Saturday, 28 Nov, 7.58 pm BBC मराठी

भारत
कोरोना लस: दोन आठवड्यात तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार, वितरण सुरुवातीला भारतात करणार - अदर पुनावाला

येत्या दोन आठवड्यात सिरम इन्स्टिट्यूट भारत सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करेल, अशी माहिती 'सिरम'चे सीईओ आणि मालक अदर पुनावाला यांनी दिली.

तसंच, लशीचं वितरण सुरुवातीला भारतातच केलं जाईल, त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच आफ्रिकेतील देशांमध्ये लशीचं वितरण केलं जाईल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. शिवाय, ऑक्सफर्ड आणि अस्ट्राझेनका हे यूके आणि युरोपात लशीचं वितरण करतील, असंही त्यांनी सांगितलं.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला आज (28 नोव्हेंबर) भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर 'सिरम'चे सीईओ आणि मालक अदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत आणि कोरोनावरील लशीबाबत अधिक माहिती दिली.

पंतप्रधानांच्या भेटीबाबत अदर पुनावाला म्हणाले, "पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूटमधील सदस्यांशी सखोल चर्चा केली. तूर्तास तरी, सरकार लशीचे किती डोस आमच्याकडून घेईल याविषयी ठरलेलं नाही. परंतु जुलै 2021 पर्यंत 300-400 दशलक्ष डोस सरकार आमच्याकडून घेईल असे संकेत आहेत."

"पंतप्रधानांना लशीसंदर्भात सविस्तर माहिती होती. त्यांचं लशीसंदर्भातलं ज्ञान पाहून आम्ही अवाक झालो. आम्हाला फार काही समजावून सांगावं लागलं नाही," असं सांगत पुनावालांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.

"सिरम इन्सिट्यूटमध्ये बनत असलेली लस चांगली आहे. ही लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोना झाला तर रुग्णालयात भरती करावं लागणार नाही. तसेच कोरोनाचा प्रसार 60 टक्क्यांपर्यंत कमी करता येणार आहे," असा विश्वास यावेळी अदर पुनावाला यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदींनी घेतला लस निर्मितीचा आढावा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जाऊन कोरोनावरील लस निर्मितीचा आढावा घेतला. जवळपास सव्वा तास नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होते.

नरेंद्र मोदी यांचं वायूसेनेच्या विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झालं. यावेळी ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे स्वागतासाठी उपस्थित होते.

"सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लशीचं काम कुठवर आलं आहे, याची माहिती त्यांनी दिली. तसंच, लस निर्मितीचं नियोजन कसं आहे, याचीही माहिती घेतली," असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आणि मालक अदर पूनावाला यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही यावेळी हजर होते.

कोरोनाबाबतची सर्व काळजी घेऊन का दौरा आखण्यात आला आहे. त्यामुळे भाजप किंवा कुठल्याही राजकीय पक्षांचे नेते यावेळी हजर नव्हते.

अहमदाबाद आणि हैदराबादमधील लस निर्मिती कंपन्यांनाही भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (28 नोव्हेंबर) देशातील तीन लस उत्पादक कंपन्यांचा दौरा करत आहेत.

सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क या कंपनीला भेट दिली.

अहमदाबादनंतर ते दुपारी हैदराबाद येथील भारत बायोटेक आणि नंतर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपन्यांचा दौरा करतील.

या सर्व कंपन्यांमधील लस निर्मिती कामाची प्रगती, मोठ्या प्रमाणात लशीचं उत्पादन करायची वेळ आल्यास त्याची तयारी, या सर्व बाबींचा आढावा ते घेतील.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top