Wednesday, 15 Sep, 4.49 pm BBC News मराठी

होम
JEE Mains Result : 'सोशल मीडिया, मोबाईलपासून दूर राहिलो'- JEE टॉपर अथर्व तांबट

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षेचा (JEE Mains) निकाल जाहीर झाला आहे.

यंदाच्या वर्षी देशभरातील 44 विद्यार्थ्यांचा NTA स्कोअर 100 पैकी 100 इतका लागल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील अथर्व तांबट, गार्गी बक्षी, सौरभ कुलकर्णी, अमेय देशमुख, स्नेहदीप या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले.

आज (15 सप्टेंबर) दुपारी 1 पासून JEE चा निकाल जाहीर करण्यात येत आहे. विद्यार्थी jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील.

या परीक्षेसाठी देशभरातून 7 लाख 32 हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. 332 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. जवळपास 2.5 लाख विद्यार्थी जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी पात्र ठरतील.

एकाहून अधिक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले आहे ते ग्राह्य धरले जातील.

या निकालानंतर विद्यार्थ्यांना JEE अॅडवान्स ही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठीची नोंदणी NTA ने सुरू केली आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार असून निकाल 15 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केला जाईल.

यानंतर आयआयटीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

'मोबाईलचा वापर कमी करा'

JEE Mains परीक्षेत देशभरातील 18 विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवले आहेत. यात महाराष्ट्रातील अथर्व तांबट या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे.

अथर्व तांबट वाशी, नवी मुंबई येथे राहतो. बीबीसी मराठीशी बोलताना अथर्व म्हणाला, "कोरोना काळात जेईईची तयारी करणं आव्हानात्मक होतं. पण मी या परिस्थितीला सकारात्मकदृष्टीने पाहिलं. महाविद्यालय आणि इतर क्लासेस बंद असल्याने मी वेळेचा सदुपयोग केला. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने प्रवासाचा वेळ वाचला. त्याचाही फायदा झाला."

बारावी आणि प्रवेश परीक्षांच्या गोंधळात मी अभ्यासावरच लक्ष केंद्रीत केलं असंही तो म्हणाला.

जेईई मेन्स परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्य़ार्थ्यांना आयआयटी आणि इतर प्रवेशांसाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा द्यावी लागते.

"आता मी जेईई अॅडव्हान्स परीक्षेकडे लक्ष देणार आहे. या परीक्षेतला स्कोअर अधिक महत्त्वाचा ठरेल कारण प्रवेशासाठी या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात," असंही अथर्वने सांगितलं.

सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा वापरावर नियंत्रण आणल्याचंही अथर्वने सांगितलं. तो म्हणाला, "जेईई परीक्षेसाठी दहावीनंतर दोन वर्ष महत्त्वाचे आहेत आणि पुरेसे आहेत. पण सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे. मी मोबाईलचा वापर कमी केला. मला इतर विद्यार्थ्यांनाही हेच सांगायचे आहे की, संकटं येत राहणार पण आपल्याला अभ्यास करायचा आहे."

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top