Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे...' असं म्हणणारे शायर बशीर यांचं निधन

'दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे...' असं म्हणणारे शायर बशीर यांचं निधन

Vishnukant Tiwari/BBCबशीर बद्र हे बऱ्याच काळापासून डिमेन्शियाशी झुंज देत होते.

"लोग टूट जाते हैं एक घर बनाने में,

तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में."

प्रख्यात उर्दू शायर आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचा हा शेर मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्या निवडणूक प्रचारात प्रचंड गाजला होता.

उर्दू शायरीतील मोठं नाव असलेले शायर डॉ. बशीर बद्र यांचं 28 मे रोजी भोपाळ येथील राहत्या घरी निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अखेरच्या काळात ते डिमेन्शिया (स्मृतीभ्रंश) आजाराने ग्रस्त होते.

या पार्श्वभूमीवर त्यांचा जीवनपट समजून घेऊयात.

बशीर बद्र यांचा जन्म 1935 मध्ये झाला. त्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये जन्मस्थळ कानपूर असल्याची नोंद आहे. परंतु, कुटुंबीयांच्या मते त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सध्याच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील बुकियां या गावात झाला होता.

त्यांनी 1969 मध्ये अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

यानंतर त्यांनी 'आजादी के बाद उर्दू ग़ज़ल का तनक़ीदी मुताला' (स्वातंत्र्यानंतरची उर्दू गझल) या विषयावर पीएच.डी केली. त्यांच्या या अभ्यासाचा संदर्भ आजही अनेक ठिकाणी दिला जातो.

बशीर बद्र यांनी 1974 मध्ये मेरठ कॉलेजच्या उर्दू विभागात प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं. त्यांनी 80 च्या दशकाच्या अखेरपर्यंत तिथे अध्यापन केलं.

साहित्य क्षेत्रात 1970 आणि 1980 चं दशक बशीर बद्र यांच्या सर्जनशील जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. याच काळात त्यांच्या शायरीला देशात आणि विदेशातही मोठी ओळख मिळाली.

बशीर बद्र यांनी शायरीसोबतच साहित्य समीक्षा आणि शैक्षणिक लेखनातही महत्त्वाचं काम केलं आहे.

बशीर बद्र यांच्या पुस्तकांमध्ये 'इकाई', 'इमेज', 'आमद', 'आहट', 'आस' आणि 'कुल्लियाते बशीर बद्र' यांचा समावेश आहे.

'आजादी के बाद उर्दू ग़ज़ल का तनक़ीदी मुताला' (स्वातंत्र्यानंतरची उर्दू गझल) आणि 'बीसवीं सदी में ग़ज़ल' यांसारखी पुस्तकं उर्दू साहित्यात महत्त्वाची मानली जातात.

'उर्दू गझल सर्वसामान्य माणसाशी जोडली'

आपल्या दीर्घ साहित्यिक कारकिर्दीत बशीर बद्र यांना पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले. तसेच उत्तर प्रदेश उर्दू अकादमी आणि बिहार उर्दू अकादमीनेही त्यांचा गौरव केला होता.

1980 मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांना 'पोएट ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात आलं होतं.

बशीर बद्र यांच्या नावावर 18 हजारांहून अधिक शेर नोंद असल्याचं सांगितलं जातं.

त्यांचे जवळचे मित्र आणि शायर मलिकजादा जावेद यांच्या मते, बशीर बद्र यांनी उर्दू गझलला फक्त प्रेमापुरतं मर्यादित न ठेवता ती समाज आणि सामान्य माणसाच्या अनुभवांशी जोडली.

 Mehtab Alamप्रख्यात शायर बशीर बद्र याचं वयाच्या 91 व्या वर्षी भोपाळमध्ये निधन झालं.

जावेद म्हणतात, "त्यांनी आधुनिक उर्दू शायरीत मोठे बदल घडवून आणले. त्यांच्या शायरीत त्या काळातील समाजाचं वास्तव दिसायचं."

"बशीर बद्र यांनी केवळ शायरीतच नाही, तर मुशायरांच्या परंपरेतही बदल घडवून आणला", असंही ते नमूद करतात.

ते पुढे म्हणाले, "त्या काळात मुशायरांमध्ये शेरवानी, टोपी आणि कुर्ता-पायजमा असा पेहराव सामान्य होता. परंतु, ते जॅकेट आणि टाय घालून मंचावर जायचे."

बशीर बद्र हे त्यांच्या हजरजबाबी स्वभावासाठी आणि मैत्री जपण्यासाठीही ओळखले जायचे. ते सांगतात की, एकदा त्यांनी मोठं मानधन मिळणारा मुशायरा सोडून त्यांच्या लग्नाला हजेरी लावणं पसंत केलं होतं.

भोपाळचे सामाजिक कार्यकर्ते आणि बशीर बद्र यांचे चाहते सय्यद आबिद हुसेन म्हणतात की, बशीर बद्र यांची सर्वात मोठी ताकद त्यांची भाषा होती.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "त्यांचे शेर अगदी सोप्या भाषेत असायचे आणि लोकांना ते सहज समजायचे. असे शायर फार कमी असतात."

'दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे...'

बशीर बद्र यांना पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले होते. पण त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात की, त्यांची खरी ओळख त्यांच्या शेरमुळेच होती. लोक आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगी त्यांचे शेर लक्षात ठेवतात.

1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये शिमला करार होत होता. त्यावेळी झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना एक शेर ऐकवला होता.

"दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जायें तो शर्मिंदा न हों."

 BBC

हे ऐकून इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, आमचा शेर तुम्ही आम्हालाच ऐकवत आहात.

हा किस्सा सांगताना डॉ. अंजुम बाराबंकवी हे भावूक झाले होते. अंजुम बाराबंकवी यांनी बशीर बद्र यांच्या साहित्यावर पीएच.डी केली आहे.

लोकप्रिय शायर अशी ओळख

बशीर बद्र यांनी 2 विवाह केले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी डॉ. राहत बद्र यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यांना तय्यब बद्र नावाचा एक मुलगा आहे.

तय्यब बद्र यांच्या म्हणण्यानुसार, "बशीर बद्र हे दीर्घकाळापासून डिमेन्शियाने त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत होती. त्यांना लोकांना ओळखण्यातही अडचण येत होती."

 bashirbadr.comसाहित्य क्षेत्रात 1974 ते 1990 हा काळ बशीर बद्र यांच्या लेखनातील महत्त्वाचा काळ मानला जातो.

उर्दू शायरीला सोपी आणि बोलीभाषेत नवी ओळख देणाऱ्या बशीर बद्र यांचे शेर साहित्यिक कार्यक्रमांपासून ते थेट सर्वसामान्य लोकांच्या ओठांपर्यंत पोहोचले होते.

त्यांच्या गझलांमध्ये प्रेम, एकटेपणा, नातेसंबंध, विरहाचं दुःख आणि दैनंदिन आयुष्यातील अनुभव दिसायचे. त्यांचे अनेक शेर आजही मुशायरे, सोशल मीडिया पोस्ट, राजकीय भाषणं आणि सामान्य गप्पांमध्ये वारंवार ऐकायला मिळतात.

बशीर बद्र यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर लोक सतत त्यांचे शेर शेअर करत आहेत. त्यापैकी एक शेर पुन्हा पुन्हा समोर येत आहे. तो त्यांच्या घराबाहेरच्या फलकावरही लिहिलेला आहे -

उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो,

न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए.

'डिमेन्शियानंतर कार्यक्रमांना जाणं बंद केलं'

गेली अनेक वर्षे डिमेन्शियाशी झुंज देणाऱ्या बशीर बद्र यांना ओळखणारे लोक म्हणतात की, लाखो लोकांना आपले शेर मुखोद्गत करून देणारा हा शायर हळूहळू स्वतःचीच स्मरणशक्ती गमावत गेला. ही एक विडंबना होती.

त्यांचे पूत्र तय्यब म्हणतात, "बशीरसाहेब यांना जेव्हा कळलं की, त्यांना डिमेन्शिया झाला आहे, तेव्हा त्यांनी मुशायरांमध्ये जाणं बंद करण्याचा निर्णय घेतला."

"ते म्हणाले होते की, मी एक शोमन आहे आणि लोकांनी मला तोच बशीर बद्र म्हणून लक्षात ठेवावं, ज्याची प्रत्येक शब्दावर मजबूत पकड होती," असंही ते नमूद करतात.

 BBC

मध्य प्रदेश उर्दू अकादमीच्या विद्यमान संचालक डॉ. नुसरत मेहदी यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "त्यांच्याकडे कठीण शायरीही सोप्या शब्दांत मांडण्याची कला होती. त्यामुळेच हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांतील लोक त्यांना पसंत करायचे."

डॉ. मेहदी यांनी सांगितलं की, त्यांनी मध्य प्रदेश उर्दू अकादमीमध्ये बशीर बद्र यांच्यासोबत काम केलं आहे. बशीर बद्र यांनी अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं.

'महिलांचा खूप आदर करायचे'

डॉ. मेहदी यांच्या मते, बशीर बद्र महिलांचा खूप आदर करायचे. "मी जेव्हा त्यांच्या खोलीत जायचे, तेव्हा ते नेहमी उभे राहायचे. ते म्हणायचे की, महिलांचा सन्मान केला पाहिजे," अशी आठवण त्यांनी सांगितली.

त्यांनी सांगितलं की, डिसेंबरमध्ये त्या त्यांना भेटायला गेल्या होत्या, तेव्हा ते कोणालाही ओळखू शकत नव्हते.

"कधी कधी लोक त्यांच्या समोर त्यांचे शेर म्हणायचे, तेव्हा ते पुढची ओळ पूर्ण करायचे. त्या वेळी वाटायचं की, कदाचित ते बरे होतील."

"एक काळ असा होता की त्यांच्याशिवाय मोठे मुशायरे अपूर्ण मानले जायचे. मात्र, नंतरच्या काळात त्यांना डिमेन्शियाच्या अवस्थेत पाहणं खूप वेदनादायक होतं," असंही त्या नमूद करतात.

 ANI2020 मध्ये बशीर बद्र यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल लालजी टंडन यांनी भोपाळमधील त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

वसीम बरेलवी म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध उर्दू कवी जाहिद हसन यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितले, "आमचे खूप जुने आणि जवळचे संबंध होते. इतका जवळचा सहवास फार कमी लोकांना मिळतो. आम्ही मुशायरांच्या दुनियेत एकत्र होतो. त्यांचं जाणं उर्दू शायरीसाठी आणि माझ्यासाठीही मोठं नुकसान आहे."

वसीम बरेलवी म्हणतात, "बशीर बद्र यांच्या शायरीचा प्रभाव ऐकणाऱ्यांवर आणि वाचणाऱ्यांवरही पडायचा. "जर ते निरोगी असते, तर जगाला त्यांच्याकडून अजून खूप काही मिळालं असतं."

तय्यब बद्र आठवण सांगताना म्हणाले, "अब्बा जेव्हा अलीगढमध्ये शिकण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिथे कळलं की, कॉलेजच्या अभ्यासक्रमात त्यांनी लिहिलेल्या शायरी आणि गझला शिकवल्या जात आहेत. याचा अब्बांना खूप अभिमान वाटायचा."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

बशीर बद्र हे बऱ्याच काळापासून डिमेन्शियाशी झुंज देत होते. बशीर बद्र हे बऱ्याच काळापासून डिमेन्शियाशी झुंज देत होते. Vishnukant Tiwari/BBC

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi