर्वाधिक आहे.

कोहलीची वनडेतली कर्णधार म्हणून कामगिरीही दमदार आहे. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 92 मॅचेस खेळल्या असून, 63 जिंकल्या आहेत. जिंकण्याचं प्रमाण 70 टक्के एवढं आहे.

कर्णधार म्हणून कोहली कमी पडतोय का?

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला अद्यापही 50 ओव्हर वर्ल्ड कप, ट्वेन्टी-20 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धांचं जेतेपद मिळवता आलेलं नाही.

आयपीएल स्पर्धेत 13 वर्ष कोहली एकाच अर्थात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी खेळतो आहे. 2011मध्ये कोहलीला बेंगळुरूचं कर्णधारपद मिळालं. तेव्हापासून आतापर्यंत कोहलीला बेंगळुरूला जेतेपद मिळवून देता आलेलं नाही.

कोहलीने 112 मॅचेसमध्ये बेंगळुरूचं नेतृत्व केलं आहे. यापैकी 50 मध्ये बेंगळुरूने विजय मिळवला आहे तर 56 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. परंतु आयपीएल आणि टेस्ट यांची तुलना करणं योग्य होणार नाही. कारण आयपीएल ही ट्वेन्टी-20 लीग स्पर्धा आहे. तिथे देशी-विदेशी खेळाडूंची मोट बांधावी लागते.

कर्णधारपदी असताना कोहलीच्या बॅटिंगमधली कामगिरी अफलातून अशी आहे. कर्णधार म्हणून 56 टेस्टमध्ये कोहलीने 60.69च्या सरासरीने 5220 रन्स केल्या आहेत. कर्णधार म्हणून खेळताना कोहलीच्या नावावर 20 शतकं आणि 13 अर्धशतकं आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर ही चर्चा रंगली असली तरी बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली. विराट कोहलीच संघाचा कर्णधार आहे. अजिंक्य रहाणे उपकर्णधार आहे. इंग्लंडचा संघ प्रदीर्घ अशा भारत दौऱ्यासाठी येतो आहे.

वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top