Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन कधी? पाहा ताजं अपडेट

अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन कधी? पाहा ताजं अपडेट

Getty Imagesप्रातिनिधिक छायाचित्र

मान्सून यंदा अंदमानात वेळेआधीच दाखल झाला, पण मग नंतर तो कुठे रेंगाळला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मान्सून कुठवर पोहोचला आहे, महाराष्ट्रात तो कधी दाखल होऊ शकतो आणि सध्या राज्यातलं हवामान कसं आहे, जाणून घेऊयात.

27 मे रोजी मान्सूननं बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आगेकूच करत आणखी काही भाग व्यापला आहे.

खरंतर यंदा अंदमान निकोबार बेटांमध्ये 16 मे रोजी म्हणजे साधारण सहा दिवस आधी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झालं होतं.

एरव्ही 22 मे रोजी अंदमानात दाखल झाल्यावर पुढच्या आठ एक दिवसांत म्हणजे 1 जून पर्यंत मान्सून केरळला पोहोचतो. पण यावेळी दहा दिवस उलटून गेले तरी मान्सून केरळला पोहोचलेला नाही.

26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज गेल्या आठवड्यात हवामान विभागानं वर्तवला होता, पण नंतर तो मागे घेतला. त्याचं कारण आहे या परिसरातली स्थिती. इथे हळूहळू वारे नैऋत्येकडून वाहू लागले आहेत. पण केवळ वाऱ्यांनी दिशा बदलली म्हणजे मान्सून आल्याचं जाहीर करा, असं नसतं. तर त्यासाठी काही निकष पूर्ण व्हावे लागतात.

त्या ठिकाणचं पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग, ढगांचं प्रमाण आणि तापमानाची स्थिती अशा गोष्टी त्यासाठी लक्षात घेतल्या जातात. केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि वाऱ्याचा वेग आणि तापमानाचे निकष पूर्ण झाले, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.

सध्या केरळच्या आसपास वाहणारे वारे तुलनेनं क्षीण आहेत, असं हवामान संशोधक अक्षय देवरस नमूद करतात.

अक्षय देवरस म्हणाले, "आता पुढच्या एक दोन दिवसांत मान्सून लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच करण्याची, शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे, पण काही तज्ज्ञांच्या मते आणखी कदाचित चार दिवस मान्सून केरळमध्ये पोहोचणार नाही.

 Getty Images

सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अपर एयर सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार फिरणाऱ्या वाऱ्यांची सिस्टिम कार्यरत आहे. पण त्यातून कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार होण्याची शक्यता सध्यातरी नाही. एरवी या काळात चक्रीवादळं तयार झाली, तर त्यातून मान्सूनला गती मिळण्याची शक्यता असते.

उपग्रहानं पाठवलेलं चित्र पाहता, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातल्या काही भागांत ढगाळ हवामान आहे. विशेषतः राज्याच्या दक्षिणेकडील भागांत तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसानंही हजेरी लावली आहे.

मात्र विदर्भात उष्णतेपासून इतक्यात म्हणजे पुढच्या किमान दोन तीन दिवसांत तरी सुटका होणार नाही, असंच चित्र आहे. 27 मे रोजी विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.

इथे रात्रीचं किमान तापमानही 28 अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहील. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली परिसरात रात्रीही पारा 30 ते 32 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. कोकणातही रात्रीच्या उष्णतेचा त्रास जाणवू शकतो."

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेले इशारे पाहिले, तर 27 मे रोजी उष्ण रात्रीसाठी वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे रेड अलर्ट आहे, तर अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. 28 मे रोजीही इथे हीच स्थिती कायम राहील.

तर 28 मे रोजी पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, कोल्हापूर तसंच पुणे आणि साताऱ्याचा पठारी भाग इथे मान्सूनपूर्व वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

प्रातिनिधिक छायाचित्र मान्सून थांबला कुठे आणि का? महाराष्ट्रात आगमन कधी? ताजं अपडेट Getty Images

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi