Thursday, 05 Aug, 7.10 am BBC News मराठी

आंतरराष्ट्रीय
हवामान बदल : आटू लागलेल्या पाणीस्रोतांमुळे इराण 'अभूतपूर्व दुष्काळा'च्या उंबरठ्यावर

इराणवर भीषण पाणी आणि वीज टंचाईचं संकट कोसळलं आहे. पाणी आणि विजेसाठी सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनांनी इराणमधल्या भीषण पाणीटंचाईकडे जगाचं लक्ष वेधलं आहे.

अभ्यासकांनीही गेल्या अनेक वर्षांपासून विक्राळ रुप धारण करत असलेल्या या समस्येविषयी चिंता व्यक्त केली होती.

एप्रिलमध्येच इराणच्या हवामान विभागाने इराणला 'अभूतपूर्व दुष्काळा'चा सामना करावा लागेल आणि पर्जन्यमानात लक्षणीय घट होईल, असा इशारा दिला होता.

पाण्यासाठी जनता रस्त्यावर

खुजेस्तान हा इराणमधील तेल उत्पादन करणारा प्रदेश. या प्रदेशात लोक पाणी टंचाईविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. इतर शहरांमध्ये जल विद्युत टंचाईविरोधातही निदर्शनं करण्यात आली.

वाढत्या आंदोलनामुळे अखेर सरकारला वीज आणि पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसलेल्या भागांमध्ये आपातकालीन मदत पोहोचवावी लागली. इराण सध्या तापमानवाढ, प्रदूषण, पूर, कोरड्या पडत असलेल्या नद्या, अशा वेगवेगळ्या पर्यावरणविषयक समस्यांचा सामना करत आहे.

चिंता वाढवणारी आकडेवारी

ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार इराणच्या प्रमुख नदीपात्रात सप्टेंबर 2020 ते जुलै 2021 दरम्यान झालेला पाऊस हा गेल्या वर्षी याच काळात पडलेल्या पावसापेक्षा खूप कमी होता.

यापूर्वीची आकडेवारी मिळू शकलेली नाही. मात्र, अमेरिकेच्या अभ्यासकांनी सॅटेलाईटच्या माध्यमातून डेटा एकत्रित केला आहे.

यात मार्चमध्ये झालेल्या पावसाची गेल्या 40 वर्षातल्या पर्जन्यमानाच्या सरासरीशी तुलना करण्यात आली. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अरविन के सेंटर फॉर हायड्रोमेटेरोलॉजीनुसार 2021 च्या सुरुवातीच्या 3 महिन्यांची आकडेवारी त्या सरासरीपेक्षा खूप कमी होते.

संयुक्त राष्ट्रांच्या खाद्यान्न आणि कृषी संघटनेनुसार इराणची एक तृतीयांश जमीन शेतीखाली आहे. एवढ्या मोठ्या शेतजमिनीसाठी सिंचनाची सोय गरजेची आहे. पण, पर्जन्यमानात होत असलेली घसरण कायम राहिल्यास इराणच्या शेतीसाठी हे एक मोठं संकट ठरू शकतं.

खुजेस्तानात काय घडलं?

खुजेस्तान प्रदेशाने दीर्घकाळ दुष्काळ अनुभवल्यानंतर तिथली जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे. 'आमची तहानलोय' म्हणत स्थानिकांनी निदर्शनं केली.

स्टुटगार्ट विद्यापीठातील संशोधकांच्या डेटानुसार एक असा भाग जिथे कायम मुबलक प्रमाणात पाणी असायचं तिथली अत्यंत महत्त्वाची 'करुन' नदी सध्या कोरडीठाक पडली आहे.

या नदीच्या पाणी पातळीत गेल्या काही वर्षात झपाट्यानं घट झाल्याचं सॅटेलाईटवरून काढलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होतं.

2019 साली आलेल्या पुरानंतर मात्र या नदीची पाणी पातळी काहीशी वाढली आहे.

अनेक दशकांची समस्या

खुजेस्तानच्या प्राधिकरणातील सूत्रांकडून मिळालेल्या नकाशांमध्ये जुलै 2021 मध्ये या प्रदेशातील धरणांची पाणी पातळी दाखवण्यात आली आहे. निळी रेषा पाणी पातळी दर्शवते.

अनेक महत्त्वाच्या धरणांची पाणी पातळी कमी झालेली आहे. मात्र, धान उत्पादक शेतकरी आणि पशुपालन करणाऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होतेय.

तर तेल उद्योगाचा स्थानिक इकोसिस्टिमवर विपरित परिणाम झाल्याचं काहींचं म्हणणं आहे.

इराणच्या मध्यभागी असलेल्या वाळवंटी प्रदेशासही याच भागातून पाणी पुरवठा केला जातो. हेदेखील तणावाचं आणखी एक कारण आहे.

येल विद्यापीठातील इराणी पर्यावरण विभागाचे माजी उप-प्रमुख कावेह मदनी म्हणतात, "हवामान बदल आणि दुष्काळ हे यामागचं कारण आहे."

ते पुढे सांगतात, "मात्र, ही आजची समस्या नाही. गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या मूळ धरत होती. व्यवस्थापनाचा भोंगळ कारभाळ, पर्यावरण व्यवस्थेकडे झालेलं दुर्लक्ष, दूरदर्शितेचा अभाव आणि या परिस्थितीसाठी तयार नसणं, यांचा त्यात हातभार लागला."

पाणी संकट अधिक गहिरं होणार?

इराण आटत चाललेल्या पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून आहे.

इथे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची समस्या भेडसावतेय. त्यातच हवामान बदलामुळे इराणला अधिक बिकट संकटाचा सामना करावा लागतोय.

वाढता उष्मा आणि दुष्काळ यांचा जल विद्युत निर्मितीवर विपरित परिणाम होतोय. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इथे मोठ्या प्रमाणावर भारनियमन केलं जातं.

भारनियमनाविरोधात राजधानी तेहरान आणि इतर शहरांमध्येही मोठी निदर्शनं झाली आहेत. टेलिकम्युनिकेशन आणि ट्रॅफिक लाईटलाही भारनियमनाचा फटका बसला आहे.

उन्हाळ्यात एसीचा वापरही वाढतो. त्यामुळे वीजेची मागणी वाढते आणि याचा भार पॉवर ग्रीडवर पडतो.

असं असलं तरी इराणमधल्या अपुऱ्या वीज पुरवठ्यासाठी क्रिप्टो-करंसीच्या मायनिंगवरही आरोप झाले. यासाठी मोठ्या प्रमाणावर वीजचा वापर होत असल्याचं सांगितलं जातं.

पाणी व्यवस्थापनाचे तीन तेरा

2015 साली इराणने पाणी संकटावर उपाय शोधला नाही तर लाखो लोक सामूहिक स्थलांतर करतील, असा इशारा एका पर्यावरणतज्ज्ञाने दिला होता.

देशात 'कृषी क्रांती'ची गरज असल्याचं इराणचे पर्यावरण विभागप्रमुख मासूमेह एब्तेकार यांचं म्हणणं आहे.

इराणमध्ये भूजल हा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र जगभरात ज्या-ज्या देशांमध्ये भूजल पातळी झपाट्याने घसरत आहे त्यात भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीनसोबत इराणचाही समावेश होतो.

खाद्यान्नाबाबत देशाला आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात तिथला शेतकरी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा वापर करत आहेत.

भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने जमिनीत क्षाराचं प्रमाणही वाढू शकतं. याचा विपरित परिणाम शेत जमिनीच्या सुपीकतेवरही होऊ शकतो.

प्रोसिडिंग्ज ऑफ द नेशन अकॅडमी ऑफ सायंसेसच्या एका संशोधनानुसार अनेक प्रदेशांमध्ये सिंचनाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जास्त असण्याचा धोका आहे.

भूजलासाठी खोलवर होत असलेल्या खोदकामामुळे शहरं खचण्याचाही धोका आहे.

आक्रसणारे तलाव

या सोबतच कधीकाळी मुबलक पाणीसाठा असणारे मात्र आज वावटळीचा धोका वाढलेल्या भागांची आणि नद्यांची चिंता वाढू लागली आहे.

इराणमधला उर्मिया तलाव जगातला खाऱ्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव म्हणून प्रसिद्ध होता. मात्र, हा तलाव आज पर्यावरण विनाशाचं प्रतिक बनला आहे. कधीकाळी हा तलाव 1930 चौरस मैल पसरलेला होता. मात्र, 2015 साली आपल्या आकाराच्या एक दशमांश एवढाच उरला.

90 च्या दशकात इराणमध्ये कृषी क्षेत्राला चालना मिळाली. मात्र, दुष्काळ असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा केला आणि अनेक धरणं बांधली.

जनतेने उठवलेला आवाज, राष्ट्राध्यक्षांनी दिलेली आश्वासनं आणि सिंचन व्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे या तलावाचं नशीब बदलताना दिसतंय.

तलाव पूर्वीएवढा मोठा झाला नसला तरी निम्म्यावर पोहोचला आहे. मात्र, हा आतापर्यंतच्या सुधारणांचा परिणाम आहे की पुरेशा पावसाचा, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. दिर्घकालीन दुष्काळामुळे तलावाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल का, हे निश्चितपणे सांगता येणं अवघड आहे.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top