होम
डॉ. जयंत नारळीकर: 'ब्रह्मास्त्र होतं तर मग रामाच्या राज्यात वीज उपलब्ध होती का?'

नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे.
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर नेहमीच आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. मग त्यांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे.
दोन वर्षांपूर्वी बीबीसी मराठीनं घेतलेली त्यांची मुलाखत पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. या मुलाखतीत त्यांनी अनेक सद्य विषयांवरचं त्यांचं चिंतन मुक्तपणे मांडलं, दर्शकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही अगदी मनमुराद उत्तरं दिली.
प्रश्न: डॉ नारळीकर, सध्या आम्ही सारे गोंधळलेले आहोत. डार्विनच्या सिद्धांतांविषयी, आईनस्टाईनच्या सिद्धांतांविषयी जे आम्ही शिकलो, पाठ्यपुस्तकांतून वाचलं त्यापेक्षा वेगळं आम्हाला काही सांगितलं जातं आहे. या सगळ्या कल्लोळाकडे कसं पहायचं? डार्विनचं म्हणणं चूक होतं? आईनस्टाईनचं संशोधन त्याच्यापूर्वीच भारतात झालं होतं?
डॉ. नारळीकर: मी कदाचित तुमचा गोंधळ अधिक वाढवेन, पण त्याला काही हरकत नसावी. आपल्याकडे संस्कृतात एक वचन आहे, 'वादे वादे जायते तत्त्वबोध:' जेव्हा विज्ञानाचे वेगवेगळे पैलू घेऊन लोक संशोधन करत असतात वा वाद करत असतात तेव्हा असा असा हा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. ते आपल्या हिताकरताच होतं.
डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पिशीज'बद्दल आपण बोलतो तेव्हा हे ध्यानात घ्यायला हवं की पृथ्वीवर जिवांची उत्पत्ती नेमकी कशी झाली याचं नेमकं उत्तर आपल्याला माहीत नाही. अशा वेळेस वेगवेगळे वाद निर्माण होणं साहजिक आहे.
खुद्द डार्विनही हा दावा करू शकत नाही की, पृथ्वीवर जीवोत्पत्ती कशी झाली वा त्यांच्यासाठी योग्य वातावरण कसं मिळालं याचं नेमकं उत्तर नाही. आपण केवळ असा विचार करायला हवा की, आपण फक्त शोधत जायचं आणि कधीतरी आपल्याला उत्तर मिळेल. उदाहरणार्थ माझे गुरू फ्रेड हॉयल आणि त्यांचे सहकारी विक्रमसिंघे यांनी जीवोत्पत्तीची एक वेगळी कल्पना मांडली होती की, हे जीव बाहेरील अंतराळातून धुमकेतूमार्फत पृथ्वीच्या वातावरणात आले. ती कल्पना होती. उत्तर आपल्याला माहीत नाही. जेव्हा उत्तर माहीत नसतं तेव्हा वाद होतात वा भांडणंही होतात.
- 'मीसुद्धा उपोषणाला बसलोय कारण....'
- वाढत्या वजनामुळे वाढतोय कॅन्सर!
- काराकोरमच्या अनवट वाटेवरचे ते २२ दिवस...
प्रश्न: वैज्ञानिक वाद होतात ते तर समाज पाहात असतोच आणि त्यातून काही नवं संशोधन होत असतं. पण जेव्हा एखादे मंत्री डार्विनच्या सिद्धांतावर, माकड आमचे पूर्वज नव्हते असं म्हणतात किंवा दुसरे म्हणतात की, आईनस्टाईननं जे म्हटलं ते आमच्याकडे वेदांमध्ये पूर्वीच होतं, तेव्हा राजकीय अभिनिवेशानं केलेल्या या विधानांकडे तुमच्यातला वैज्ञानिक कसं पाहतो?
डॉ. नारळीकर : कोण हे विधान करतंय, हे आपण बघायचं. जी व्यक्ती हे विधान करते तिची पार्श्वभूमी आपल्याला माहिती हवी. त्यावरून ठरवता येईल की, कितपत आपण त्या विधानकडे लक्ष द्यायचं. कोणी डॉक्टर असू शकतील, वा तुम्ही पी.एचडी झालात की तुम्ही तज्ज्ञ झालात असं मी म्हणत नाही. त्यामुळे माझ्या ज्ञानात एकदम वाढ झाली असं मानायला मी तयार नाही.
आपण सदैव शिकत असतो. काही लोकांना वाटतं की आपल्याला सगळं समजतं आणि काहींना वाटतं की, आपल्याला अजून बरंच शिकायचंय. मी या दुसऱ्या प्रकारच्या लोकांमधला आहे. राजकीय अभिनिवेशाबद्दल म्हणाल तर इथं विचारस्वातंत्र्य आहे, त्यामुळं तुम्ही हवं ते व्यक्त करू शकता. पण जर तुमच्या बोलण्याला काही वैज्ञानिक आधार हवा आहे असं वाटत असेल तर विज्ञानाला जे पुरावे आवश्यक असतात ते द्यावे लागतील. पण जर काहींना हे वैज्ञानिक निकष नको असतील तर त्यांना हवं ते बोलू दे. त्यांच्या बोलण्याला काही महत्त्व राहत नाही.
प्रश्न: बऱ्याचदा असे दावे ऐकायला मिळतात की, जे आधुनिक विज्ञानात संशोधन होतं आहे ते तर आमच्याकडे वेद-पुराणांमध्ये अगोदरच होतं. हे खरंच काही असं होतं का?
डॉ. नारळीकर: 'ब्रह्मास्त्रा'चा उल्लेख जो आपल्याकडे होतो त्याबद्दल असा दावा होतो की, ते न्यूक्लिअर डिव्हाईस होतं. म्हणजे आपल्या पूर्वजांना न्यूक्लिअर फिजिक्स माहिती असलं पाहिजे. ते जर तुम्ही मान्य केलंत तर मग त्याला काही पार्श्वभूमी असली पाहिजे, एकदम कोणी जाऊन ते न्यूक्लिकर फिजिक्स आहे असं कोणी म्हणत शकत नाही. म्हणजे मग तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचं विद्युतचुंबकीय शास्त्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम), हेही माहीत असायला हवं. त्याशिवाय तुम्ही न्यूक्लिअर फिजिक्स पर्यंत पुढे जाऊच शकणार नाही.
मग जर तुम्हाला विद्युतचुंबकीय शास्त्र माहीत होतं, तर मग जी पंखा, दिवे यांसारख्या घरगुती वापरासाठी जी वीज उपलब्ध असायला होती, ती होती का? सगळे राजकीय पक्ष आजही सर्वांपर्यंत वीज पोहोचवू असंच आश्वासन देतात ना? हे सगळं हस्तिनापुरात वा रामाच्या राज्यात उपलब्ध होतं का लोकांना? कुठं तसं उदाहरण दिसत नाही. त्यामुळं मला इतकंच म्हणायचं आहे की इथं कुठं तरी गफलत आहे, अनेक गाळलेल्या जागा आहेत. त्या भरून दाखवा, मगच आम्हाला विश्वास बसेल की पूर्वी हे सगळं आपल्याला माहीत होतं.
प्रश्न: फलज्योतिषासारख्या विषयाला तुम्ही कायम आव्हान दिलंत. पण नव्या पिढीमध्ये ज्योतिष असेल, वास्तुशास्त्र असेल वा अन्य अंधश्रद्धा असतील यांच्यावरचं अवलंबित्व का वाढतंय?
डॉ. नारळीकर: ही काळजी करायची गोष्ट आहे यात शंका नाही. मी एक उदाहरण देतो. दोन विद्यार्थी आहेत. त्यातला एक अभ्यास करून, संदर्भ हुडकून चांगली तयारी करतो. दुसरा असं काही करत नाही. तो म्हणतो की, आयत्या वेळी तयारी करून परीक्षा देऊ. परीक्षा जसजशी जवळ येते तसं त्याला जाणवतं की, आपली काहीच तयारी नाही. मग काय करायचं?
अशा वेळी दोन शक्यता आहेत. तो म्हणेल की माझे वडील श्रीमंत आहेत. जर आपण परीक्षकाचा खिसा गरम केला तर आपलं काम होईल. दुसरी शक्यता ही आहे की एखाद्या देवाला नवस करायचा. या दोन्ही प्रकारांमध्ये साम्य तुम्हाला आढळत नाही का? एकात पैसे दिल्यानं परीक्षक ऐकतो आणि दुसऱ्यात देवाला तुम्ही काही ऑफर देता, देवाला जर वाटतं की, यात काही बरं आहे तर तुम्हाला पास करतो. तर माझा प्रश्न हा आहे की मग परीक्षक आणि देव या दोघांमध्ये तुम्ही काही फरक करता आहात का?
तुम्हाला वाटेल की, तुम्ही फार भाविक आहात, पण तुम्ही देवाचा अपमान करता आहात हे तुमच्या लक्षात येत नाही का? प्रश्न हा नाही की, तुम्ही नास्तिक आहात की नाही, प्रश्न हा आहे की तुम्ही विचार कसा करता.
प्रश्न: तुम्ही जगभर फिरत असताना वा संशोधनात व्यग्र असतानाही मराठीमध्ये विज्ञान सोपं करून लिहित गेलात, विज्ञानकथा लिहिल्यात. पण तुम्ही वा अजून काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत काही जण सोडले तर मराठीत विज्ञानलेखन का फार झालं नाही? आजही ते का होत नाही?
डॉ. नारळीकर: मी माझ्या अनुभवापुरतंच बोलेन. मला गोष्टीरूपात विज्ञान सांगायला आवडतं म्हणून मी ते करत गेलो. जे चांगले लेखक आहेत, जे गोष्टी चांगल्या लिहितात, ते विज्ञानविषयक काही लिहित नाहीत. ते म्हणतात की, आम्हाला विज्ञान कळत नाही, म्हणून आम्ही ते लिहू शकत नाही. माझं त्यावर म्हणणं हे की, आपल्याकडच्या चांगल्या लेखकांना जर विज्ञानाची अशी भीती वाटत असेल तर त्यांनी वैज्ञानिकांशी बोलावं, त्यांच्याकडून चांगली कल्पना घ्यावी आणि त्यावर लिहावं. मी गमतीनं असं म्हणतो की आपल्याकडच्या साहित्यसंमेलांमध्ये सुद्धा विज्ञानकथांना बॅकडोअर एक्झिट असते.
- ग्राऊंड रिपोर्ट : 'इराक धोकादायक आहेच पण इथली गरिबीही जीव घेत होती'
- अख्खं जग एकटी फिरणारी ही आजी गाजवतेय चीनचा सोशल मीडिया!
- कृष्ण कोण? कर्ण कोण? राहुल गांधी महाभारतातून काय शिकू शकतात?
source: bbc.com/marathi