Thursday, 29 Oct, 1.13 pm BBC मराठी

होम
बिग बॉस: मराठी भाषकांच्या भावना दुखावल्याबद्दल जान सानूने मागितली माफी

बिग बॉसच्या घरात मराठीच्या मुद्द्यावरून झालेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी माफी न मागितल्यास शो बंद पाडण्याचा इशारा दोन्ही पक्षांनी दिला.

त्यानंतर सोशल मीडियावरसुद्धा याप्रकरणी बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणाची दखल घेऊन कलर्स वाहिनीनेसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

जान कुमार सानूची माफी

मराठी भाषकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी जान सानूने माफी मागितली आहे. भविष्यात अशी चूक होणार नाही असं तो म्हणाला आहे. कलर्सने व्हीडिओ पोस्ट केला आहे आणि त्यात बिग बॉसने जान सानूला समज दिल्याचं दिसतं. बिग बॉसमध्ये सर्व समाजातील लोकांचा आदर केला जातो. तेव्हा कुणाच्याही भावना दुखवणे इथे खपवून घेतले जाणार नाही.

https://www.instagram.com/tv/CG5WuwAgBDK/?utm_source=ig_web_copy_link

त्यानंतर जान सानूने मराठी लोकांची माफी मागितली. माझा कुणालाही दुखवण्याचा उद्देश नव्हता. मला मराठी जनतेनी माफ करावे असं जान सानूने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण

कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या कार्यक्रमात गायक राहुल वैद्य आणि जान कुमार सानू हे दोन स्पर्धक आहेत. एका प्रसंगात जान कुमार सानूचा राहुल वैद्यशी वाद झाला.

या वादादरम्यान जान कुमार सानूने 'मला मराठी भाषेची चिड येते', असं म्हटल्याने बिग बॉसच्या घराबाहेर आता नवीनच वाद पेटला आहे. जान सानू आणि कलर्सने महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर शो बंद पाडू असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.

इतकंच नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रात माज फक्त मराठी माणसाचाच चालेल. इतर कुणीही इथे येऊन दादागिरी करायची नाही, असंही खोपकर यांनी म्हटलं. यासंदर्भातलं ट्वीटही त्यांनी केलं आहे.

बिग बॉसमधल्या स्पर्धकांना मराठी भाषेचा अपमान न करण्याबद्दल समज दिली जावी, नाहीतर शिवसेना पद्धतीनं आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनीही दिला होता.

"आम्ही कलर्स वाहिनीच्या काही लोकांशी बोलून स्पर्धकांना समज देण्याबद्दल सांगितलं आहे. आम्ही सलमान खानच्या पीआरओशीही बोललो. त्यांनाही सलमाननं स्पर्धकांना समज द्यावी असं सांगितलं आहे. नाहीतर आम्ही शिवसेना पद्धतीनं आंदोलन करू," असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

कलर्स वाहिनीची माफी

मराठीच्या मुद्द्यावरून तीव्र प्रतिक्रिया येत असल्याचं लक्षात येताच याप्रकरणी कलर्स वाहिनीने माफी मागितली. याबाबत कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं.

"27 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या कार्यक्रमाबाबत मराठी भाषेच्या उल्लेखाबाबत अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या. आम्ही या तक्रारींची दखल घेतली आहे. आगामी एपिसोड्समध्ये अशा प्रकारची घटना घडणार नाही, याची आम्ही खात्री करतो.

घडल्या प्रकाराबाबत महाराष्ट्राच्या जनतेची आम्ही माफी मागतो. मराठी भाषेचा आणि मराठी अस्मितेचा तसंच इतर सर्व भाषांचा आम्ही सन्मान करतो," असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

'घराणेशाही'वरून वाद

सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलीवुडमधली 'घराणेशाही' या मुद्द्यावरून बराच वाद पेटला आणि आता हा वाद बिग बॉसच्या घरातही दिसला.

या कार्यक्रमात एकमेव मराठी स्पर्धक असलेल्या राहुल वैद्य सुरुवातीपासूनच चर्चेत आहे आणि आता कुमार सानू यांचा मुलगा जान सानूवर घराणेशाहीचा आरोप करत त्याने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी कुणाला नॉमिनेट कराल, या प्रश्नावर राहुल वैद्यने जान सानूचं नाव घेतलं. मात्र, यासाठी जे कारण राहुलने सांगितलं त्यावरून बिग बॉसच्या घरातलं वातावरण चांगलंच तापलं.

राहुल वैद्य म्हणाला, "मी ज्याला नॉमिनेट करू इच्छितो तो आहे जान. कारण मला घराणेशाहीचा तिटकारा आहे. इथे जे कुणी आहेत सगळे आपापल्या मेहनतीने इथवर आले आहेत."

यावर मला कुमार सानू वडील म्हणून लाभले याला मी माझं सुदैव मानतो, असं म्हणत जानने राहुलला उत्तर दिलं. यामुळे चिडलेल्या राहुलने आपल्याला नावाजलेल्या वडिलांची गरज नसल्याचं म्हटलं. जानने "कुणीही माझा बाप काढायचा नाही" म्हणत मोठमोठ्याने भांडायला सुरुवात केली.

यानंतर जान रडत असताना राहुलने 'मुलीसारखं काय रडतोस' म्हटल्याने पुन्हा एकदा वाद झाला. जॅस्मीन आणि नैना या दोन्ही स्पर्धकांनी राहुलला फैलावर घेतलं.

घरातल्या इतर सदस्यांनीही आपापसात राहुलने घराणेशाहीचा मुद्दा काढायला नको होता म्हटलं. राहुल याच्या वागण्यावरून सध्या घरातलं वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे या आठवड्यात कोण एलिमिनेट होतं, याची उत्सुकता बिग बॉसच्या रसिकांमध्ये आहे.

यादरम्यानच जान कुमार सानूने राहुल वैद्यला मराठी भाषेवरून चिड येते, असं म्हटलं होतं.

दरम्यान, सोशल मीडियावरही राहुल वैद्यवरून दोन तट पडलेत. काहींना राहुल वैद्यचं समर्थन केलं तर काहींच्या मते राहुलने उगाच घराणेशाहीचा मुद्दा उकरून काढल्याचं म्हटलं.

राहुल वैद्य फॅन क्लबच्या ट्विटर हँडलवरून राहुलला समर्थन देत त्याच्या फॅन्सने बिग बॉसच्या घरात 'राहुल एकमेव स्पष्टवक्ता' असल्याचं म्हटलं आहे.

आदित्य चौधरीनेही राहुल घरातला one man army असल्याचं ट्वीट केलं आहे.

सुमित काडेल नावाचे एक यूजर लिहितात, "बिग बॉसच्या घरात येण्याआधी जान सानूला कुणीही ओळखत नव्हतं. त्यामुळे तो कुमार सानूचा मुलगा असल्यामुळे या शोमध्ये आहे, हे स्पष्टच आहे. त्यावर इतका वाद का घालायचा? राहुल वैद्यने केवळ लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहे. जान निर्विवादपणे घराणेशाहीचंच प्रॉडक्ट आहे."

तर प्रियंका भट्ट लिहितात, "जानवरच्या आजच्या कमेंटनंतरही मला वाटतंय की राहुल चांगलं खेळतोय. तो बोलायला घाबरत नाही. कशाचीही पर्वा करत नाही आणि कुणी आपला राग करेल, याचीही चिंता तो करत नाही."

तर निक नावाचे एक ट्वीटर यूजर लिहितात, "तो स्पष्टवक्ता आहे. तो सच्चा आहे. तो स्वतःच्या शब्दावर ठाम आहे. आम्ही राहुल वैद्यच्या बाजूने आहोत."

राहुल वैद्यच्या विरोधातही अनेकांनी ट्वीट केलं आहे. प्रियंका लिहितात, "एखाद्या सेलिब्रिटीचा मुलगा असणं चूक आहे का? पब्लिसिटीसाठी राहुलने चीप स्टंट केला आहे."

जान कुमार फॅन क्लबने जानच्या बाजूने ट्वीट करत म्हटलं आहे, "आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या व्यक्तिमत्त्वामुळे तू रॉकस्टार आहेस. तू आज पुन्हा एकदा अनेकांची मनं जिंकलीस."

तर अँडी कुमार लिहितात, "राहुल वैद्य कायमच वाद उकरून काढतो. पण जयेश भट्टाचार्य उर्फ जान कुमार सानू वडिलांच्या नावाने ओळखला जातो. खरंतर त्याच्या आईने त्याचं संगोपन केलं. त्यामुळे त्याच्या यशाचं खरं श्रेय त्याच्या आईला जातं."

प्रिया मलिक लिहितात, "जान कुमार सानू राहुल वैद्यपेक्षा चांगला गायक आहे आणि व्यक्ती म्हणूनही तो राहुल वैद्यपेक्षा चांगला आहे."

भांडण, तंटे, प्रेम, कट, कारस्थान असा सगळा मसाला असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा यंदाचा 14 वा सीझनही गाजतोय. राहुल वैद्यमुळे हा आठवडा चांगलाच गाजतोय. घराणेशाही आणि मराठीचा सन्मान या मुद्द्यावरून पुढे काय घडतं, हे लवकरच कळेल.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top