Sunday, 08 Mar, 6.45 am BBC मराठी

होम
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर: आज होणार विजेत्या महिला खेळाडूची घोषणा - #BBCISWOTY

गेले काही दिवस लागून असलेली उत्सुकता अखेर आज संपणार आहे. 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पारितोषिक आज जाहीर होतील.

भारतीय महिला खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी बीबीसीने या वर्षी पहिल्यांदा या पुरस्काराचं आयोजन केलं आहे. या पुरस्कारासाठीच्या नामांकन यादीत दुती चंद, मानसी जोशी, मेरी कोम, पी. व्ही. सिंधू आणि विनेश फोगाट या पाच महिला खेळाडूंचा समावेश आहे.

नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.

या कार्यक्रमाचं लाईव्ह टेक्स्ट कव्हरेज बीबीसीच्या सर्व भारतीय भाषा सेवांच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता.

क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका मान्यवर महिला खेळाडूचादेखील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया कशी आहे?

बीबीसीने निवड केलेल्या ज्युरीने (पंचांनी) काही निवडक भारतीय महिला खेळाडूंची एक यादी तयार केली आहे. ज्युरींमध्ये भारतातील काही नामवंत क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे. या ज्युरींची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

या ज्युरीने ज्यांना सर्वाधिक मतं दिली अशा पहिल्या पाच महिला खेळाडूंची यादी करण्यात आली आणि या पाच महिला खेळाडूंना ऑनलाईन सार्वजनिक मतदानासाठी नामांकित करण्यात आलं. ऑनलाईन मतदान 3 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू होतं.

नामांकनं

दुती चंद (वय-23, खेळ- अॅथलेटिक्स)

दुती चंद सध्या महिला 100 मीटर गटातील राष्ट्रीय खेळाडू आहे. 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये 100 मी स्पर्धेसाठी निवडली गेलेली ती तिसरी भारतीय खेळाडू आहे.

2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये तिला सुवर्णपदक मिळालं होतं. 1998 पासून हे भारताचं पहिलं पदक होतं. दुती विविध कारणांमुळे वादात सापडली असली तरी ती भारतातली उदयोन्मुख धावपटू आहे.

मानसी जोशी (वय- 30, खेळ- पॅरा बॅडमिंटन)

स्वित्झर्लंड येथील बेसल मध्ये 2019 साली झालेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत मानसी जोशीने सुवर्णपदक जिंकलं. पॅरा बॅडमिंटन या खेळात ती जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आशियाई खेळात तिने कांस्यपदक मिळवलं होतं.

2011 मध्ये झालेल्या एका अपघातात तिला तिचा पाय गमवावा लागला. तरीही बॅडमिंटन खेळात नैपुण्य मिळवण्यापासून तिला कुणीही रोखू शकलं नाही.

मेरी कोम (वय- 36, खेळ- बॉक्सिंग)

मांगटे चंगनेजांग मेरी कोम या नावाने ओळखली जाते. आठ जागतिक चॅम्पिअनशिप जिंकणारी ती एकमेव बॉक्सर आहे. त्यापैकी सात स्पर्धांमध्ये तिला पदक मिळालं होतं. जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पिअन स्पर्धेत सहा वेळा विजेतेपद पटकावणारी ती पहिली महिला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी मेरी कोम ही पहिली महिला आहे.

मेरी कोम सध्या राज्यसभेची खासदार आहे. जागतिक ऑलिम्पिक संघटनेतर्फे OLY ही बिरुदावली मेरी कोमला देण्यात आली आहे.

पी. व्ही. सिंधू (वय- 24 खेळ- बॅडमिंटन)

गेल्या वर्षी पी.व्ही.सिंधू (पुरसुला वेंकट सिंधू) स्वित्झर्लंडमधील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. आतापर्यंत तिने पाच जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑलिम्पिक मध्ये सिंगल्स गटात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

2012 मध्ये अवघ्या 17 वर्षी BWF च्या जागतिक वर्गवारीत सर्वोच्च 20 खेळाडूंमध्ये तिचा समावेश होता. गेल्या चार वर्षांत तिने हे स्थान टिकवलं आहे.

टोकियो येथे होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांना तिच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.

विनेश फोगाट (वय- 25 खेळ- फ्रीस्टाईल कुस्ती)

पैलवानाच्या घराण्यातील सदस्य असलेल्या विनेश फोगट आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय पैलवान आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला दोन सुवर्णपदकं मिळाली आहेत. 2019 मध्ये कांस्य पदक मिळवत जागतिक पातळीवर तिने पदकं मिळवलं.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top