Saturday, 19 Sep, 8.28 pm BBC मराठी

होम
चोरीला गेलेली 22 कोटी रुपयांची दुर्मिळ पुस्तकं रोमानियामध्ये सापडली

अत्यंत दुर्मिळ अशी 200 पुस्तकं लंडनमधून चोरीला गेली होती. ही पुस्तकं रोमानिया देशात एका खेडेगावात सापडली आहे. ही पुस्तकं एका घरात जमिनीत पुरून ठेवण्यात आलेली होती.

ही पुस्तकं अत्यंत दुर्मिळ आणि महागडी अशी मानली जातात. त्यांची किंमत अंदाजे 25 लाख युरोंपेक्षाही जास्त म्हणजेच भारतीय चलनात 22 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

गॅलिलिओ आणि न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तींचा यामध्ये समावेश होता.

जानेवारी 2017 मध्ये ही पुस्तकं चोरीला गेली होती. त्यावेळी फेलथॅम परिसरातील एका गोदामाच्या छताचा काही भाग कटरच्या साहाय्याने कापून चोरट्यांनी ही चोरी केली होती.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले संशयित चोरटे रोमानियातील संघटित गुन्हेगारी आणि गँगचा भाग आहेत.

बल्गेरियामध्ये किंमती वस्तू लुटण्यात या गँगचाच हात होता, अशी माहिती लंडनच्या स्थानिक मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिली.

रोमानियाच्या ईशान्य दिशेला निम्त नामक एक परिसर आहे. याठिकाणी भागात एका घरात खड्डा करून ही पुस्तकं लपवून ठेवलेली होती. हा मुद्देमाल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

या पुस्तकांच्या शोधासाठी पोलिसांनी युके, रोमानिया आणि इटलीमध्ये गेल्यावर्षी जून महिन्यापासून आतापर्यंत 45 ठिकाणी छापे मारले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे.

दांते पुस्तकाची दुर्मिळ आवृत्ती, स्पेनमधील सुप्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया यांच्यासह 16 व्या आणि 17 शतकात गॅलिलिओ आणि आयझॅक न्यूजन यांनी आपल्या भौतिकशास्त्रातील शोधादरम्यान लिहिलेल्या पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.

"ही पुस्तकं अतिशय दुर्मिळ आहेत. यांना जगाच्या इतिहासात प्रचंड महत्त्वाचं स्थान आहे. ते जागतिक वारसा म्हणून ओळखली जातात," असं मेट्रोपोलिटन पोलिसांतील पोलीस अधिकारी अँडी डरहॅम यांनी सांगितलं.

या पुस्तकांचा लिलाव अमेरिकेच्या लास वेगास येथे आयोजित करण्यात आलेला होता. ही पुस्तकं लिलावास पाठवण्यासाठी ती एका गोदामात एकत्र ठेवण्यात येत होती. मात्र यादरम्यान इथून त्यांची चोरी झाली होती.

फेलथेममधील गोदाम लंडनच्या हिथ्रो विमानतळाजवळ आहे. याठिकाणची कडक सुरक्षाव्यवस्था भेदून चोरट्यांनी पुस्तकं पळवून नेली होती.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top