Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'ब्लू मून' : एकाच महिन्यातली दुसरी पौर्णिमा, भारतात याच्याशी संबंधित 'अशा' आहेत मान्यता

'ब्लू मून' : एकाच महिन्यातली दुसरी पौर्णिमा, भारतात याच्याशी संबंधित 'अशा' आहेत मान्यता

Getty Images

चंद्राबाबत एक विशेष घटना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज (31 मे) रात्री आकाशाकडे पाहा आणि त्या अंधारात तुम्हाला चांदीच्या ताटासारखा पूर्ण चंद्र दिसतो का हे पाहा? ही मे महिन्यातील दुसरी पौर्णिमा आहे.

मात्र त्याचं नाव वेगळं आहे. तो आहे 'ब्लू मून'.

त्याचं नाव 'ब्लू मून' असलं तरी हा चंद्र मात्र निळ्या रंगाचा असणार नाही.

युरोपियन संस्कृतीमध्ये निळा रंग दुर्मिळपणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच ते दुर्मिळपणे घडणाऱ्या किंवा असामान्यपणे घडणाऱ्या गोष्टींसाठी 'निळ्या' रंगाचा वापर करतात.

ज्याप्रमाणे आपण रागासाठी लाल रंग आणि शांततेसाठी पांढऱ्या रंगाचा वापर करतो, तसंच हेदेखील आहे.

एकाच महिन्यात दोनदा पौर्णिमा असणं, ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे त्या महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेला 'ब्लू मून' असं म्हटलं जातं.

 Getty Images

एकाच महिन्यात 2 पोर्णिमा कशा येतात?

यामागचं कारण चंद्राच्या गतीमध्ये आहे. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. मात्र ही प्रदक्षिणा घालत असताना तो नेहमी एकाच गतीमध्ये नसतो.

ज्यावेळी सूर्य एका बाजूला असतो आणि पृथ्वी मध्यभागी असते आणि चंद्र दुसऱ्या बाजूला असतो, म्हणजे सूर्य-पृथ्वी-चंद्र अशा क्रमानं जेव्हा स्थिती असते, तेव्हा पौर्णिमा असते किंवा आपल्याला दिसते.

त्या क्षणी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या तिघांची केंद्रे एकाच अक्षावर येतात. त्याचवेळेस पौर्णिमा असते.

पौर्णिमा येण्यास किती दिवस लागतात?

चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 27.3 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र आपल्याला दर 27.3 दिवसांनी पौर्णिमा दिसत नाही.

चंद्र जोपर्यंत त्याची 360 अंशाची प्रदक्षिणा पूर्ण करतो, तोपर्यंत पृथ्वीदेखील तिच्या कक्षेत पुढे सरकलेली असते.

पौर्णिमा दिसण्यासाठी 'सूर्य-पृथ्वी-चंद्र' अशा क्रमानं विशिष्ट स्थिती निर्माण होणं आवश्यक असते. मात्र चंद्राची प्रदक्षिणा होईपर्यंत पृथ्वी तिच्या कक्षेत पुढे सरकल्यामुळे ही विशिष्ट स्थितीदेखील पुढे सरकलेली असते. त्यामुळे पौर्णिमा दिसत नाही.

सूर्याच्या अगदी विरुद्ध दिशेला जाण्यासाठी चंद्राला थोडं अधिक अंतर कापावं लागतं. या वाढलेल्या अंतरामुळे पौर्णिमेचं सरासरी चक्र वाढून 29.53 दिवसांचं होतं. म्हणजेच 29 दिवस, 12 तास आणि 44 मिनिटं. इतक्या काळानं पौर्णिमा येते.

 Getty Images

याशिवाय, चंद्र पृथ्वीभोवती अगदी वर्तुळाकर कक्षेत प्रदक्षिणा घालत नाही. तो एका लंबवर्तुळाकर म्हणजे अंडाकृती कक्षेत प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा तो अधिक वेगानं फिरतो.

या बिंदूला 'पेरिजी' असं म्हणतात. तर जेव्हा तो पृथ्वीपासून सर्वात दूर असतो, तेव्हा त्याची गती कमी होते. या बिंदूला 'अपोजी' म्हणतात.

जर पौर्णिमा पेरीजीच्या वेळेस आली, तर चंद्र, सूर्य-पृथ्वी यांच्या प्रतलावर अधिक गतीनं येऊन पोहोचतो. मात्र जर पौर्णिमा अपोजी बिंदूवर आली, तर चंद्राला त्या स्थानावर येण्यास अधिक कालावधी लागतो.

यामुळे लागोपाठच्या 2 पौर्णिमांमधील कालावधी बदलत असतो. 2 पौर्णिमांमधील सर्वात कमी कालावधी जवळपास 29.18 दिवसांचा असू शकतो. तर सर्वाधिक कालावधी जवळपास 29.93 दिवसांचा असू शकतो.

2 पौर्णिमांमधील या फरकाची आपण इतकी काळजी का करावी? याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मात्र, याच छोट्या फरकातून आपण आपल्या कॅलेंडर आणि आपल्या संस्कृतीमध्ये चंद्राचं कसं आकलन करतो, चंद्राबद्दल कसं समजून घेतो हे ठरतं.

पौर्णिमेच्या बाबतीत 'ब्लू मून' नाव कसं पडलं?

खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून, ऋतू म्हणजे इक्विनॉक्स किंवा विषुवदिन (जेव्हा दिवस आणि रात्र समान असतात) आणि सोलस्टिसेस किंवा अयनदिन (हिवाळा) यांच्यामधील कालावधी.

आपलं सौर वर्ष जवळपास 365.24 दिवसांचं असतं. त्यामुळे प्रत्येक ऋतू साधारणपणे 91.3 दिवसांचा असतो.

2 पौर्णिमांमधील सरासरी अंतर किंवा कालावधी 29.53 दिवसांचा असतो. त्यामुळे एका ऋतूमध्ये सर्वसामान्यपणे 3 पौर्णिमा असतात.

मात्र चंद्राच्या गतीमध्ये झालेल्या बदलांमुळे, काहीवेळा एकाच ऋतूमध्ये 4 पौर्णिमादेखील येऊ शकतात.

मध्ययुगीन काळात युरोपात हीच बाब एक मोठी समस्या बनली होती. तेव्हा चर्चच्या सणांच्या तारखांचं मोजमाप किंवा वेळापत्रक निश्चित करण्याची जबाबदारी ख्रिश्चन धर्मगुरूंवर असायची.

एका वर्षात 13 पौर्णिमा येणं ही बाब त्यांना असामान्य वाटायची. अनेकजण तर याला अशुभ मानत असत.

 Getty Images

अशा वर्षात, जर एका ऋतूत 4 पौर्णिमा आल्या, तर त्या ऋतूतील 'तिसऱ्या पौर्णिमे'ला 'ब्लू मून' असं म्हटलं जातं. ब्लू मून या शब्दाचा चंद्राच्या रंगाशी काहीही संबंध नाही.

शतकानुशतकं, इंग्रजी भाषेमध्ये एखाद्या दुर्मिळपणे किंवा क्वचितच घडणाऱ्या गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी किंवा तसा अर्थ दाखवण्यासाठी 'वन्स इन अ ब्लू मून' या वाक्प्रचाराचा वापर केला जायचा.

एकाच वर्षात 13 पौर्णिमा दिसणं हेदेखील अतिशय दुर्मिळ असतं. त्यामुळे अशा वर्षाला घटनांच्या सामान्य चक्रांपेक्षा वेगळं ठरलेलं वर्ष, असं मानलं जात असे. या दुर्मिळ घटनेची आठवण ठेवण्यासाठी म्हणून 'ब्लू मून' हे नाव प्रचलित झालं.

पुढे 14 व्या आणि 15 व्या शतकात युरोपियन लोक अमेरिकेत गेले. तिथे या कथेला एक नवीन वळण मिळालं.

युरोपियन लोक जेव्हा अमेरिकेत स्थायिक झाले, तेव्हा त्यांनी स्वत:बरोबर युरोपातील सांस्कृतिक गोष्टी, परंपरादेखील नेल्या.

त्याचबरोबर त्याच्यावर तिथल्या मूळ जमातींच्या, ज्यांना 'फर्स्ट पीपल्स' किंवा 'रेड इंडियन' म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या कालमापन पद्धतीचाही प्रभाव पडला.

एक अत्यंत लोकप्रिय चूक

अमेरिकेतील प्राचीन जमाती वेळेचं आकलन करण्यासाठी ऋतू आणि चंद्राच्या कलांचं बारकाईनं निरीक्षण करायचे.

उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यात जेव्हा पौर्णिमा यायची, तेव्हा त्यांच्या गावाबाहेर भुकेले लांडगे ओरडायचे किंवा आरोळ्या द्यायच्या. त्यामुळे काही जमाती याला 'वुल्फ मून' म्हणजे 'लांडग्यांची पौर्णिमा' असं म्हणत.

त्याचप्रमाणे, मे महिन्यातील पौर्णिमेला फुलं उमललेली असायची, तेव्हा ते त्याला 'फ्लॉवर मून' म्हणजे 'फुलांची पौर्णिमा' असं म्हणायचे.

त्या काळातील पंचांगांनी (एकप्रकारचं कॅलेंडर) अमेरिकेतील स्थानिक किंवा मूळ जमातींचं ज्ञान आणि युरोपियन परंपरा एकत्रित करून प्रत्येक पौर्णिमेला त्या त्या ऋतूंचं प्रतिनिधित्व करणारं नाव दिलं.

  • जानेवारी - वुल्फ मून (लांडग्यांची पौर्णिमा)
  • फेबुवारी - स्नो मून (हिम पौर्णिमा)
  • मार्च - वॉर्म मून (उबदार पौर्णिमा)
  • एप्रिल - पिंक मून (गुलाबी पौर्णिमा)
  • मे - फ्लॉवर मून (फुलांची पौर्णिमा)
  • जून - स्ट्रॉबेरी मून (स्ट्रॉबेरीची पौर्णिमा)
  • जुलै - बक मून (हरीण किंवा बोकडातील नराची पौर्णिमा)
  • ऑगस्ट - स्टर्जन मून (स्टर्जन पौर्णिमा) (स्टर्जन हा एक अतिप्राचीन, मोठा मासा असतो)
  • सप्टेंबर - हार्वेस्ट मून (कापणीच्या वेळची पौर्णिमा)
  • ऑक्टोबर - हंटर्स मून (शिकाऱ्यांची पौर्णिमा)
  • नोव्हेंबर - बीव्हर मून (जलमांजराची पौर्णिमा)
  • डिसेंबर - कोल्ड मून (शीत पौर्णिमा)
 Getty Images

कालांतरानं ही नावं अमेरिकेतील संस्कृतीचा भाग बनली. त्यामुळे प्रत्यके पौर्णिमेला काहीतरी विशिष्ट नाव असणं आवश्यक ठरलं.

जर एखाद्या ऋतूमध्ये 4 पौर्णिमा आल्या, तर त्यातील तिसऱ्या पौर्णिमेला 'ब्लू मून' असं म्हटलं जायचं. अशाप्रकारे ब्लू मून या संकल्पनेचा जन्म झाला.

पण मग या शब्दाचा अर्थ पुन्हा बदलला. 'मेन फार्मर्स अल्मॅनॅक' हे पुस्तक 1937 मध्ये प्रकाशित झालं. या पुस्तकात म्हटलं आहे की, जर एका ऋतूमध्ये 4 पौर्णिमा असतील, तर त्यातील तिसऱ्या पौर्णिमेला 'ब्लू मून' म्हटलं जातं.

मात्र, पुढे खगोलशास्त्रातील एका प्रसिद्ध लेखकानं या स्पष्टीकरणाचा चुकीचा अर्थ लावला. त्यानं सांगितलं की, एकाच महिन्यात येणारी दुसरी पौर्णिमा ही 'ब्लू मून' असते.

त्यानं लावलेला हा चुकीचा अर्थ, पुढे अतिशय लोकप्रिय झाला. म्हणूनच आज जेव्हा लोक 'ब्लू मून' म्हणतात, तेव्हा सर्वसामान्यपणे त्याचा अर्थ एकाच ग्रेगेरियन कॅलेंडर महिन्यात येणारी दुसरी पौर्णिमा असा असतो.

एकाच महिन्यातील 2 पौर्णिमा

एकाच महिन्यात 2 पौर्णिमा येणं ही इतकी दुर्मिळ घटना का असते?

ग्रेगेरियन कॅलेंडरमधील सर्वच महिन्यांमध्ये समान संख्येनं दिवस नसतात. काही महिन्यांमध्ये 28 दिवस असतात. काहींमध्ये 30 दिवस असतात, तर काही महिन्यांमध्ये 31 दिवस असतात.

मात्र दोन लागोपाठच्या पौर्णिमांमधील अंतर किंवा कालावधी 29.18 दिवस ते 29.93 दिवसांपर्यंतचा असतो.

त्यामुळे, जर एखाद्या महिन्यात 31 दिवस असतील आणि त्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जर त्या महिन्यातील पहिली पौर्णिमा असेल, तर त्या महिन्याच्या शेवटी दुसरी पौर्णिमा येण्याची शक्यता असते.

अशाप्रकारे, सध्याच्या काळात एकाच महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेला 'ब्लू मून' असं म्हणतात.

अशीच, एकाच महिन्यातील दुसरी पौर्णिमा 31 मे रोजी आहे. या महिन्यातील पहिली पौर्णिमा 1 मे रोजी होती. तर त्याच महिन्यातील दुसरी पौर्णिमा 31 मे रोजी आहे. आजच्या संदर्भात, याला 'ब्लू मून' असं म्हणतात.

 Getty Images

ही पौर्णिमा 'मायक्रोमून' म्हणजे 'छोटी पौर्णिमा' देखील असेल. या पौर्णिमेच्या वेळेस चंद्र पृथ्वीपासूनच्या त्याच्या सर्वात लांबच्या अंतरावर म्हणजे अपोजीवर असेल. त्यामुळे तो नेहमीपेक्षा आकारानं थोडा लहान दिसेल. मात्र आकारातील हा फरक फक्त आपल्या डोळ्यांनी लक्षात येणं कठीण असतं.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आधुनिक अर्थानं वापरली जाणारी 'ब्लू मून' ही काही खरोखरंच खगोलशास्त्रीय घटना नाही.

म्हणजे ती काही अंतराळात घडणारी एखादी विशेष घटना नाही. तर ती एक सांस्कृतिक संकल्पना आहे. मानवानंच तयार केलेल्या एका विशिष्ट कॅलेंडर पद्धतीतील चंद्राच्या हालचालींची तुलना करून ही संकल्पना निर्माण केली आहे. म्हणजेच ती अवकाशीय घटना नसून मानवी संकल्पना आहे.

आपण जेव्हा भारतीय पंचांगांचं निरीक्षण करतो, तेव्हा सत्य आपल्याला अधिकच स्पष्ट होतं.

ग्रेगेरियन कॅलेंडरमधील महिने हे ऐतिहासिक कारणांमुळे तयार केलेले कृत्रिम कालखंड आहेत. मात्र भारतीय चांद्र-सौर कॅलेंडरमध्ये महिन्यांचा थेट संबंध चंद्राच्या हालचाली आणि त्याच्या स्थितीशी असतो.

भारतातील काही परंपरांमध्ये, एका पौर्णिमेपासून पुढील पौर्णिमेपर्यंतचा काळ एक महिना म्हणून गणला जातो. याला 'पौर्णिमांत' असं म्हणतात. तर इतर परंपरांमध्ये, एका अमावस्येपासून ते पुढील अमावस्येपर्यंतचा काळ एक महिना म्हणून गणला जातो. याला 'अमंत' असं म्हणतात.

भारतीय परंपरेत 'ब्लू मून'ची संकल्पना आहे का?

भारतात पौर्णिमा ही काही फक्त एक खगोलशास्त्रीय घटना मानली जात नाही. तर त्याचा धर्म, सामाजिक जीवन, शेती, उत्सव-सण आणि संस्कृतीशी खोलवर, घट्ट संबंध आहे.

उदाहरणार्थ, 'थाईपुसम' हा तामिळ सण लक्षात घ्या. 'थाई' (जानेवारीचा मध्य ते फेब्रुवारीचा मध्य) या तामिळ सौर महिन्यातील पौर्णिमेला हा सण येतो. संपूर्ण आग्नेय आशियात हा सण अत्यंत श्रद्धेनं आणि भक्तीभावानं साजरा केला जातो.

'शरद पौर्णिमा' हा उत्तर भारतासाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो. तो अश्विन महिन्यातील (सप्टेंबर/ऑक्टोबर) पौर्णिमेला असतो. या पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळापासून खीर बनवण्याची आणि ती चंद्रप्रकाशात ठेवण्याची प्रथा आहे.

पारंपारिकदृष्ट्या असं मानलं जातं की, त्या रात्री पडणारा चंद्रप्रकाश किंवा चांदण्यामध्ये विशेष पोषक गुणधर्म किंवा अमृतगुण असतात. तसंच, वर्षभरातील इतर सर्व पौर्णिमांच्या तुलनेत ही पौर्णिमा सर्वात तेजस्वी मानली जाते.

 Getty Images

प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत. या लाकडी मूर्तीच त्या मंदिरातील मुख्य देवता आहेत.

आषाढ महिन्यात (म्हणजे जेव्हा 'अधिक' महिना येतो) जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा या मूर्तींचं नूतनीकरण केलं जातं. याला 'नवकालेबर' उत्सव असं म्हणतात.

तर वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही 'बुद्ध पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. बौद्ध परंपरेत हा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. तसंच जैन परंपरेतदेखील पौर्णिमांना अत्यंत महत्त्व आहे.

तामिळ आणि तेलुगू परंपरांमध्ये देखील पौर्णिमांना विशेष स्थान आहे. 'संगम साहित्या'त असं म्हटलं आहे की, कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री महिला त्यांच्या घरासमोर म्हणजे अंगणात मातीच्या पणत्या लावत असत.

साहित्यिक पुराव्यांमधून असं दिसतं की, इंद्र विला म्हणजे इंद्राचा उत्सव चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होत असे. प्राचीन चोल राजवटीत पर्जन्यवृष्टीसाठी हा उत्सव साजरा केला जायचा.

हा उत्सव महिनाभर चालायचा. या कालावधीत पर्जन्यदेवता म्हणजे इंद्राला प्रसन्न करण्यासाठी संगीत, नृत्य आणि विशेष पूजा केल्या जायच्या.

'संताल' जमात ही भारतातील सर्वात मोठ्या आदिवासी समूहांपैकी एक आहे. या संताल जमातीचे लोक 'सोराई' महिन्यातील (म्हणजे चांद्र-सौर पंचांगानुसार कार्तिक महिना) पौर्णिमेच्या दिवशी एका भव्य, पवित्र तीर्थयात्रेला निघतात.

हजारो लोक त्यांच्या कुलदेवतांची (मूळ पुरुष) पूजा करण्यासाठी झारखंडमधील बोकारोमधील 'लुगुबुर'च्या पवित्र डोंगरांवर जातात. तिथल्या एका गुहेत ही पूजा केली जाते.

 Getty Images

मध्य भारतात 'ओरान' आणि 'मुंडा' या आदिवासी जमाती आहेत. त्यांच्या प्राचीन धर्मात भाद्रपद महिन्यातील (ऑगस्टच्या मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत) पौर्णिमेचा दिवस हा त्यांच्या 3 महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे.

जेव्हा 31 मे रोजी आकाशात 'फ्लॉवर मून' म्हणजे दुसरी पौर्णिमा असेल, तेव्हा अमेरिकेत अनेकजण त्याला 'ब्लू मून' असं म्हणतील. अमेरिकेतील लोक जे कॅलेंडर पाळतात, त्यानुसार हे योग्य नाव आहे.

मात्र भारत आणि आग्नेय आशियासारख्या प्रदेशात या पौर्णिमेला कोणतंही विशेष असं नाव नाही.

अगदी त्या दिवशी चंद्रदेखील त्याच्या कक्षेत नेहमीप्रमाणेच प्रदक्षिणा घालतो. तो 'वुल्फ मून' आहे की 'ब्लू मून' आहे की एक 'पौर्णिमा' आहे, याची त्याला अजिबात कल्पना नसते. ही सर्व नावं म्हणजे निव्वळ मानवनिर्मित गोष्टी आहेत!

अंतराळातील किंवा खगोलीय हालचाली या निसर्गाचा नियम असतात. मात्र त्या हालचालींना किंवा घटनांचा काहीतरी विशिष्ट अर्थ लावणं ही मानवी संस्कृतीतून निर्माण झालेली बाब आहे.

(लेखक : प्राध्यापक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर), मोहाली.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

Blue moon Getty Images

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi