Sunday, 08 Mar, 8.47 pm BBC मराठी

होम
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर: पी.टी. उषा यांना जीवनगौरव पुरस्कार

"आजचा सोहळा फक्त पुरस्काराबाबत नाही, तर भारतीय महिला खेळाडूंच्या गौरवाविषयी आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या वर्ल् कप स्पर्धेत 16वर्षीय शफाली वर्माने दिमाखदार प्रदर्शन केलं. खेळ आपल्याला स्वप्नं पाहायला शिकवतात. खेळ आपल्यामध्ये चांगल्या विचाराची रुजवात करतात", असं बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांनी सांगितलं.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात ते बोलत आहेत. याच कार्यक्रमात ज्येष्ठ क्रीडापटू पी.टी.उषा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

खेळात जिंकणं एवढंच महत्त्वाचं नसतं तर सहभागी होणं महत्त्वाचं असतं. कुटुंब आणि बीबीसी म्हणजेच माझं काम यांच्यानंतर माझं सर्वाधिक प्रेम खेळावर आहे असं बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे डिरेक्टर जेमी अँगस यांनी सांगितलं.

"खेळाडूंच्या रुपात भारत मोठं स्वप्न पाहत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे. खेलो इंडियासारख्या उपक्रमात दहा हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत", असं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रीजिजू यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "आपल्याला स्पोर्ट्सकडे एक करिअर म्हणून बघायचं आहे. एकदा खेळाडू निवृत्त झाल्यानंतर सरकार त्याला पेन्शन देत आहे. त्याची देखभाल करत आहे. देशात 15 हजार तरूण क्रीडापटू आहेत, ज्यांना सरकार प्रशिक्षण देत आहे".

टोकियो ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यत 11.15 सेकंदात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं धावपटू द्युती चंदने सांगितलं. "माझ्या घरी अतिशय गरिबी होती. गावात धावण्याचा पोशाख घालणं अवघड होतं. मुली सलवार कमीझ तसंच फ्रॉक परिधान करतात. धावण्यासाठी तु टीशर्ट आणि ट्रॅक पँट घालण्याचा सल्ला बहिणीने दिला. नदीच्या दिशेने जाऊन धाव असंही बहिणीने सुचवलं", असं द्युतीने सांगितलं.

द्युती पुढे म्हणाली, "लैंगिक ओळख स्पष्ट केल्यानंतर मला खेळण्यापासून परावृत्त करण्यात आलं होतं. परंतु मी सनदशीर मार्गाने लढा दिला. केवळ लैंगिक ओळखीच्या आधारे मला बाजूला करण्यात आलं होतं. मी प्रदीर्घ असा लढा दिला. ही लढाई जिंकूनच मी पुन्हा खेळायला ट्रॅकवर उतरले".

पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्याचा निर्धार पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशीने व्यक्त केला. खेळांमध्ये आपलं जीवन बदलण्याची ताकद आहे. तुम्हाला आवडणारा कोणताही खेळ खेळायला सुरुवात करा असं मानसीने सांगितलं.

या पुरस्काराचं थेट प्रक्षेपण तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता.

द्युती चंद, मानसी जोशी, मेरी कोम, पी. व्ही. सिंधू आणि विनेश फोगट या पाच खेळाडूंचं नामांकन या पुरस्कारासाठी झालं आहे. थोड्या वेळातच पुरस्कार विजेत्याची घोषणा होईल.

युवा गायिका मैथिली ठाकूरच्या सुरैल मैफलीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

या पुरस्कारासाठी बीबीसीतर्फे मान्यवर परीक्षण मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती.

https://www.facebook.com/BBCnewsMarathi/videos/542081466418094/

त्यात क्रीडा क्षेत्रातील पत्रकार आणि तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. तसेच ऑनलाइन मतदान करून आपली आवडती खेळाडू निवडण्याची संधी देखील चाहत्यांना देण्यात आली होती.

या समितीने मानसी जोशी, पी.व्ही. सिंधू, दुती चंद, मेरी कोम, विनेश फोगट या पाच जणींची निवड केली. यांच्यापैकीच सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूची आज निवड करण्यात येईल.

महिला खेळाडूंबद्दल भारतीयांना काय वाटतं?

या पुरस्काराचं औचित्य साधून बीबीसीने देशातील 14 राज्यांमध्ये एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात एकूण 10,181 लोकांनी सहभाग घेतला. त्या आधारावर बीबीसीने अभ्यास प्रसिद्ध केला आहे.

किती जणांना खेळामध्ये रस आहे, महिला खेळाडूंबद्दल भारतीयांना काय वाटतं अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि रंजक गोष्टी या अभ्यासातून समोर आल्या आहेत. या संशोधनसंदर्भात अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.

नामांकनं

या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या खेळाडूंबदद्ल थोडक्यात जाणून घेऊ या.

1. मेरी कोम

मेरी कोम भारतातील आघाडीची बॉक्सर आहे. तिला या क्रीडाप्रकारात सहा वेळा विश्वविजेतेपद मिळालं आहे. तसंच तिच्याकडे ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकही आहे.

तिच्याकडे बॉक्सिंग रिंगच्या बाहेर बघितलंत तर दिसेल 5 फूट 2 इंच उंचीची एक मुलगी. आणि वजन जेमतेम 48 किलो. बॉक्सिंग सारख्या मर्दानी खेळात ही मुलगी चॅम्पियन होईल असं कुणाला वाटेल का? बॉक्सिंगचा जगज्जेत्याच्या डोळ्यात अंगार हवा आणि देहबोलीत जरब हवी. महम्मद अली किंवा माईक टायसनला आठवा. मेरीकडे यातलं काही नाही, उलट चेहऱ्यावर एक हास्य आहे. पण, ती चपळ आहे, तिच्या हालचाली वेगवान आहे. आणि नजर अर्जुनाप्रमाणे माशाच्या डोळ्यावर म्हणजे विजयावर रोखलेली आहे.

मेरी कोमविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

2. पी.व्ही. सिंधू

5 जुलै 1995 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या सिंधूने ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकलं आहे. कोर्टवर चार तास प्रॅक्टिस करत असताना एकदाही तिचं लक्ष विचलित होत नाही. एकदाही ती मोबाईलला हात लावत नाही. फक्त सराव सुरू होता. अधूनमधून मित्रांसोबत गमतीजमती सुरू होत्या.

जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या सहा फूट उंच सिंधूची यशोगाथा अनोखी आहे. मात्र हे यश एका रात्रीतून मिळालेलं नाही.

वयाच्या 18 व्या वर्षी ती वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू होती. तेव्हापासून आजवर सिंधूने अनेक पकदं पटकावली आहेत. मात्र, तिला सर्वांत जास्त आवडणारं मेडल कोणतं? हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

3. मानसी जोशी

30 वर्षीय मानसी जोशी भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. पॅरा-बॅडमिंटनच्या जागतिक स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलंय. ऑगस्ट 2019मध्ये तिने जागतिक विजेतेपद मिळवलं होतं.

2011 साली झालेल्या एका अपघातात मानसीला डावा पाय गमवावा लागला. "मैदानात उतरून बॅडमिन्टन खेळल्यामुळे मला यातून सावरायला बरीच मदत झाली," ती सांगते.

सहाव्या वर्षापासून मानसी बॅडमिन्टन खेळतेय. "नृत्य, बॅडमिंटन अशा अनेक उपक्रमांमध्ये मी सहभागी व्हायचे", मानसी सांगते. तिने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं.

के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या मानसीने सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम केलंय. अपघातानंतर तिने कार्यालयीन स्पर्धेतील एका सामन्यात खेळून पाहिलं. "तेव्हा माझ्या लक्षात आलं की, एका पायानेही मी खेळू शकते," मानसी सांगते.

मानसी जोशीविषयी अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

4. दुती चंद

एखाद्या स्प्रिन्टरचा उल्लेख होतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर वेगाने धावणाऱ्या, उंच देहयष्टी असलेल्या धावपटूचं चित्र उभं राहातं.

त्यामुळे चार फूट अकरा इंच उंचीची भारतीय स्प्रिन्टर दुती चंदकडे पाहिल्यावर ती आशियातील सध्याची सर्वांत वेगवान महिला धावपटू आहे, यावर कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही.

सहखेळाडू आपल्याला प्रेमाने 'स्प्रिन्ट क्वीन' असं संबोधत असल्याचं दुती हसत सांगते.

दुती चंद विषयी जाणून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

5. विनेश फोगट

पैलवानाच्या घराण्यातील सदस्या असलेल्या विनेश फोगट आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय पैलवान आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला दोन सुवर्णपदकं मिळाली आहेत. 2019 मध्ये कांस्य पदक मिळवत जागतिक पातळीवर तिने पदकं मिळवलं.

25 ऑगस्ट 1994 ला हरियाणातल्या बलाली गावात जन्मलेल्या एका अशा महिला खेळाडूची कहाणी आहे, जी आपल्या हिंमतीच्या, मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर जगातल्या सर्वोतम महिला खेळाडूंपैकी एक बनली. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top