Saturday, 31 Jul, 9.43 pm BBC News मराठी

होम
झिका व्हायरस महाराष्ट्र : पुणे जिल्ह्यात सापडला पहिला रुग्ण

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे.

बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा रुग्ण आढळला आहे.

बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका व्हायरसची लागण झाल्याचं 30 जुलै रोजी समोर आलं. या महिलेला चिकनगुनिया देखील झाल्याचं समोर आलं होतं.

त्यानंतर आज म्हणजेच 31 जुलै रोजी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकानं बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

हा झिका रुग्ण सध्या पूर्णपणे बरा झाला असून या महिलेस कोणतीही लक्षणं नाहीत, तसंच त्यांच्या घरात कुणालाही लक्षणं नाहीत, असंही सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

केरळमध्ये 14 रुग्ण

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झिका व्हायरसचा संसर्ग झालेले 14 रुग्ण आढळून आले होते.

केरळमध्ये आढळलेली प्रकरणं ही झिका व्हायरसचीच असल्याचं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने तपासण्यांनंतर म्हटलं होतं.

एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. याच डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनियाही पसरतो. पण हा आजार जीवघेणा नाही.

झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची पाळी शक्यतो येत नाही. पण तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकतं.

याआधी भारतात 2016-17 मध्ये गुजरात राज्यात झिका व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आली होती.

झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. या विषाणूमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसंच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.

प्रामुख्याने हा व्हायरस डासांमार्फत पसरतो, असं म्हटलं जात असलं तरी काही प्रमाणात त्याचा संसर्ग लैंगिक संबंधामार्फतही होत असल्याचं दिसून आलं आहे.

डास चावल्यानंतर काय होतं?

किमशिल्थ हॉस्पिटलमधील संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. मोहम्मद नियास सांगतात, "झिका व्हायरस केवळ डास चावल्यामुळे पसरत नाही. पण, ब्लड ट्रान्सफ्यूजनमधूनही हा पसरण्याची शक्यता असते. तसंच लैंगिक संबंधांमधून हा व्हायरस पसरू शकतो."

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसचे न्युरो-व्हायरलॉजीचे प्राध्यापक डॉ. व्ही. रवी सांगतात, "डास चावल्याच्या आठवडाभरानंतर लक्षणं दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर म्हणजेच मज्जासंस्थेशी निगडीत गुंतागुंत होऊ शकते. हा एक ऑटोइम्यून आजार आहे.

"म्हणजे शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळेच निर्माण होतो. याला गिलियन-बॅरे सिंड्रोम म्हणतात. यामध्ये शरीरातली प्रतिकारकशक्ती आपल्याच पेशींवर हल्ला करू लागते. यामुळे पक्षाघात होऊन शरीराचा खालचा भाग लुळा पडू शकतो."

डॉ. रवी सांगतात, "भारतात पहिल्यांदाच झिका व्हायरसचा क्लस्टर सापडला आहे. जर एकाच ठिकाणी एखाद्या संसर्गाची पाचहून अधिक प्रकरणं आढळत असेल तर त्याला संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत क्लस्टर संबोधलं जातं."

झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत?

झिकाची लागण झाल्यास मृत्यूचं प्रमाण कमी असतं. दर पाच संसर्गजन्य लोकांमध्ये एका व्यक्तीत झिकाची लक्षणं आढळतात.

  • हलकासा ताप
  • डोळे लाल होणे आणि सुजणे
  • डोकेदुखी
  • पायांचे गुडघेदुखी
  • शरीरावर लाल चट्टे येणे

आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरुपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.

पण, या व्हायरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळांचा जन्म होण्याची शक्यता असते. यास्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात.

झिका व्हायरस पहिल्यांदा कुठे आढळला?

झिका व्हायरस पहिल्यांदा युगांडाच्या झिका जंगलात आढळून आला होता. त्यावेळी हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं.

1952 साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद घेतली गेली.

संशोधकांच्या मते भारतातील नागरिक मोठ्या संख्येने कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेले आहेत. 196 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 33 रुग्णांमध्ये झिका व्हायरसबाबत प्रतिकारशक्ती तयार झाल्याचं सांगितलं जातं.

1953 रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालात भारतात झिका व्हायरसची नागरिकांना लागण होत असते, हे निदर्शनास आलं होतं.

2016 आणि 2017 मध्ये अहमदाबाद शहरात झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top