होम
बॉक्सर कलैवानीचं 2024 च्या ऑलिंपिकमध्ये खेळण्याचं लक्ष्य

आर्थिक अडचणी आणि सामाजिक दडपणं यांचा मुकाबला करत बॉक्सिंग खेळात आगेकूच करणारी कलैवानी देशातल्या उदयोन्मुख बॉक्सर्सपैकी एक आहे.
2019 मध्ये विजयनगर इथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 18 वर्षीय कलैवानीने रौप्यपदक पटकावलं तेव्हापासून बॉक्सिंग वर्तुळात तिचं नाव सातत्याने घेतलं जात आहे.
त्या स्पर्धेत 'सर्वोत्कृष्ट होतकरू खेळाडू'चा मान कलैवानीने पटकावला होता.
तिची वाटचाल स्तिमित करणारी आहे. मात्र त्यासाठी तिने खाल्लेल्या खस्ता दुर्लक्षित राहतात.
25 नोव्हेंबर 1999 रोजी चेन्नईत बॉक्सिंगची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात कलैवानीचा जन्म झाला. तिचे वडील एम. श्रीनिवासन तरुणपणी बॉक्सर होते. तिचा भाऊ राष्ट्रीय पातळीवर खेळणारा बॉक्सर आहे.
बाबा घरी भावाला मार्गदर्शन करताना कलैवानीने पाहिलं. त्यातूनच तिला बॉक्सिंगची आवड निर्माण झाली. वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला पाठिंबा दिला आणि तिचं प्रशिक्षण सुरू झालं.

कलैवानीच्या घरचे खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहिले मात्र नातेवाईक आणि शिक्षकांनी बॉक्सिंगमध्ये मोडता घातला. कलैवानीने बॉक्सिंगऐवजी शिकण्यावर लक्ष केंद्रित करावं असं तिच्या शिक्षकांचं म्हणणं होतं.
शिक्षकांप्रमाणे तिच्या काही नातेवाईकांनीही बॉक्सिंग नव्हे तर शिक्षण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं होतं. बॉक्सिंग खेळत लागलीस तर लग्नही होणार नाही असंही नातेवाईक म्हणाले.
सामाजिक दडपणांच्या बरोबरीने कलैवानीकडे सरावासाठी आधुनिक सोयीसुविधाही नव्हत्या. व्यायामशाळा, पायाभूत सुविधा, आधुनिक प्रशिक्षण, पोषक आहार या गोष्टी कोणत्याही खेळाडूसाठी आवश्यक असतात. कलैवानीच्या नशिबात हे काही नव्हतं. मात्र तिच्या वडिलांनी हार मानली नाही आणि ते कलैवानीला मार्गदर्शन करत राहिले. बॉक्सर म्हणून घडण्यात वडील आणि भावाची भूमिका मोलाची असल्याचं कलैवानी सांगते.
त्यांच्या परिश्रमाला फळं मिळू लागली जेव्हा सबज्युनियर गटात कलैवानीने पदकांची कमाई सुरू केली. तिच्या यशाने शिक्षक आणि नातेवाईकांचा दृष्टिकोन बदलू लागला.
प्रसिद्धीझोतात कलैवानी
2019 मध्ये कलैवानीच्या कारकिर्दीत निर्णायक क्षण आला जेव्हा तिने वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत मंजू राणीविरुद्ध तिला पराभवाला सामोरं जावं लागलं. सहा वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदकविजेत्या मेरी कोम यांच्या हस्ते कलैवानीला गौरवण्यात आलं.
या पदकाने, कामगिरीने कलैवानीचा आत्मविश्वास दुणावला आणि चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधांची दारं तिच्यासाठी खुली झाली. इटलीचे प्रशिक्षक रफाले ग्रमास्को यांच्या मार्गदर्शनाखाली कलैवानीचा सराव सुरू झाला. कर्नाटकमधल्या जेएसडब्ल्यू इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स इथे तिला अत्याधुनिक सोयी सुविधा मिळू लागल्या.

त्याच वर्षी काठमांडू इथं झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत कलैवानीने ४८ किलो वजनी गटात खेळताना नेपाळच्या महाराजन ललितावर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
उज्वल भवितव्याकडे वाटचाल
युवा भारतीय बॉक्सरची उद्दिष्ट खणखणीत स्पष्ट आहेत. कलैवानीला कॉमनवेल्थ स्पर्धेतलं सुवर्णपदक खुणावतं आहे. 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला देशासाठी पदक मिळवायचं आहे. कलैवानी सध्या 48 किलो वजनी गटात सहभागी होते. ऑलिम्पिक स्पर्धेत हा वजनी गट नाही. आणखी दोन वर्ष या गटात खेळून, त्यानंतर आणखी वजनी गटातून खेळायचं तिचं लक्ष्य आहे.
खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर, युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणारी कोच व्हायचं कलैवानीचं स्वप्न आहे. भारतीय महिला बॉक्सर्सची कामगिरी चांगली व्हायची अपेक्षा असेल तर लोकांचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे असं कलैवानीला वाटतं. खेळांमध्ये कारकीर्द घडवू पाहणाऱ्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळायला हवं असं कलैवानी सांगते.
वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
source: bbc.com/marathi