Saturday, 09 Jan, 9.25 pm BBC मराठी

होम
इंडोनेशिया विमान : 'विजेच्या वेगानं विमान समुद्रात कोसळलं आणि मोठ्ठा आवाज झाला'

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथून उड्डाणानंतर एक विमान बेपत्ता झालं आहे.

या विमानात 62 प्रवासी होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीविजया एयर बोइंग 737चा जकार्ताच्या कलिमनतन प्रांतातल्या रस्त्यात संपर्क तुटला. त्यानंतर विमान बेपत्ता झालं.

फ्लाइट ट्रैकिंग वेबसाइट फ्लाइटरडार24.कॉम नुसार, हे विमान एका मिनिटापेक्षा कमी वेळात 10 हजार फूट खाली आलं.

परिवहन मंत्रालयानं सांगितलंय की, विमानाचा शोध घेण्यासाठी बचावपथकांना सक्रिय करण्यात आलं आहे.

या उड्डाणासंबंधी अधिक माहिती घेत असल्याचं श्रीविजया एअरनं म्हटलं आहे. बेपत्ता झालेल्या विमानाशी शेवटचा संपर्क स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जकार्तामधील बीबीसी प्रतिनिधी जेरोमी विरावान यांच म्हणणं आहे की, विमान अपघाताची ही घटना इंडोनेशियासमोर काही प्रश्नं उपस्थित करणारी आहे. या देशाची एअरलाइन इंडस्ट्री 2018 मधील भीषण विमान अपघातानंतर अतिशय कठोर अशा समीक्षेला सामोरी जात आहे.

नॅशनल सर्च अँड रेस्क्यू एजन्सीचे एक अधिकारी बामबैंग सुरयो अजी यांनी म्हटलं, "आम्ही अपघाताचं अचूक स्थान शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आज रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागेल, अशी आम्हाला आशा आहे. समुद्राची खोली जवळपास 20-23 मीटर आहे."

एका प्रत्यक्षदर्शीनं एका मोठा आवाज ऐकल्याचं सांगितलं. सोलिहिन नावाच्या एका मच्छीमारानं बीबीसीच्या इंडोनेशियन सर्व्हिसशी बोलताना म्हटलं की, त्यांनी हा अपघात होताना पाहिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कॅप्टनसोबत बेटावर परतण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी म्हटलं, "विमान वीजेच्या वेगानं समुद्रात कोसळलं आणि मोठ्ठा आवाज झाला. आम्ही जवळच होतो. काही तुकडे आमच्या जहाजावरही येऊन आदळले."

'26 वर्षं जुनं होतं विमान'

बीबीसीचे प्रतिनिधी थियो लेगेट यांच्या मते इंडोनेशियातील अनेक विमानं खूप जुनी झाली आहेत.

शनिवारी बेपत्ता झालेलं विमान 26 वर्षं जुनं होतं. सुरक्षित विमान उड्डाणांबाबत इंडोनेशियाचा इतिहास फारसा चांगला नाहीये. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बनलेली अनेक विमानं इंडोनेशियात अजूनही वापरली जातात.

इंडोनेशियामध्ये याआधीही दोन मोठे विमान अपघात झाले होते, ज्यामध्ये 737 मॅक्स बोइंग विमानं दुर्घटनाग्रस्त झाली होती.

शनिवारी (9 जानेवारी) जकार्ताहून टेक ऑफ केलेलं विमान 737 मॅक्स श्रेणीतलं नाहीये.

ऑक्टोबर 2018 मध्ये इंडोनेशियातील लायन एअरच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात 189 लोक मृत्यूमुखी पडले होते.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top