Monday, 16 Dec, 10.24 pm BBC मराठी

होम
Jamia Protests: दिल्ली पोलिसांनीच लावली DTC बसला आग?- फॅक्ट चेक

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन रविवारी (15 डिसेंबर) तीव्र आंदोलन झालं.

या आंदोलनाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक जळणारी मोटर बाइक दिसत आहे. एक व्यक्ती ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. जवळच DTCची एक बस उभी आहे. काही पोलिस कर्मचारी प्लास्टिकच्या पिवळ्या डब्यांमधून काहीतरी भरून गाडीतून जात आहेत. 20 सेकंदांच्या या व्हीडिओमध्ये मागून आवाज येतो- "विझली... विझली."

हा व्हीडिओ ट्वीट करत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी आरोप केला की दिल्ली पोलिसांनीच बसमध्ये आग लावली. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे, "निवडणुकीत हरण्याच्या भीतीनेच भाजप दिल्लीमध्ये आग लावत आहे. AAP हिंसाचाराच्या विरोधातच आहे. हे भाजपचं घाणेरडं राजकारण आहे. पोलिसांच्या संरक्षणात कशा पद्धतीनं आग लावली जात आहे, हे तुम्ही स्वतःचं या व्हीडिओमध्ये पाहा."

यानंतर सिसोदिया यांनी अजून एक ट्वीट करून म्हटलं, "या प्रकरणाची तातडीनं निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. बसेसमध्ये आग लावण्यापूर्वी युनिफॉर्ममध्ये असलेले हे लोक पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॅनमधून हे काय टाकत आहे? हे कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं? भाजपनं खालच्या स्तराचं राजकारण करत पोलिसांकरवी आग लावल्याचं फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे."

सहा हजारांहून अधिक लोकांनी सिसोदियांचं ट्वीट रिट्वीट केलं आहे.

यानंतर सोशल मीडियावर या व्हीडिओवरून वाद सुरू झाला आहे. ही आग पोलिसांनी लावली की आंदोलकांनी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमनं या व्हीडिओची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. बीबीसीला दिल्ली पोलिसांचे पीआरओ एम.एस. रंधावा यांनी सांगितलं, की व्हीडिओसोबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. पोलिस आग विझविण्याचं काम करत होते.

त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, "पोलिसांनी आग लावली अशी अफवा जाणूनबुजून पसरवली जात आहे. व्हीडिओमध्ये DL1PD-0299 या क्रमांकाची बस दिसत आहे. याच बसमध्ये आग लावण्यात आली होती. आम्ही आग विझविण्याचा प्रयत्न करत होतो. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी आमची विनंती आहे."

काय आहे पोलिसांचं म्हणणं?

यानंतर बीबीसीची टीम दिल्लीमधील न्यू फ्रेंड्स कॉलनीतल्या पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. इथे हेल्मेट घातलेले आणि हातात काठ्या घेतलेले पोलीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आम्ही अॅडिशनल स्टेशन इन्चार्ज मनोज वर्मा यांना भेटलो.

बीबीसीच्या टीमनं त्यांना हा व्हीडिओ दाखवला. हा व्हीडिओ पाहिल्यावर त्यांनी सांगितलं, "हा व्हीडिओ आमच्या भागातला नाहीये. जी बस व्हीडिओमध्ये दिसत आहे, त्यामध्ये आग लागली नाहीये. तिची तोडफोड करण्यात आलीये. आमच्या बाइक्सना आग लावण्यात आली. आम्ही ती आग विझविण्याचाच प्रयत्न करत होतो."

ही बस आता घटनास्थळी नाहीये. तिला DTCच्या डेपोमध्ये पाठविण्यात आलं आहे. या बसला आग लागली नव्हती आणि जवळच एक जळणारी बाईक उभी होती, या पोलिसांच्या दाव्यात तथ्य आहे.

याप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केली आहे का, असा प्रश्न आम्ही विचारला. त्यावर सुरुवातीला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. पण जेव्हा हा प्रश्न आम्ही पुन्हा एकदा विचारला, तेव्हा त्यांनी सांगितलं, "FIR दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये काही जणांची नावंही आहेत. मात्र आम्ही तुम्हाला त्याची प्रत दाखवू शकत नाही, कारण हे प्रकरण खूप गंभीर आहे.

या भागात आम्हाला DTCच्या चार जळालेल्या बसेस, काही बाइक्स, एक पूर्णपणे मोडतोड करण्यात आलेली बस आणि कार दिसली.

बीबीसीनं याप्रकरणी भूमिका जाणून घेण्यासाठी मनीष सिसोदियांशीही संपर्क साधला. पण त्यांनी आमच्या फोन कॉलला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

एनडीटीव्हीचे पत्रकार अरविंद गुनशेखर यांनी आपण घटनास्थळी उपस्थित असल्याचं म्हटलं. त्यांनी ट्वीट केली आहे, "जमावानं दुचाकी वाहनं पेटवून दिली. पोलीस कर्मचारी आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. मी तिथेच उपस्थित होतो. जमाव अनियंत्रित झाला होता. आंदोलन करण्याची ही पद्धत नक्कीच नाही.

बीबीसी मराठीशी बोलताना अरविंद गुनशेखर यांनी सांगितलं, "मी हा व्हीडिओ माझ्या फोनवर शूट केला होता. संध्याकाळी 5 वाजून 1 मिनिटांनी मी तो व्हीडिओ शूट केला. साधारणपणे 5 वाजून सहा मिनिटांच्या दरम्यान मी दुसरा व्हीडिओ शूट केला. या दोन्ही व्हीडिओमध्ये बसला आग लागल्याचं कोठेही दिसत नाहीये. पोलिस मोटर बाइकला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कोणतीही नासधूस केली नाही."

आम्ही ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या काही जणांशीही संवाद साधला. राहुल कुमार हे तिथेच एका घराचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "ही घटना रविवारी (15 डिसेंबर) दुपारी दोन-तीन वाजण्याच्या सुमारास घडली. मोठ्या संख्येनं आंदोलक आले आणि तेव्हाच आग लावण्यात आली. पोलिसांनी आग लावल्याचं आम्ही तरी नाही पाहिलं."

अर्थात, त्यांनी कॅमेऱ्यावर काही बोलण्यास नकार दिला.

दिल्ली पोलिसांवर सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याचा आरोप करत जो व्हीडिओ शेर केला जात आहे, त्यात तथ्य नसल्याचं बीबीसीच्या पडताळणीत आढळून आलंय.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top