Tuesday, 22 Sep, 10.52 am BBC मराठी

होम
IPL 2020: आरोन फिंचचा 'आठवा'वा प्रताप

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सर्वाधिक संघांकडून खेळण्याचा विक्रम आरोन फिंचने नावावर केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या फिंचने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पदार्पण केलं. फिंचसाठी आयपीएलमधला हा आठवा संघ आहे.

दरवर्षी संघांनी सोडून द्यावं इतकी फिंचची कामगिरी टाकाऊ नक्कीच नाही. मात्र दर हंगामात फिंचला नारळ मिळतो आणि लिलावाच्या वेळी नवा संघ त्याला विकत घेताना दिसतो.

दरवर्षी नवा गडी, नवं राज्य फॉर्म्युला झालेला असतानाही निराश न होता रन्स करण्याचं काम करत राहणं खरंच अवघड आहे. एखादी टीम आपल्याला घेते आणि सोडून देते हे सतत अनुभवून एखाद्याला नैराश्य येऊ शकतं.

कोहली-धोनीसारखे प्लेयर्स एकाच टीमकडून दहा वर्षांहून अधिक सीझन खेळत असताना प्रत्येक सीझनला नवी टीम, नवे सहकारी, कोचेस यांच्याशी जुळवून घेण्याचं कामही फिंचने केलं आहे.

फिंच आता आठव्या टीमसाठी खेळतो आहे. आतापर्यंत एकदाही विजेतेपदाचा चषक हाताळण्याचं भाग्य त्याच्या नशिबी नाही. नाही म्हणायला 2015मध्ये फिंच मुंबई इंडियन्ससाठी खेळला, त्यावर्षी मुंबई इंडियन्सने त्यावर्षी जेतेपद पटकावलं. मात्र तिसऱ्या मॅचमध्ये हॅमस्ट्रिंग दुखावल्याने फिंच संपूर्ण स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. मुंबई इंडियन्सने कप उचलला तेव्हा तो संघाचा भाग होता मात्र दुखापतीमुळे मायदेशी परतला होता.

अंगाने धष्टपुष्ट असणारा फिंच बॉलर्सना बुकलून काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या खेळात नजाकत-देखणेपण वगैरे काही नाही. दांडपट्टा ज्यांना बघायला आवडतो त्यांच्यासाठी फिंच हे परफेक्ट प्रारुप आहे.

2010 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला संघात घेतलं. मात्र त्यांनी लगेचच फिंचला डच्चू दिला. 2011 आणि 2012 हंगामात फिंच दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासाठी खेळला.

2013 मध्ये पुणे वॉरियर्सने त्याला संधी दिली. 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून तर 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला. मुंबईकडून खेळताना दुखापतग्रस्त झाल्याने त्याला सगळ्या मॅच खेळता आल्या नाहीत.

2016 मध्ये गुजरात लायन्स या संघाने फिंचवर विश्वास ठेवला. 2017 मध्येही फिंच गुजरातकडून खेळला. दोन हंगांमानंतर गुजरातचा संघच रद्दबातल झाल्याने फिंचला 2018 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या रुपात नवं घर मिळालं. पण त्यांनीही लगेचच नारळ दिला.

गेल्या वर्षी वर्ल्डकपच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून फिंचने आयपीएलमधून माघार घेतली. यंदाच्या लिलावात कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने फिंचला ताफ्यात समाविष्ट केलं. अशा पद्धतीने 9 वर्षात 8 संघांकडून खेळण्याचा विक्रम फिंचने नावावर केला.

आयपीएलव्यतिरिक्त फिंच मायदेशात होणाऱ्या बिग बॅश स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळतो. श्रीलंकेत रुहूना संघाकडून खेळतो. इंग्लंडमध्ये सरे, यॉर्कशायर संघांचा भाग आहे.

प्रत्येक टीममध्ये साधारण 20 ते 25 प्लेयर्स असतात. आरोन आठव्या संघांसाठी खेळतो आहे. सरासरी काढली तरी दोनशेहून अधिक भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय प्लेयर्सबरोबर तो खेळला आहे. इतक्या संघांकडून खेळताना फिंचने अनेकदा ओपनिंग केली आहे. यानिमित्ताने असंख्य ओपनर्सबरोबर त्याचं खेळून झालं आहे.

अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या खेळातून चांगलं शिकण्याची संधी फिंचकडे असते. त्याचवेळी या सर्व खेळाडूंचे कच्चे दुवे जाणून ते ऑस्ट्रेलियासाठी खेळताना वापरण्याची संधीही त्याच्याकडे आहे.

वनडे आणि ट्वेन्टी-२० प्रकारात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर म्हणून नियमितपणे खेळत असूनही आयपीएलचे संघ फिंचवर कायमस्वरुपी विश्वास ठेवायला तयार नाहीत.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top