Monday, 21 Sep, 1.53 am BBC मराठी

होम
IPL 2020: 'शॉर्ट रन' पडली पंजाबला महागात?

पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दिल्ली आणि पंजाब यांच्यातली मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. दिल्लीने विजय मिळवला खरा पंजाबला महागात पडलेल्या शॉर्ट रनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.

दिल्लीने दिलेल्या 158 रन्सचा पाठलाग करताना मयांक अगरवालच्या झुंजार खेळीच्या जोरावर पंजाबचा संघ वाटचाल करत होता.

पंजाबचा संघ धावांचा पाठलाग करत असताना 19व्या ओव्हरमध्ये वादग्रस्त प्रकार पाहायला मिळाला. कागिसो रबाडाने टाकलेला बॉल मयांक अगरवालने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला. दोन रन काढण्याचं मयांक आणि ख्रिस जॉर्डनचं उद्दिष्ट होतं. त्यानुसार त्यांनी दोन रन्स धावून पूर्णही केल्या. परंतु अंपायर नितीन मेमन यांनी शॉर्ट रन असल्याचं कारण देत पंजाबला एकच रन दिली. बॅट्समनची बॅट क्रीझमध्ये टेकली नसेल तर शॉर्ट रन घोषित करतात आणि ती रन देत नाहीत. अंपायर मेमन यांनी शॉर्ट रन असल्याचं कारण देत पंजाबला एकच रन बहाल केली. रिप्लेतून शॉर्ट रन नसल्याचं सिद्ध झालं आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.

टीम इंडियाची माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सूचक ट्वीट करत या प्रकरणावर भाष्य केलं. मॅन ऑफ द मॅच साठी योग्य खेळाडूची निवड झालेली नाही. शॉर्ट रन देणाऱ्या अंपायरला मॅन ऑफ द मॅच मिळायला हवा. शॉर्ट रन नव्हतीच. दोन्ही संघांदरम्यानचं अंतर एका रनचंच होतं असं सेहवागने म्हटलं आहे.

टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर इरफान पठाणनेही शॉर्ट बॉलचं काय अशी विचारणा ट्वीटच्या माध्यमातून केली.

न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर स्कॉट स्टायरिसने शॉर्ट रन देण्याचा निर्णय भयंकर असल्याचं म्हटलं आहे.

शॉर्ट रन देण्यासाठी अंपायर योग्य ठिकाणी नव्हते. कारण दुरून त्यांना ते टिपणं कठीण आहे. निर्णय देताना म्हणून चूक झाली असावी. तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर निर्णय सुधारता आला असता असं सुदर्शन यांनी म्हटलं आहे.

नेटिझन्सनेही यावर टीका केली आहे. ही अंपायरिंग चूक आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला ही चूक महागात पडली. ख्रिस जॉर्डनची बॅट क्रीझमध्ये होती. अंपायर्सनी शॉर्ट रन दिली. त्या रननेच पंजाबचा घात केला असं मुफद्दल व्होरा यांनी म्हटलं आहे.

मैदानात अनेक कॅमेरे आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान आहे पण तरीही अशी चूक होते. शॉर्ट रन नव्हतीच. किंग्ज इलेव्हनला ही चूक महागात पडली असं एका नेटिझनने म्हटलं आहे.

शॉर्ट रन नसताना शॉर्ट रन दिली. पहिल्या ओव्हरमध्ये वाईड असताना वाईड दिला नव्हता. हे काय आहे? असा सवाल रवी यांनी विचारला आहे.

शॉर्ट रनचा निर्णय थर्ड अंपायरला विचारायला हवा होता. दोन गुणांनी काय होतंय असं वाटू शकतं परंतु पंजाबला हा पराभव नंतर महागात पडू शकतो असं विनय रेड्डी यांनी म्हटलं आहे.

मॅचमध्ये काय झालं?

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दिल्ली-पंजाब मॅच टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबला नमवलं. दिल्लीने मार्कस स्टोनिइसच्या खेळीच्या जोरावर 157 धावांची मजल मारली. मयांक अगरवालच्या दिमाखदार खेळीने पंजाबचा विजय जवळपास पक्का केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मयांक आऊट आला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मयांकने 60 बॉलमध्ये 7 फोर सिक्ससह 89 धावांची खेळी केली.

सुपर ओव्हरमध्ये राहुल आणि पूरन आऊट झाल्याने पंजाबची इनिंग दोन रन्सवरच संपुष्टात आली. दिल्लीसाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान पेललं.

तत्पूर्वी बिनबाद 30 वरून किंग्ज इलेव्हन पंजाबची अवस्था 35/4 अशी झाली. लोकेश राहुल, करुण नायर, निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल सगळे झटपट माघारी परतले. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही मयांक अगरवालने चिवटपणे झुंजार खेळी केली.

दिल्लीच्या खेळाडूंनी अतिशय खराब फटके खेळून सुरुवात केली. ताळमेळ नसल्याने शिखर धवन रनआऊट झाला. मोहम्मद शमीच्या गोळीबंद बाऊन्सरने पृथ्वी शॉला तंबूत पाठवलं. शिमोरन हेटमायरही शमीच्या भेदक माऱ्यासमोर तग धरू शकला नाही. दिल्लीची अवस्था 13/3 अशी झाली होती. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 73 रन्सची भागीदारी करत डाव सावरला. दोघेही स्थिरावले असं वाटत असतानाच पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या रवी बिश्नोईने पंतला आऊट केलं.

मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रेयसच्या अंगलट आला. ऋषभने 31 तर श्रेयसने 39 रन्सची खेळी केली. अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन दोघेही फार काही करू न शकल्याने 17 ओव्हरमध्ये दिल्लीची अवस्था 100/6 अशी होती. मात्र तिथून पंजाबच्या स्वैर बॉलिंगचा पुरेपूर फायदा मार्कस स्टॉइनिसने उठवला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या इनिंग्जच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा कुटल्या. स्टॉइनिसने 21 बॉलमध्ये 53 धावांची धुवांधार खेळी केली.

अश्विनच्या खांद्याला दुखापत

दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना रवीचंद्रन अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली. मयांकर अगरवालच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने थरारक विजय मिळवला.

रवीचंद्रन अश्विनला क्रिकेट मैदानावर पाहताना नेहमीच एक झुंजार आणि कामाशी पराकोटीची बांधिलकी असणारा खेळाडू हीच प्रतिमा मनात येते. दुबईत दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना अश्विनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्या ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेतली.

शेवटच्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने बॉल तटवला. दूर जाणारा बॉल अडवताना अश्विन खांद्यावर आपटला. पुढच्याच क्षणी मैदानावर आडवा होऊन डोळ्यात पाणी आलेला अश्विन अख्ख्या जगाने पाहिला.

दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी तातडीने मैदानात धाव घेतली. जर्सीच्या साह्याने त्यांनी अश्विनचा खांदा लपेटला. उंचपुऱ्या अश्विनला वेदना सहन होत नव्हत्या. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.

अश्विनच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्सबरोबर झाली. पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणारा स्पिनर अशी ओळख धोनीने अश्विनला मिळवून दिली. चेन्नईने रिलीज केल्यानंतर अश्विन रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला कॅप्टन केलं.

गेल्या वर्षी अश्विनने पंजाबचं नेतृत्व केलं. मात्र जेतेपदाच्या बाबतीत नशीब बदलू न शकल्याने अश्विनला कर्णधारपदावरून नव्हे तर संघातूनच डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्ली कॅपिटल्सने अश्विनच्या कौशल्यांवर विश्वास ठेवला. कोरोना काळात अनेक क्रिकेटपटूंना बोलतं करत अश्विनने उत्तम मुलाखतकार असल्याचं सिद्ध केलं.

मुलाखती घेताना त्याच्या दोन मुली मध्ये डोकावत. दिल्ली कॅपिटल्ससाठी सराव करतानाचे त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर दिसत होते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सहकाऱ्यांनी अश्विनचा वाढदिवस साजरा केला. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवत अश्विनने स्वप्नवत सुरुवात केली. मात्र त्याच ओव्हरच्या शेवटी त्याला दुखापत झाली.

दरम्यान अश्विनच्या दुखापतीबाबत दिल्ली कॅपिटल्सकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top