Thursday, 12 Dec, 10.53 pm BBC मराठी

होम
CAB : आसामध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू, इंटरनेटवरील निर्बंध कायम

आसाममधील गुवाहाटी शहरात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

आसामचे पोलिस महासंचालक भाष्कर ज्योती महंता यांनी बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितलं, की या संघर्षामध्ये काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. आंदोलकांचा मृत्यू पोलिसांच्याच गोळीने झाला की नाही, हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही.

भाष्कर ज्योती महंता यांनी म्हटलं, दोन लोकांचा मृत्यू गोळी लागून झाला आहे. त्यांना गोळी कशी लागली याचा आम्ही तपास करत आहोत. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमकी झाल्या आहेत. यामध्ये 7-8 पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. गुवाहाटीच नाही तर राज्याच्या अन्य भागातही अशा चकमकी झालेल्या आहेत.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की एका आंदोलकाचा हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या आंदोलकाचा मृत्यू उपचारादरम्यान झाला.

गुरुवारी (12 डिसेंबर) शहरामध्ये संचारबंदी असूनही हजारो लोक रस्त्यावर उतरले होते.

आंदोलकांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या समोर एका मोठ्या मैदानात सभा घेण्याचा आणि शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या सभेत 'जय अखम' (जय आसम) आणि 'कैब आमी ना मानू' (आम्ही कॅब मानत नाही ) अशा घोषणा दिल्या.

सरकार विरुद्ध आंदोलक

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बीबीसी प्रतिनिधीशी बोलताना म्हटलं, की सरकारनं आंदोलकांकडे चर्चेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. लोकांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं आहे.

मात्र आंदोलकांचं नेतृत्व करणाऱ्यांपैकी एक असलेल्या समुज्जल भट्टाचार्य यांनी सरकारकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलं.

दरम्यान, आसामच्या दहा जिल्ह्यांमधील मोबाईल इंटरनेट सेवेवरील निर्बंध शनिवारपर्यंत (14 डिसेंबर) वाढविण्यात आले आहेत. दिब्रूगढ, गुवाहाटी आणि तिनसुकिया जिल्ह्यातील संचारबंदी अजूनही कायम आहे.

आसामचं शेजारी राज्य मेघालयमध्येही मोबाईल इंटरनेट आणि मेसेंजिंग सेवांवर निर्बंध लादल्याचं वृत्त पीटीआयनं गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलं आहे.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top