Wednesday, 15 Sep, 4.21 pm BBC News मराठी

होम
घातपाताच्या संशयातून अटक केलेल्यांपैकी एकाचं मुंबई कनेक्शन, ATS प्रमुखांनी काय दिली माहिती?

'दिल्ली पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यातला एक जण मुंबईच्या धारावीमध्ये होता. ही केंद्रीय तपास यंत्रणांची माहिती होती, जी त्यांनी दिल्ली पोलीसांना दिली,' अशी माहिती एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली.

त्याचे अंडरवर्ल्डशी जुने संबंध आढळले आहेत. तो आमच्या रडारवर होता. त्याचे अंडरवर्ल्डशी 20 वर्षे जुने संबंध होते, असं त्यांनी म्हटलं.

देशात विविध ठिकाणी घातपाताच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातूनही एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.

त्यासंदर्भात आज (15 सप्टेंबर) एटीएस प्रमुखांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली.

'9 तारीखेला त्याने दिल्लीला जायचा प्लान केला. त्याचं वेटिंग तिकीट होतं. गोल्डन टेम्पल एक्स्प्रेसने तो जाणार होता. 13 तारखेला त्याचे तिकीट कन्फर्म झालं. जेव्हा ट्रेन कोटाला पोहचली तेव्हा त्याला अटक करण्यात आली. एटीएसची एक टीम संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. मग त्याची चौकशी केली जाईल,' असं अग्रवाल यांनी सांगितलं.

ज्या व्यक्तीला मुंबईत अटक केली आहे, त्याच्यावर पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी, चोरीची त्याची केस असल्याची माहितीही अग्रवाल यांनी दिली.

काय म्हणाले होते दिलीप वळसे पाटील?

अजून या घटनेबाबत अधिकची माहिती मिळण्यासाठी वेळ लागणार आहे. हा संवेदनशील विषय आहे. याबाबत जास्त माहिती देता येणार नाही, असं वळसे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं.

दहशतवाद्यांचं मुंबई कनेक्शन समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले सरकार झोपलं होतं का?

यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, पोलिसांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे. हा राजकारणाचा विषय नाही, असं वळसे पाटील म्हणाले.

आज दुपारी 3 वाजता एटीएसचे प्रमुख पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती देतील, असं वळसे पाटील यांनी सांगितले.

कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी सरकारला आणि पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. यासंदर्भात मी आज बैठक घेतली आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी संशयितांचे फोटो जाहीर केले आहेत.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top