Monday, 08 Feb, 6.41 pm BBC मराठी

होम
अपूर्वी चंडेला : क्रीडा पत्रकार होण्याची इच्छा असलेली अपूर्वी कशी वळली नेमबाजीकडे?

नेमबाजी वर्ल्ड कप विजेती अपूर्वी चंडेला हिला आधी क्रीडा पत्रकार बनण्याची इच्छा होती. पण 2008 च्या बिजिंग ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अभिनव बिंद्रा यांना सुवर्णपदक पटकावलेलं पाहून अपूर्वीने आपला निर्णय बदलला.

अभिनव यांच्याकडून प्रेरणा घेत अपूर्वीने हाती लेखणीऐवजी रायफल घेतली. आता याच रायफलच्या बळावर तिने जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

नेमबाज अपूर्वीनं 2019 सालच्या ISSF वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. या स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली आहे.

अपूर्वी चंडेला हिने यापूर्वी 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेतही सहभाग नोंदवलेला आहे. पण यामध्ये तिला अपेक्षित यश मिळालं नाही. ही निराशा झटकून तिने पुन्हा आपल्या खेळात सुधारणा घडवून आणल्या आहेत. यश मिळालं नसलं तरी या स्पर्धेत खूप काही शिकायला मिळालं, असं ती सांगते.

हे अपयश झटकून टाकत 2018 च्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये अपूर्वीने पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळालं.

त्यानंतर पुढच्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेली ISSF वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा अपूर्वीसाठी अविस्मरणीय ठरली.

या स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्याने ती 2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

अपूर्वी चंडेला हिला 2016 मध्ये भारत सरकारतर्फे 'अर्जुन पुरस्कार' मिळालेला आहे.

आगामी ऑलिंपिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. आजवरच्या अनुभवाच्या बळावर ऑलिंपिक स्पर्धेत चांगली कामगिरी करता येईल, असा विश्वास ती व्यक्त करते.

कुटुंबियांच्या पाठिंब्याने दिली प्रेरणा

साधारणपणे नेमबाजी हा महागडा खेळ मानला जातो. पण चंडेला कुटुंबियांनी अपूर्वी हिला कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही.

जयपूर स्थित चंडेला कुटुंबियांनी अपूर्वीच्या खेळासाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य केलं.

अपूर्वीची आई बिंदू चंडेला यासुद्धा बास्केटबॉल खेळाडू होत्या. त्यांच्या चुलत भावंडांपैकी एकजण नेमबाज होतं. घरातच असं क्रीडापूरक वातावरण असल्याचा अपूर्वीला फायदा झाला. सुरुवातीला आपण क्रीडा पत्रकारितेमध्ये आपलं करिअर घडवावं, असं तिला वाटत होतं.

पण 2008 ला अभिनव बिंद्रा यांनी ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकावल्याचं पाहून तिला प्रेरणा मिळाली.

नेमबाजी खेळात सहभाग नोंदवण्याच्या अपूर्वीच्या निर्णयाचं कुटुंबियांनीही स्वागत केलं. तिचा नेमबाजीतील रस पाहून तिचे वडील कुलदीप सिंग चंडेला यांनी तिला रायफल गिफ्ट दिली. त्यानंतर अपूर्वीचा प्रवास सुरू झाला.

सुरुवातीच्या दिवसांत तिला सराव करण्यात बऱ्याच अडचणी यायच्या. सरावासाठी शूटिंग रेंजवर पोहोचण्यास तिला 45 मिनिटांचा वेळ जायचा.

अपूर्वीचा बराच वेळ प्रवासात जात असल्याचं कळल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी घराजवळच शूटिंग रेंज उभारलं.

चंडेला यांच्या वडिलांनी आर्थिक बाजू सांभाळून धरली. तिच्या आईने तिच्या सरावात कोणतीच कमतरता राहणार नाही, याची काळजी घेतली. प्रत्येक स्पर्धेदरम्यान अपूर्वीची आई तिच्यासोबत असायची. याची आपल्याला खूप मदत झाल्याचं अपूर्वी सांगते.

यश आणि सातत्य

अपूर्वी चंडेलाने 2009च्या राष्ट्रीय शालेय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

त्यानंतर वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिने घवघवीत यश मिळवलं.

2012 ते 2019 दरम्यान अपूर्वी चंडेलाने तब्बल सहा राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने लक्षवेधी कामगिरी केली.

2014 ला ग्लासगोमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावून आपली क्षमता जगाला दाखवून दिली.

कोणत्याही स्पर्धेदरम्यान आपल्या घरातील 14 सदस्य आपल्याकडे पाहत असल्याने चांगली कामगिरी करण्यासाठी बळ मिळतं, असं अपूर्वी सांगते.

(हा लेख अपूर्वी चंडेला हिला बीबीसीने पाठवलेल्या प्रश्नावलीच्या उत्तरांवर आधारित आहे.)

वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top