Friday, 05 Feb, 7.08 am BBC मराठी

होम
एलव्हनिल वॅलारिवान: 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची नेमबाज

जगातील पहिल्या क्रमांकाची 10 मीटर एअर-रायफल शूटर एलव्हनिल वॅलारिवान अशा कुटुंबातून येते जिथं खेळापेक्षा शिक्षणाला महत्त्व आहे. तिचे आई-वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

असं असलं तरी त्यांनी नेहमी एलव्हनिलला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ती सांगते की, वडिलांनी केवळ तिच्या खेळाला पाठिंबा दिला नाही, तर खेळाचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नको, याप्रकारचा दबावही आणला नाही.

International Shooting Sport Federationनं (ISSF) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये एलव्हनिलनं आतापर्यंत सात सुवर्ण, एक रौप्य तर एक कांस्य पदक पटकावलं आहे.

2018मध्ये सिडनीतील ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत तिनं पहिलं मोठं असं आंतरराष्ट्रीय यश मिळवलं. या स्पर्धेत तिनं त्या श्रेणीतील नवीन विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावलं.

एलव्हनिल सांगते, तेव्हाच्या परिस्थितीमुळे हे यश तिच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहिलं आहे. ती स्पर्धेच्या फक्त एक दिवस आधी सिडनीला आली होती. तेव्हा तिचे पाय सुजलेले होते.

त्यानंतरच्या वर्षात वॅलारिवाननं रिओ डी जनेरियो येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर 2019 मध्ये चीनच्या पुटियान येथे आयएसएसएफ विश्वचषक फायनलमध्येही सुवर्णपदक जिंकलं.

या स्पर्धांमधील कामगिरीमुळे तिनं जागतिक क्रमवारी प्रथम क्रमांकावर झेप घेतली.

जगभरातील क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचल्यानंतर स्वाभाविकपणे लोकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे. पण याचा माझ्या खेळावर कोणताही परिणाम झालेला नाही, असं ती सांगते.

सुरुवात

सुरुवातीला तिला ट्रॅक-फिल्डमध्ये मजा यायची. पण तिच्या वडिलांनी तिला शूटिंग करण्याचा सल्ला दिला. तिनं तो मनावर घेतला आणि सरावास सुरुवात केली. काही काळातच तिला हा खेळ आवडायला लागला. शूटिंग हा स्वत:ला शांत करण्याचा अनुभव असल्याचं ती सांगते.

यासाठी तिला स्वत:च्या दृष्टीकोनात काही बदल करावे लागले. कारण ती स्वत:ला अस्वस्थ आणि उत्स्फूर्त व्यक्ती समजत होती.

दुसरीकडे शूटिंगसाठी बरंच लक्ष केंद्रीत करावं लागतं आणि संयम आवश्यक असतो. म्हणूनच स्पर्धेत उतरण्यासाठी आपला मनावर संयम आहे याची खात्री करण्यासाठी तिला खेळाच्या मानसिक पैलूवर काम करावं लागलं.

तिच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणादरम्यानच तिनं नेमबाजीत योग्य आणि उल्लेखनीय कामगिरी केली.

तिने अल्पावधीतच माजी भारतीय नेमबाज गगन नारंग यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तिला शूटिंगमधील कौशल्य शिकवण्यासाठी मदत केली.

गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या सहकार्यानं जिल्हास्तरीय क्रीडा शाळेत वलारिवाननं 2014मध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं.

पहिल्या क्रमांकावर झेप

प्रशिक्षणातील सुरुवातीच्या दिवसांविषयी ती सांगते, सुरुवातीला तिला मॅन्युअल शूटिंगच्या श्रेणीत सराव करावा लागला.

तिथं तिनं प्रशिक्षक नेहा चौहान यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि गगन नारंग यांनीही तिला 2017पर्यंत मार्गदर्शन केलं.

आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पर्धेच्या व्यासपीठावर नारंग यांच्या मार्गदर्शनामुळे पाठबळ मिळालं, असं ती सांगते.

गुजरातचं क्रीडा प्राधिकरण (एसएजी) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) कडून चांगला पाठिंबा मिळाल्याचं ती सांगते.

पण, व्यवस्थेमुळे त्रास झाला असं बऱ्याच खेळाडूंना वाटतं.

वॅलारिवान म्हणते, एसएआय आणि भारतातील इतर प्रशासकीय संस्थांकडून सातत्यानं पाठिंबा मिळाला आणि त्याचा फायदाही झाला.

2017मध्ये राष्ट्रीय संघात प्रवेश केल्यापासून राहण्याची सोय आणि इतर सुविधांममध्ये अनेक पटींनी सुधारणा झाल्याचं ती सांगते.

2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून ती तिच्यावरील विश्वास सार्थ ठरवेल, अशी आशा ती व्यक्त करते.

(हा लेख ईमेलद्वारे बीबीसीला दिलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top