Monday, 22 Jul, 8.49 pm BBC मराठी

होम
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं का म्हटलं जातं?

2008च्या ऑलिंपिकसाठी ग्रेट ब्रिटनची टीम सुवर्णपदक जिंकण्यासाठी सज्ज होती. त्या टीमची एक खेळाडू होती अॅनी व्हर्नन. त्या टीममध्ये सर्व अनुभवी खेळाडू होते आणि अॅना ही त्यांच्यातील सर्वांत तरुण खेळाडू होती.

मात्र, अगदी अटीतटीच्या त्या लढतीत त्यांना मागे टाकत चीनने पहिला क्रमांक पटकावला. हा पराभव अॅनीच्या चांगलाच जिव्हारी लागला. खेळातल्या मानसिकतेवर लिहिलेल्या तिच्या 'Mind Game' या पुस्तकाविषयी दिलेल्या एका मुलाखतीत तिने 'तो माझ्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा ठरला,' असं म्हटलं होतं.

अटीतटीच्या लढतीत पराभूत होण्याचं दुःख काय असतं त्याची कल्पना सामान्य माणसाला करणं कठीण आहे.

उत्कृष्ट कामगिरी गाठण्यासाठी प्रचंड मानसिक प्रयत्नांची गरज असते. आणि जर तुम्ही जिंकणार अशी खात्री असते त्यावेळी झालेला पराभव तर एखाद्या क्रूर थट्टेसारखाच वाटतो.

पण उत्कृष्ठ खेळाडू तेच असतात जे हे दुःख पचवून त्या दुःखाला एका ऊर्जेत परावर्तित करून पुढच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतात. कामगिरी उंचावण्यासाठी पराभवाचीच मदत ते घेतात.

सुवर्ण पदक गमावल्याचा व्हर्नन यांना धक्का लागला त्यांना नैराश्य आलं आणि त्या 2010 साली या नैराश्यातून बाहेर पडल्या. 2010मध्ये रोईंग वर्ल्ड चॅंपियनशिप मिळाल्यावरच त्यांचं समाधान झालं. हे कसं घडलं? युके स्पोर्ट्स या संस्थेनी खेळाडूंचा अभ्यास केला आणि यशस्वी खेळाडूंकडे नेमकी कोणती गुरूकिल्ली आहे यावर संशोधन केलं. युके स्पोर्ट्स ही ब्रिटिश सरकारची संस्था आहे आणि जे अभिजात खेळ आहेत त्यांच्या संवर्धनाचं काम ही संस्था करते.

हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 85 अॅथलिट्स आणि प्रशिक्षकांच्या तपशीलवार मुलाखती घेतल्या आणि यशस्वी खेळाडूंमध्ये काय समानता आहेत, याचा अभ्यास केला.

या संशोधनात असं आढळलं की सर्वोत्तम कामगिरी असलेल्या बहुतांश खेळाडूंनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या अपयशांचा सामना केलेला होता. मात्र, या अपयशातून खचून न जाता त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली.

पहिल्या स्थानाऐवजी दुसरं स्थान पटकवण्याच्या अनुभवात असं काहीतरी दडलेलं असतं जे तुमच्यातली जिंकण्याची उर्मी अधिक वाढवतं. व्हर्जिनिया विद्यापीठात अर्थतज्ज्ञ असणारे अॅडम लिव्ह यांनी 1846 ते 1948 या कालखंडातल्या ऑलिंपिक आणि अशाच अॅथलेटिक स्पर्धांमध्ये पदक पटकवणाऱ्या विजेत्यांची माहिती गोळा केली आणि पदक जिंकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले, याचा अभ्यास केला.

लिव्ह यांना आढळलं की या स्पर्धांमध्ये अगदी थोड्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आलेले बहुतांश खेळाडू पहिला क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंपेक्षा दीर्घ आणि अधिक यशस्वी आयुष्य जगले.

रौप्य पदक पटकवणारे खेळाडू निवृत्तीनंतरच्या करियरमध्ये अधिक महत्त्वाकांक्षी होते आणि ते चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात होते. यातल्या जवळपास निम्म्या खेळाडूंनी वयाची 80 वर्षं पार केली होती. याउलट सुवर्णपदक पटकवणाऱ्या खेळाडूंपैकी केवळ एक तृतिआंश खेळाडूंनीच वयाची 80 वर्षं पार केली होती.

पराभवाचा आघात त्यांना जगण्यासाठी प्रेरित करत असल्याचं यातून दिसतं.

हा संदर्भ केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाही. Physics and Society या नियतकालिकात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात असं दिसतं की कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे गेलेल्या शास्त्रज्ञांनी पुढे इतरांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी केली.

यांग वॅंग, बेंजामिन जोन्स आणि डॅशून वँग या लेखकांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेकडे निधीची मागणी करण्यासाठी कनिष्ठ शास्त्रज्ञांनी पाठवलेल्या अनुदानाच्या प्रस्तावांचा अभ्यास केला. त्यांना यात दोन गट दिसले : पहिला गटाला त्यांनी 'Near-Miss' म्हटलं. हा गट अशा शास्त्रज्ञांचा होता ज्यांचा प्रस्ताव अगदी थोड्या फरकाने फेटाळण्यात आला. तर दुसरा गट होता 'Near-Win' गट. या गटातल्या शास्त्रज्ञांचा प्रस्ताव अगदी थोड्या फरकाने मंजूर करण्यात आला होता.

यूके स्पोर्ट्स संस्थेला अॅथलिटबाबत जे आढळलं तेच इथेही आढळलं. पराभव 'नैसर्गिक निवडी'च्या रूपात काम करतो. अनुदान न मिळालेल्या दहापैकी एकाने करियरचं सोडलं. तर उरलेल्या 9 जणांनी येणाऱ्या दशकात ज्यांना अनुदान मिळालं अशा शास्त्रज्ञांपेक्षा अधिक परिणामकारक संशोधनं प्रकाशित केली.

लहान वयात येणारं अपयश आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. लहान वयातच आई-वडील गमावणं हा मोठा धक्का असतो. Parental Loss and Achievement या अहवालात मानसशास्त्रज्ञ असलेल्या मार्व्हिनआईसेनस्टॅट यांनी काही निरीक्षणं मांडली आहेत.

दोन किंवा त्याहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी विश्वकोशात नोंद झालेल्या 573 लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी निम्म्यांनी वयाची वीस वर्षं होण्याआधीच आपले आई-वडील गमावले होते.

ज्या मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे त्यांना मानसिक आघात सहन करावे लागतात. पण लहानपणी पालक गमावलेल्या पण आयुष्यात अभूतपूर्व कामगिरी केलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे.

याचं सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे 'द बिटल' या जगविख्यात रॉक बँडमधले तीन सदस्य.

पॉल मॅककार्ट हा बिटलमध्ये बेस गिटारिस्ट आणि गायक होते. ते 14 वर्षांचे असताना त्याच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला.

जॉन लेनन बिटलचा सहसंस्थापक होते. तो गायक आणि गीतकार तर होताच पण इतकीच त्याची ओळख नव्हती. लोक त्याला शांतीदूतही म्हणत असत. तो 17 वर्षांचा असताना त्याच्या आईचं अपघाती निधन झालं होतं.

तर रिचर्ड स्टारकी ज्यांला रिंगो स्टार म्हणून जग ओळखतं तो बिटल बँडमध्ये ड्रमर होता. यांनी कुणाला गमावलं नव्हतं पण त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्याच्या आईने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी झगडत त्याला लहानाचं मोठं केलं होतं. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याला एका दुर्धर आजाराने पछाडलं आणि तब्बल एक वर्ष त्याने रुग्णालयात घालवलं. आज वयाच्या 79 वर्षीदेखील ते त्यांच्या 'ऑल स्टार' बँडमध्ये काम करतात.

ही सर्वच बाबतीत अत्यंत टोकाची उदाहरणं आहेत. मात्र, सर्वसाधारणपणे असं दिसत की एखाद्याला यशाकडे नेणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला किंवा अपयशाला कमी लेखलं जातं. काही लोक त्यांना झालेल्या वेदना आणि अपयश यांचं दुर्दम्य इच्छाशक्तीत रूपांतर करू शकतात. त्यांना खाली खेचू पाहणाऱ्या कुठल्याही शक्तीविरोधात झगडून ते स्वतःमध्ये अशी काहीतरी ऊर्जा निर्माण करतात जी त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाते.

जीवशास्त्रातही हाच सिद्धांत आढळतो. पिळदार शरीरयष्टी असणाऱ्यांना हे माहिती असतं की स्नायू बळकट करण्यासाठी त्यांना आधी खूप ताण द्यावा लागतो.

व्यायाम इतका कठोर असावा लागतो जेणेकरून स्नायूतली हजारो छिद्रं खुली होतील. नंतर शरीरच ती छिद्र भरून काढतं आणि यामुळे स्नायू बळकट होतात.

जिममध्ये जे घडत ते प्रत्यक्ष आयुष्यातही घडतं. तुमच्यावर झालेला आघात तुम्ही कशाप्रकारे हाताळता यावर तुम्ही यशस्वी होणार की नाही हे ठरलेलं असतं.

यशस्वी व्यक्ती पराभव आणि निराशा यांना प्रेरणेमध्ये बदलण्याची मानसिक किमया साधू शकतात. याउलट कधीकधी असंही दिसतं की ज्यांना लहानपणापासूनच सर्व भौतिक सुखसोयी मिळतात अशा व्यक्तींमध्ये पुढे आयुष्यात इच्छाशक्तीचा अभाव दिसतो आणि त्या दिशाहीनही होतात. त्यामुळेच आजकाल मुलांना पराभवाला सामोरं जाण्याची संधीच दिली जात नाही, याबद्दल बुद्धिमत्ता विकास क्षेत्रातले तज्ज्ञ काळजी व्यक्त करतात.

2012 साली प्रकाशित करण्यात आलेल्या The Rocky Road to the Top : Why Talent Needs Trauma या अहवालात क्रीडाविषयक वैज्ञानिक डेव्ह कोलिन्स आणि अॅने मॅकनॅमारा तरुण खेळाडूंना सर्व सोयी पुरवणं आणि त्यांचा ताण कमी करणं, या दृष्टिकोनावर टीका करतात. त्यांच्या मते अशा प्रकारे अमाप पैसा खर्च केल्याने आणि अत्याधुनिक प्रशिक्षण दिल्याने उदयोन्मुख खेळाडूंचं आयुष्य अधिक सुखकर होतं. उलट या खेळाडूंमध्ये अधिक लवचिकता निर्माण करण्यासाठी त्यांना अधिकाधिक आव्हानं किंवा आघातांची गरज असते.

हे सर्व खरं असलं तरी पराभव आणि अपयश यांचं अतिगुणगान करायला नको, हेही तितकंच खरं. कारण ते वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे असतात आणि कधीकधी तर वाईट अनुभव हे अत्यंत वाईट असू शकतात. मात्र, काहीतरी मोलाचं गमावल्यानंतर तुम्ही जेव्हा दुःखात बुडालेले असता त्यावेळी या दुःखातून तुम्ही एकदिवस काहीतरी चांगलं घडवणार का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.

कदाचित फ्रेडरिक नित्शे यांनी म्हटलं ते योग्यच आहे : Whatever doesn't kill you makes you stronger.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top