होम
अर्णब गोस्वामी : अन्वय नाईक कुटुंबीयांनी खरंच शरद पवारांबरोबर फोटो काढला? #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत.
1. अन्वय नाईक कुटुंबियांनी खरंच शरद पवारांबरोबर फोटो काढला?
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यातही आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे.
अशातच सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. यावरून राष्ट्रवादीवर टीकाही होत असतानाच शरद पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
अर्णब यांच्या अटकेनंतर अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले होतो. तसंच, महाराष्ट्रातील जनतेलाही पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध असल्याच्या चर्चा होत होत्या. या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांनी पहिल्यांदा भाष्य केलं आहे.
"नाईक कुटुंब मला भेटल्याचे जे फोटो व्हायरल होत आहेत ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तसंच, राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केलेल्या फोनसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे. "राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं," असा टोला त्यांनी लगावला आहे.
2. एसटी कर्मचाऱ्यांना एक हजार कोटींचं पॅकेज
परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांत बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने परिवहन मंडळाला एक हजार कोटींचं पॅकेज मंजूर केलं. त्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एस कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य होणार आहे. ही बातमी ABP माझाने दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकित आहेत. यामुळे जळगाव आगारातल्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. या पॅकेजमुळे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना थकित वेतन देणं शक्य होणार आहे.
3. 'जमिनी विकून 4 दिवस बीएमडब्ल्यूमध्ये फिराल, पुढे काय?'
मावळमधल्या एका गृहप्रकल्पाचं उद्घाटन करताना महसूलमंत्री तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं, "मावळ आणि मुळशीमधील जमिनीला सोन्याचा भाव आहे. त्यामुळे या दोन भागांना महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हॉट प्लेट म्हणून ओळखल जातं. चांगला विकास होत आहे. अनेक जण राहण्यासाठी येत आहेत. जमिनी विकून चार दिवस महागड्या मोटारीत फिराल. पण पुढे काय? त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे पैसे दुप्पट झाले पाहिजेत या दृष्टीने काम करा. अन्यथा शिर्डीमध्ये मूळची माणसं शोधून सापडत नाहीत, तशीच अवस्था मावळ ची होऊ नये." ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
"सर्वांनी एक काळजी घेतली पाहिजे. नव्या पिढीकडे चार पैसे येतील त्याची गुंतवणूक जास्त कशी वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपली परिस्थिती आणखी चांगली कशी होईल हे पाहिलं पाहिजे," असंही ते पुढे म्हणाले.
4. अशोक चव्हाण निष्क्रिय,मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करा - मेटे
मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करण्याची वारंवार मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने अखेर शिवसंग्राचे नेते विनायक मेटे यांनी आता हा प्रश्न राज्यपालांच्या दरबारात नेला आहे.
विनायक मेटे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी घेऊन त्यांनी या समितीवरून चव्हाणांना हटवण्याची मागणी केली आहे. ही बातमी TV9 मराठीने दिली आहे.

विनायक मेटे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही होते. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण निष्क्रिय ठरले आहेत. त्यांच्या कार्यपद्धती विषयी मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांना पदावर ठेवू नये, अशी मागणी मेटे यांनी राज्यपालांकडे केली. यावेळी त्यांनी चव्हाण यांच्या हकालपट्टीसाठी मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात आला होता, अशी माहितीही दिली.
5. 'ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स आहेत त्यांना जिल्हा प्रशासनाने पर्याय शोधावा'
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार केली आहेत ती बंद करता येणार नाहीत. अशा शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.
शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची तपासणी यांसारख्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागाने नियमावली जाहीर केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
शासन नियमानुसार सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.
source: bbc.com/marathi