Dailyhunt
IPL 2020: सुपर ओव्हरचा थरार; दिल्लीचा पंजाबवर विजय

IPL 2020: सुपर ओव्हरचा थरार; दिल्लीचा पंजाबवर विजय

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दिल्ली-पंजाब मॅच टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबला नमवलं.

दिल्लीने मार्कस स्टोनिइसच्या खेळीच्या जोरावर 157 धावांची मजल मारली. मयांक अगरवालच्या दिमाखदार खेळीने पंजाबचा विजय जवळपास पक्का केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मयांक आऊट आला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मयांकने 60 बॉलमध्ये 7 फोर सिक्ससह 89 धावांची खेळी केली.

सुपर ओव्हरमध्ये राहुल आणि पूरन आऊट झाल्याने पंजाबची इनिंग दोन रन्सवरच संपुष्टात आली. दिल्लीसाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान पेललं.

तत्पूर्वी बिनबाद 30 वरून किंग्ज इलेव्हन पंजाबची अवस्था 35/4 अशी झाली. लोकेश राहुल, करुण नायर, निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल सगळे झटपट माघारी परतले.

एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही मयांक अगरवालने चिवटपणे झुंजार खेळी केली.

दिल्लीचा आत्मघातकी खेळ; स्टोनिइसची वादळी खेळी

दिल्लीच्या खेळाडूंनी अतिशय खराब फटके खेळून सुरुवात केली. ताळमेळ नसल्याने शिखर धवन रनआऊट झाला. मोहम्मद शमीच्या गोळीबंद बाऊन्सरने पृथ्वी शॉला तंबूत पाठवलं. शिमोरन हेटमायरही शमीच्या भेदक माऱ्यासमोर तग धरू शकला नाही. दिल्लीची अवस्था 13/3 अशी झाली होती. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 73 रन्सची भागीदारी करत डाव सावरला. दोघेही स्थिरावले असं वाटत असतानाच पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या रवी बिश्नोईने पंतला आऊट केलं.

मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रेयसच्या अंगलट आला. ऋषभने 31 तर श्रेयसने 39 रन्सची खेळी केली. अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन दोघेही फार काही करू न शकल्याने 17 ओव्हरमध्ये दिल्लीची अवस्था 100/6 अशी होती. मात्र तिथून पंजाबच्या स्वैर बॉलिंगचा पुरेपूर फायदा मार्कस स्टॉइनिसने उठवला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या इनिंग्जच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा कुटल्या. स्टॉइनिसने 21 बॉलमध्ये 53 धावांची धुवांधार खेळी केली.

अश्विनच्या खांद्याला दुखापत

दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना रवीचंद्रन अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली. मयांकर अगरवालच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने थरारक विजय मिळवला.

रवीचंद्रन अश्विनला क्रिकेट मैदानावर पाहताना नेहमीच एक झुंजार आणि कामाशी पराकोटीची बांधिलकी असणारा खेळाडू हीच प्रतिमा मनात येते. दुबईत दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना अश्विनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्या ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेतली.

शेवटच्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने बॉल तटवला. दूर जाणारा बॉल अडवताना अश्विन खांद्यावर आपटला. पुढच्याच क्षणी मैदानावर आडवा होऊन डोळ्यात पाणी आलेला अश्विन अख्ख्या जगाने पाहिला.

दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी तातडीने मैदानात धाव घेतली. जर्सीच्या साह्याने त्यांनी अश्विनचा खांदा लपेटला. उंचपुऱ्या अश्विनला वेदना सहन होत नव्हत्या. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.

अश्विनच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्सबरोबर झाली. पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणारा स्पिनर अशी ओळख धोनीने अश्विनला मिळवून दिली. चेन्नईने रिलीज केल्यानंतर अश्विन रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला कॅप्टन केलं.

गेल्या वर्षी अश्विनने पंजाबचं नेतृत्व केलं. मात्र जेतेपदाच्या बाबतीत नशीब बदलू न शकल्याने अश्विनला कर्णधारपदावरून नव्हे तर संघातूनच डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्ली कॅपिटल्सने अश्विनच्या कौशल्यांवर विश्वास ठेवला. कोरोना काळात अनेक क्रिकेटपटूंना बोलतं करत अश्विनने उत्तम मुलाखतकार असल्याचं सिद्ध केलं.

मुलाखती घेताना त्याच्या दोन मुली मध्ये डोकावत. दिल्ली कॅपिटल्ससाठी सराव करतानाचे त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर दिसत होते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सहकाऱ्यांनी अश्विनचा वाढदिवस साजरा केला. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवत अश्विनने स्वप्नवत सुरुवात केली. मात्र त्याच ओव्हरच्या शेवटी त्याला दुखापत झाली.

दरम्यान अश्विनच्या दुखापतीबाबत दिल्ली कॅपिटल्सकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi