भारत
ISWOTY : विकीपिडियामध्ये भारतीय महिला खेळाडूंचा समावेश

विकीपिडियामध्ये ज्यांची माहिती उपलब्ध नाही किंवा अत्यल्प माहिती उपलब्ध आहे अशा कर्तृत्त्ववान आणि उदयोन्मुख भारतीय महिला खेळाडूंची माहिती 6 भारतीय भाषांमध्ये विकीपिडियावर उपलब्ध करून देण्यासाठी बीबीसीने विद्यार्थ्यांची निवड केली.
या अशा महिला खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय पदकं पटकावली आहेत, राष्ट्रीय विक्रम मोडीत काढले आणि टोकियो ऑलिम्पिक्ससाठी पात्र ठरल्या आणि तरीही त्यांची माहिती विकीपिडियावर उपलब्ध नाही.
पण, यापुढे असं राहाणार नाही. बीबीसीने अनेक महिने संशोधन केलं आणि या खेळाडूंच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. या माहितीच्या आधारे भारतातील 50 महिला खेळाडूंची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती विकीपिडियावर टाकण्यात आलेली आहे.
सार्वजनिक व्यक्तींविषयी माहितीसाठी वापरल्या जाणाऱ्या विकीपिडिया या लोकप्रिय वेब पोर्टलवर यापैकी बहुतेक महिला खेळाडूंविषयी भारतीय भाषांमध्ये माहिती उपलब्ध नसल्याचं बीबीसीला आढळून आलं.
देशभरातील 12 संस्थांमधल्या पत्रकारिता विभागातल्या तब्बल 300 विद्यार्थ्यांनी या 50 भारतीय महिला खेळाडूंची माहिती हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, तेलुगू, तामिळ आणि इंग्रजी भाषेत विकीपिडियावर अपलोड केली आहे.
या 50 महिला खेळाडूंची निवड कशी करण्यात आली?
भारतातील 40 हून अधिक मान्यवर क्रीडा पत्रकार, समीक्षक आणि लेखकांनी या 50 महिला खेळाडूंची निवड केली आहे. महिला खेळाडूंच्या 2019 आणि 2020 सालातील कामगिरीच्या आधारे या मान्यवरांनी आपल्या शिफारसी दिल्या आहेत. या महिला खेळाडूंचा यादीतला क्रम इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांनुसार लावण्यात आला आहे.

वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
source: bbc.com/marathi