Dailyhunt
ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ग्रॅच्युइटीच्या नवीन नियमामुळे कसा फायदा होईल?

ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ग्रॅच्युइटीच्या नवीन नियमामुळे कसा फायदा होईल?

Getty Images

1 एप्रिल 2026 पासून देशात काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. यात ग्रॅच्युइटीच्या नियमांचाही समावेश आहे.

हा बदल सर्वांनाच लागू होणार नाही, तर ठराविक कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होईल.

त्यांना ग्रॅच्युइटीसाठी सलग 5 वर्षे नोकरी करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच, त्यांच्या हातात येणाऱ्या रकमेतही वाढ होईल.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय, नवीन बदल काय आहेत आणि त्याचा कोणावर कसा परिणाम होईल, याची माहिती दिली आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

ग्रॅच्युइटी म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या नियोक्ता किंवा कंपनीकडून दीर्घकाळ सेवेसाठी दिली जाणारी एकरकमी रक्कम.

 Getty Imagesसरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीवेळी ग्रॅच्युइटी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त असते.

सर्वसाधारणपणे सलग 5 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतो. त्यानंतर कर्मचाऱ्याने राजीनामा देऊन नोकरी सोडली, सेवानिवृत्त झाला, मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर ग्रॅच्युइटी मिळते. ग्रॅच्युइटी हा नियमित वेतनाचा भाग नसून तो एक सामाजिक सुरक्षेचा प्रकार आहे.

ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये कोणते बदल झाले?

एक एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू झाला असून, त्यामुळे पीएफ, वेतन आणि ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये काही बदल झाले आहेत.

आता सेवानिवृत्तीच्या लाभांची गणना करण्यासाठी किंवा फायदे मोजण्यासाठी 'वेतन' म्हणजे काय, याचे नियमही बदलले आहेत.

कामगार मंत्रालयाने एक दस्तऐवज जारी करून काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

 Getty Imagesनवीन कामगार कायद्यामुळे टेक होम सॅलरी (वेतन), भविष्य निर्वाह निधी (पीएएफ) आणि ग्रॅच्युइटीमध्ये बदल होणार आहेत.

त्यात असं म्हटलं आहे की, नवीन कामगार कायदा 21 नोव्हेंबर 2025 पासून हे नियम लागू झाले आहेत आणि ग्रॅच्युइटीची गणनाही त्याच नियमांनुसार केली जाईल.

याचा अर्थ असा की, जे कर्मचारी 21 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर कंपनीत नोकरीला लागले आहेत, ते एक वर्ष सलग सेवा पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतील.

निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार, एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्याचा करार संपला तरी त्याला ग्रॅच्युइटी द्यावी लागेल.

नॉन-फिक्स्ड टर्म (अनिश्चित मुदत) कर्मचाऱ्याला सलग 5 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक आहे.

सेवा संपण्याचे कारण सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, अपघात किंवा आजारामुळे आलेले अपंगत्व, किंवा केंद्र सरकारने जाहीर केलेली कोणतीही घटना असू शकते.

ग्रॅच्युइटी देण्यास पात्र ठरल्यानंतर 30 दिवसांच्या आत कंपनीने कर्मचाऱ्याला ती रक्कम द्यावी लागते.

नवीन कामगार कायद्यात काय म्हटलंय?

नवीन ग्रॅच्युइटीच्या नियमानुसार, फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्याने (निश्चित मुदतीच्या) फक्त 1 वर्ष सेवा पूर्ण केली असेल आणि त्याचा करार संपला, तरी कंपनीला ग्रॅच्युइटी द्यावी लागेल.

 Getty Imagesग्रॅच्युइटी कशी मोजली जाते?

ही ग्रॅच्युइटी काम केलेल्या कालावधीनुसार (प्रो रेटा पद्धतीने) मोजली जाईल, म्हणजे जितका वेळ काम केलं असेल त्यानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाईल.

निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना कंपनी लेखी कराराद्वारे ठराविक कालावधीसाठी नोकरी देते. हा करार एक किंवा दोन वर्षांसाठी असू शकतो आणि गरजेनुसार तो वाढवला जाऊ शकतो.

ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते?

नवीन कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्याच्या एकूण सीटीसी (कंपनीला येणारा खर्च) मध्ये मूळ वेतन आणि डीए (महागाई भत्ता) यांचा हिस्सा किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्याची ग्रॅच्युइटी त्याच्या शेवटच्या वेतनावर (मूळ वेतन अधिक डीए ) आणि सेवेत पूर्ण केलेल्या वर्षांवर आधारित असते. मासिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी प्रत्येक पूर्ण वर्षाच्या सेवेबद्दल 15 दिवसांचं वेतन ग्रॅच्युइटीमध्ये धरलं जातं.

 Getty Images

उत्पादनावर आधारित वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या तीन महिन्यांच्या वेतनाची सरासरी घेतली जाते. तर फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी काम केलेल्या कालावधीनुसार (प्रो-रेटा पद्धतीने) मोजली जाते.

ग्रॅच्युइटीची रक्कम काढण्यासाठी शेवटच्या मासिक वेतनाला 15/26 ने गुणले जाते आणि नंतर ते सेवेत पूर्ण केलेल्या वर्षाने गुणले जाते.

उदाहरणार्थ, शेवटचं वेतन 40 हजार रुपये असेल आणि 10 वर्षांची सेवा पूर्ण झाली असेल, तर 40000 × 10 × 15 करून त्याला 26 ने भागले जाते. त्यामुळे सुमारे 2 लाख 30 हजार 769 रुपये ग्रॅच्युएटी मिळेल.

ग्रॅच्युइटीसाठी वर्षं कशी मोजली जातात?

ग्रॅच्युइटीसाठी नोकरीच्या वर्षांची गणना कशी केली जाते हे देखील जाणून घ्या.

नोकरीची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा 1 दिवस जास्त असेल तर ते पुढील पूर्ण वर्ष मानले जाते. पण 6 महिन्यांपेक्षा 1 दिवस कमी असेल किंवा अगदी 6 महिनेच पूर्ण झाले असतील तर ते वर्ष कमी धरले जाते.

 Getty Images

उदाहरणार्थ, जर 10 वर्षे आणि 7 महिने सेवा झाली असेल, तर ग्रॅच्युइटीसाठी ती 11 वर्षे मानली जातात. पण जर 10 वर्षे आणि 5 महिने सेवा झाली असेल, तर ती 10 वर्षेच मानली जातात.

नोकरीच्या समाप्तीनंतर ग्रॅच्युइटी म्हणून मिळणाऱ्या करमुक्त रकमेची कमाल मर्यादाही ठरवण्यात आलेली आहे.

भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची संपूर्ण रक्कम करमुक्त असते. तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटीवर कर लागत नाही, पण त्यापेक्षा जास्त रकमेवर कर आकारला जातो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते? Getty Images

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi